या सर्व आजारांमागची मानसिक पाश्र्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे. मानसिक समस्यांचा पूर्ण निचरा कसा करता येईल किंवा त्यावर मात कशी करता येईल हे स्त्रियांना शिकवणे आवश्यक आहे. कारण स्त्रियांच्या भावनांची पायमल्ली किंवा जवळच्या नात्यांत अपमान होण्याचे प्रमाणही जास्त आढळते. म्हणूनच कणखर मन हाच त्यावर उपचार आहे.
डॉक्टर्सना अनेकदा चकित करणारे रुग्ण भेटत असतात की ज्यांची शारीरिक लक्षणे त्यांना स्पष्टपणे सांगता येत नाहीत. त्या लक्षणांवरून अचूक रोग निदान करता येत नाही. त्यामुळे शेवटी या अनाकलनीय शारीरिक लक्षणांत व मानसिक आजारात कहीतरी गूढ दुवा असेल, असे गृहीत धरले जाते. मग या अशा अदृश्य आजारांसाठी विविध विशेषणे आम्ही वापरतो. ‘मानसिक’, ‘फंक्शनल’,‘मनोकायिक’ वैगेरे वैगेरे. मानसिक रोगाच्या भाषेत या अशा अनाकलनीय लक्षणांना सोमॅटोफॉर्म म्हणजेच ‘शारीरिकीकरण’ च्या एका छत्रीखाली आम्ही आणतो. यात हायपोकॉन्ड्रीयासिस, सोमाटायजेशन या आजारांबरोबर मानसिक वेदना शारीरिक लक्षणांत रूपांतरित झालेले अनेक आजार समाविष्ट आहेत.
कृष्णाबाई बावन्न वर्षांच्या होत्या. एका रात्री त्यांचा आवाज अचानक गेला. त्यांची कन्या त्यांना आपत्कालीन विभागात रात्री दोन वाजता घेऊन आली होती. आमच्या कान-नाक-घसा विभागतज्ज्ञांनी त्यांना तपासले. पण त्यांच्या वैद्यकीय तपासात अशा तऱ्हेने अचानक आवाज जाण्याचे कोणतेच कारण आढळले नाही. मग निरीक्षणासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करून घेतले. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या एका तज्ज्ञांनी त्यांना तपासले. तांत्रिक तपासण्यांमध्येही काही विशेष सापडले नाही. त्यानंतर मात्र त्यांना मानसिक समस्येच्या चाचणीसाठी पाठविले गेले. कृष्णाबाई बोलायचा प्रयत्न करू पाहात होत्या, पण त्यांच्या तोंडून शब्द पूर्णपणे बाहेर येत नव्हते. अशा वेळी आम्ही त्यांना आराम वाटावा म्हणून औषध दिले. त्यांच्याबरोबर त्यांची लग्न झालेली मुलगी होती. तिने आम्हाला सांगितले की तिचे बाबा दोन वर्षांपूर्वीच कर्करोगाने मृत्यू पावले होते. त्यांना दोन मुलगे होते. मुलीचे त्यांनी दीड वर्षांपूर्वीच लग्न करून दिले होते. मोठा मुलगा खासगी कंपनीत काम करीत होता आणि धाकटा शाळेत शिकत होता. त्या त्यांच्या परीने बोलायचा प्रयत्न करीत होत्या, पण त्यांना अजिबात जमत नाही असेही त्या त्यांच्या हावभावातून दर्शवीत होत्या. शेवटी आम्ही त्यांच्या मुलीशी बोलायला सुरुवात केली. आढेवेढे घेत म्हणा किंवा सांगायचे की नाही या द्वंद्वात तिने बरीच माहिती दिली. कृष्णाबाईंच्या कुटुंबाची आíथक स्थिती बरी होती. स्वत:चे घर होते. मात्र त्यांचा मोठा मुलगा घरी काही देत नव्हता. त्याला जुगाराचे व्यसन होते. त्याचे त्याच्या आईकडे वा भावंडांकडे अजिबात लक्ष नव्हते. आपल्या आईकडे अजून काही दागदागिने असतील तर तिने ते आपल्याला द्यावेत, यासाठी तो त्यांना अलीकडे दमदाटी करीत असे. घरात भांडणे वाढली होती. आधीच पतीच्या निधनाने थकलेल्या व निर्धन झालेल्या कृष्णाबाईंना एका नव्या आधाराची नितांत गरज होती. पण आता मुलाचा आधार मिळण्याऐवजी निराधार होत आहोत ही भीती त्यांना वाटत होती. मुलाच्या