24 September 2017

News Flash

‘केस’ गंभीर आहे..

भूत येऊन महिलांचे केस कापते यासारख्या अफवा पसरतात अन् तिच्यावर अनेकांचा विश्वासही बसतो

लोकसत्ता टीम | Updated: August 19, 2017 2:33 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

भूत येऊन महिलांचे केस कापते यासारख्या अफवा पसरतात अन् तिच्यावर अनेकांचा विश्वासही बसतो हे अधिक क्लेशदायक आहे..

विल्यम शेक्सपिअर यांच्या ‘हेन्री फोर्थ’ या नाटकात एक पात्र आहे. व्यक्ती नाही ती. ते रूप आहे एका गोष्टीचे. ती म्हणजे अफवा. ‘माझ्याकडे कान द्या. अफवा बोलू लागल्यावर कान देणार नाही, असा कोण महाभाग येथे असू शकेल?’ असा प्रश्न करणारे हे ‘रूमर’ नावाचे पात्र रंगभूमीवर अवतरते तेच जिभाच जिभा चितारलेले वस्त्र लेवून. त्या शेक्सपिअरच्या काळातील अफवा. त्यांना किती जिभा असणार आणि असून असून त्या किती लांब असणार? आज मात्र या अफवेच्या जिभेला ना अंतराची मर्यादा आहे, ना वेगाची. विषयांच्या मर्यादेत तर अफवा कधीच अडकलेल्या नव्हत्या. आताही देशामध्ये सर्वात वेगाने पसरत असलेली आणि आधीच अभाव आणि भय यांनी ग्रासलेल्या समाजात खोल भयगंड निर्माण करीत असलेली ताजी अफवा आहे ती भूत-भानामती आणि करणीच्या अंगाने जाणारी. गंमत म्हणजे एकाच वेळी ती भुताची अफवा आहे आणि त्याच वेळी ती ‘जैविक युद्धा’चे संकेतही देत आहे. ही अफवा आहे केस कापण्याची. उत्तर प्रदेश, हरयाणा, राजस्थान, झारखंड आणि अगदी आपल्या प्रगतिशील सुशिक्षित महाराष्ट्रातही ती पसरलेली आहे. या भागांतील अनेक महिलांचे म्हणे आपोआप केस कापले जात आहेत. एका महिलेनुसार तिच्या घरात रात्री सगळे झोपलेले असताना खिडकीतून उडी मारून एक काळी मांजर आली. पाहता पाहता तिने माणसाचे रूप घेतले. ते भयानक दृश्य पाहून ती महिला बेशुद्ध पडली. त्या व्यक्तीने किंवा त्या भुताने त्या महिलेच्या केसांची वेणी कापून टाकली. हे रूप बदलणारे काळे मांजर इतर कोणाला दिसले की काय ते समजलेले नाही. काहींच्या मते हे चेटूक वगैरे नसून, त्यामागे चीनने सोडलेल्या विशिष्ट किडय़ांचा हात आहे. ते किडे केस खातात. सर्वसाधारण विचार करणारी कोणतीही व्यक्ती या सर्व गोष्टींची हास्यास्पद म्हणूनच नव्हे, तर तद्दन मूर्खपणाच्या म्हणून वासलात लावील. तो मूर्खपणा आहेच. परंतु तो त्या महिलांचा मूर्खपणा नाही, कारण त्या आजारी आहेत. हे नीट समजून घेतल्याशिवाय या अफवा प्रकरणातील खरे गांभीर्य आपल्या लक्षात येणार नाही.

हा केस कापले जाण्याचा प्रकार हा भूत-भानामतीच्या, करणीच्या वगैरे अंगाने जाणारा आहे. मुळात भूत, भानामती हाच सगळा बोगस प्रकार आहे. त्यामागे असतो तो केवळ मानवी हात. आताही ज्या केस कापले जाण्याच्या घटना घडत आहेत, त्यामागेही अन्य कोणतेही गूढ घटक कार्यरत नाहीत. राजस्थानातील गोविंदगढ आणि कालाडेरा या दोन खेडय़ांत अशा तीन घटना घडल्या. पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्यात त्या महिलांनीच आपले केस कापून टाकले होते, हे स्पष्ट झाले. या महिला असे करतात याचे कारण त्यांच्या मनातील अंधश्रद्धेमध्ये जेवढे आहे, तेवढेच त्यांच्यातील मानसिक आजारामध्ये आहे. कौटुंबिक गुलामगिरीपासून मनातील न्यूनगंडांपर्यंत अनेक कारणे त्या आजारास कारणीभूत असतात. याबाबतच्या