त्या बेजबाबदार आणि निर्दय वागण्याने मनातून संतापलेल्या कृष्णाबाईंना मुलावर खूप रागवायचे होते, त्याला तंबी द्यायची होती. पण त्यांना त्यांचे प्रचंड भयही वाटत होते. त्याने आपल्याला घरातून बाहेर काढले तर आपले काय होईल या विचाराने त्या गर्भगळीत झाल्या होत्या. असुरक्षिततेची भावना मनात दाटलेली, त्यात प्रचंड संताप आणि तो व्यक्त करता येत नाही अशी त्यांची एकाकी व असहाय परिस्थिती झाली. या भावनांच्या प्रक्षोभातच त्यांचा आवाज गेला होता. अशा वेळी त्यांची ही मुलगी दवाखान्यात त्यांच्याबरोबर येऊन राहिली होती. त्यांना तिचा खूप आधार होता. याला ‘कन्व्हर्सन डिसऑर्डर’ असे म्हणतात. यात मानसिक क्लेशाचे शारीरिक वेदनांमध्ये रूपांतर होते. हे रूपांतर रुग्णांच्या सुप्त अंतर्मनात होते. जसे कृष्णाबाईंच्या मनात त्यांच्या मुलाबद्दल खूप राग आहे. त्यांना त्याच्यावर चिडायचे आहे पण त्या चिडूही शकत नाहीत. त्यांचा जो उद्वेग आहे तो त्यांचे घायाळ मन सहन करू शकत नाही. अशा संघर्षांच्या स्थितीत त्याला जाणिवेतून राखण्यासाठी ही शारीरिक लक्षणे निर्माण होतात. अशा वेळी त्यांना मानसिक आधार हवा असतो. माझा मुलगा क्रूर आहे. बेजबाबदार आहे, असे त्यांनी कुणाला सांगितले तर ती त्यांची अंर्तगत बाब आहे किंवा बिचारी कृष्णाबाई तिचा मुलगा तिला बघत नाही एवढीच सर्वसामान्य प्रतिक्रिया लोक देतात. पण त्यांचा आवाज गेला हे समजताक्षणी सगळे त्यांची विशेष काळजी घेतात. त्यांना त्याक्षणी हवा असलेला मानसिक आधार मिळतो. कन्व्हर्सनच्या आजारात हेच अपेक्षित आहे. हे त्यांनी मुद्दामहून केलेले नाटक नाही. अशा प्रकारची लक्षणे व्यक्तीच्या जागृत मनाच्या नियंत्रणात नसतातच. त्याचा पूर्ण ताबा सुप्त मनात असतो. पूर्वीच्या काळात याला ‘हिस्टेरिया’ असेही म्हटले जात असे. हिस्टेरिया या शब्दाचा अर्थ ‘भटकणारे गर्भाशय.’ म्हणूनच की काय स्त्रियांच्या वेदनेच्या गर्भातून जन्मलेल्या शारीरिक लक्षणांना हिस्टेरिया म्हणून लोक हा आजार गंभीरपणे घेतही नसत. एवढेच काय तर त्या स्त्रीची हिस्टेरिकल किंवा नाटकी स्त्री अशी थट्टाही केली जात असे. पण या आजाराच्या संकल्पनेतून स्त्री समस्यांच्या चक्रव्यूहात अडकली आहे आणि त्यातून बाहेर येण्यासाठी तिला कोणाची तरी मदत हवी आहे हे सांगायचा प्रयत्न करत असते.
ही लक्षणे विविध प्रकारची असतात पण मज्जासंस्थेशी निगडित असतात. मज्जासंस्था आपल्या मेंदूतून मज्जारज्जूत आपल्या शरीराच्या अंगप्रत्यंगात पसरलेल्या मज्जातंतूतून शरीराच्या संवेदना व स्नायूंच्या हालचालीचे नियोजन व नियंत्रण करते. यामुळे ‘कन्व्हर्सन डीसऑर्डर’च्या आजारात सर्वसाधारणपणे दिसणारी लक्षणे म्हणजे शुद्ध हरपणे, दातखीळ बसणे, काही वेळा रुग्णांच्या हातापायांत मुंग्या येतात. अशक्तपणा येतो, चक्कर येते वा तोल जातो. काही जणांना फिट्स येताना व या फिट्स अगदी समांतर समतोल येणाऱ्या हातापायांचे झटके असतात. कधी शरीराच्या अगदी सरळ रेषेने दुभंगलेल्या एका भागात डोक्यापासून पायापर्यंत संवेदना जाणवत नाहीत किंवा झिणझिण्या येतात. काही जणांना तर लकवा मारतो. पूर्णपणे रुग्णांची माहिती घेतल्यावर व व्यवस्थित तपासाअंती रुग्णाला एखादा मानसिक आजारच झाला आहे हे लक्षात येते.
या विषयावर बरेच संशोधन झाले आहे पण या आजाराचे अचूक कारण काय किंवा या मागची प्रक्रिया काय आहे हे अजून तरी मानसशास्त्रज्ञांना समजलेले नाही. मानसिक विश्लेषणाच्या सिद्धांतामध्ये सिगमंड फ्रॉईड या सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने हा आजार व्यक्तीच्या सुप्त मनाशी संबंधित आहे असे म्हटले आहे. लहानपणी मनाला झालेली असीम वेदना वा मनाला न पटणाऱ्या लंगिक व आक्रमक संवेदनांचा अनुभव मनाच्या खोल कप्प्यात दबल्यामुळे वा नैराश्यामध्ये गेल्यामुळे होते. या संवेदना अशा तऱ्हेने व्यक्तीच्या जाणिवेच्या दुनियेत राहात नाही व त्यामुळे त्यांना होणारी मानसिक तडफड कमी होते.
अरुंधतीला जेव्हा तिच्या पतीचे दुसऱ्या स्त्रीशी प्रेम प्रकरण असल्याचे कळले तेव्हा ती संतापाने तडफडत होती व महिनाभरातच तिला डाव्या बाजूला लकवा मारला गेला. तिचा प्रेमविवाह झाला होता तोसुद्धा तिच्या आई-वडिलांच्या मनाविरुद्ध त्यामुळे माहेरचा भावनिक आधार तिला कधी नव्हताच त्यातच नवऱ्याने केलेला विश्वासघात स्वत:च्या तोंडाने कुणाला कशी सांगणार होती ती? मन आतून आक्रंदन करत होते. तिच्या मनाची ही तडफड तिच्याच मन:पटलावरून मनाच्या एका खोल कप्प्यात पुरली होती. ती अशी लुळी झाल्यावर तिचा नवरा तिच्या उशाशी तर बसून होताच पण आता माहेरची सारी मंडळी आई- बाबा भावंडं सगळी सगळी तिच्या अवतिभवती तिची काळजी घेण्यासाठी आली होती. ही तर तिच्यासाठी खास पर्वणी होती. प्राथमिक पातळीवर तिच्या लकव्याच्या आजाराने तिचा मानसिक उद्रेक तर कमी झालाच पण वरच्या पातळीवर याशिवाय सगळ्यांचे प्रेम व सेवा ही तिला आणखी बोनस म्हणून मिळाली होती हे आपल्या अंतर्मनाच्या अगाध ताकदीचे उदाहरण म्हणावे लागेल.
‘कन्व्हर्सन’च्या आजारात ताण कशाने निर्माण झाला हे समजून घेणे एक आव्हान तर आहेच पण ते डॉक्टरांच्या संवादकौशल्याचा भागही आहे. शिवाय रुग्ण आपल्या डॉक्टरांवर आपली दर्दभरी कहाणी सांगू शकतील इतका विश्वास ठेवतील का किंवा डॉक्टर तो विश्वास निर्माण करतात का यावर अवलंबून आहे. सगळ्याच डॉक्टरांना आपल्या रुग्णांच्या मन:पटलावरच्या या नाजूक गोष्टी वाचता येतीलच असे नाही.
कन्व्हर्सनचा हा आजार तसा अचंबित करणारा आहे. आपल्या समस्येमुळे येणारा असीम ताण शारीरिक आजाराच्या रूपात आल्याने व्यक्तीचे मन मात्र त्या ताणापासून तसे सुरक्षित राहते. यातील लक्षणे ही कधी दुसऱ्या कुणाची तरी पाहिलेली लक्षणे असतात कधी कधी या लक्षणांमध्ये मूळ वेदनेचे रूपक असते तर कधी त्या लक्षणांतून त्या व्यक्तीला काय फायदा होईल यावर अवलंबून असते.
उदा. कृष्णाबाईंना आंधळेपणा न येता फक्त आवाजच का जावा किंवा लकवा मारला गेल्याने नातेवाईकांनी अवतीभवती राहणे व शिवाय त्यामुळे घरातील जबाबदारीसुद्धा टाळता येणे शक्य होते.
बनारसमधली रुक्मिणीची मोठी जेठानी घरी काही कामच करायची नाही. तिच्या सासू-सासऱ्यांचा तिला पाठिंबा होता. कारण जेठाणीला तीन मुलगे होते व रक्मिणीला तीन मुली म्हणून जेठाणीला ‘रानी’चा दर्जा दिला होता, तर रुक्मिणीला ‘नोकरानी’ बनविले होते. आपल्यावर अन्याय होतो आहे हे सांगून सुद्धा तिचे सासू-सासरे तिचे काहीच ऐकत नव्हते. शेवटी तिची डावी बाजू लकव्याने लुळी पडली. तेव्हा सगळ्यांचे धाबे दणाणले. सगळ्यांनी प्रेमाने तिची सेवा केली. तिचे कामांचे ओझे पण कमी झाले.
बऱ्याच वेळा आधीच लहानपणी एखादा आजार असतो तेव्हा त्याच आजाराच्या लक्षणांशी निगडित लक्षणे त्यांच्या कन्व्हर्सन आजारांमध्ये दिसतात. जसे की लहानपणी फिट्सचा वा अस्थमाचा आजार असल्यास पुढे तीच लक्षणे कन्व्हर्सनमध्ये येताना दिसतात. आजार जितक्या सहज किंवा अचानक येतो त्याच प्रमाणात लवकर निघूनही जातो. एखाद्या विशिष्ट तणावामुळे वा समस्येमुळे जर कन्व्हर्सन आले तर ती समस्या सुटताच हा आजार निघून जातो. काही वेळा आपण रुग्णांशी कितीही संवाद साधला तरी त्यांच्या भावनिक उद्रेकाचा उगम ते व्यक्त करतीलच असे नाही. अशा वेळी बचेनी, उदासीनता व चिंता कमी करण्यासाठी रुग्णाला उपचार चालू ठेवायचा. कधीतरी त्यांच्या मनाच्या खोल कप्प्यातील जखम ते उघडी करतात किंवा निसर्गाच्या नियामाप्रमाणे जखमेवर हळुवार फुंकर काळच घालतो. कधी कधी स्त्रियांच्या अवतीभोवती परिस्थिती आणखी चिघळत जाते तेव्हा त्यांची लक्षणात तेवढीशी सुधारणा दिसत नाही. त्यांच्या मनीच्या ताकदीप्रमाणे ही लक्षणे निघून जातात वा कमी होतात. मन अगदी क्षीण झाले तर ही लक्षणे पुन्हा उफाळून येतात.
हायपोकॉड्रीयासिस असो, सोमाटाजेशन असो वा हिस्टेरिया किंवा कन्व्हर्सन डीसऑर्डर असो. या सर्व आजारांमागची मानसिक पाश्र्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे. त्यामागची कारणे, समस्या व्यवस्थित हाताळणे आवश्यक आहे. या मानसिक समस्यांचा पूर्ण निचरा कसा करता येईल किंवा त्यावर मात कशी करता येईल हे स्त्रियांना शिकवणे आवश्यक आहे. स्त्री आपले मन जेवढं कणखर करेल. परिस्थितीशी ठामपणे लढेल तेव्हाच ती अशा आजारांना बळी पडणार नाही.
मानवी मनाच्या उद्रेकी किंवा त्रस्त भावनाचे शारीरिक लक्षणांत रूपांतर होण्याचे प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक आहे. कारण स्त्रियांच्या भावनांची पायमल्ली किंवा जवळच्या नात्यांत अपमान होण्याचे प्रमाणही जास्त आढळते ज्या स्त्रियांच्या भावना त्यांना सशक्त व सक्षम करतात त्यावेळी त्यांना जाणीवपूर्वक व आजणतेपणी शारीरिक लक्षणाचा मुखवटा जरुरीचा वाटत नाही. सुलोचनाच्या नवऱ्याने जेव्हा तिला छळले व दुसऱ्या स्त्रीला घरात आणले तेव्हा काही काळ ती दम्याने आजारी पडत राहिली खरी पण भावाने आधार दिल्यावर तिने स्वत:चा शिवणकामाचा धंदा सुरू केला व स्वत:च त्याला सोडून आनंदात राहिली.
शेवटी काय, जागृत मनात कधी कधी कणखर निर्णय घेण्याची ताकद स्त्रीमध्ये आली आणि जगण्याची हिंमत वाढली की सुप्त मनाला मग अशी लक्षणे निर्माण करायची गरजच भासणार नाही. स्त्रीच्या मन:पटलावर स्वत:ची अस्मिता, प्रेरणा व जोडीला आपल्याच प्रियजनांचा आधार मिळाला की कुठलीही जटिल समस्या तिला नेस्तनाबूत करणार नाही तेव्हा मन कणखर आणि सक्षम करा व अशा शारीरिक त्रासाला गुडबाय म्हणा.

– डॉ. शुभांगी पारकर
pshubhangi@gmail.com.

ipl 2024 gujarat titans beautiful mystery girl compared with hollywood actress ana de armas shubman gill reaction viral
VIDEO : पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंडवर शुबमन गिलचा डोळा? नेटिझन्स म्हणाले, “ओहह भावा…”
Air India Air Transport Services Limited jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती; पाहा नोकरीची माहिती….
what is quds force
इस्रायलने सीरियात इराणी जनरलला का मारले; कुड्स फोर्स कोण आहेत?
fake coca cola cold drinks making and packing video goes viral people got angry after watching
कोल्ड्रिंक्सच्या नावाखाली विकले जातेय विष? व्हायरल VIDEO मध्ये पाहा बनावट कोल्ड्रिंक्सचा काळाबाजार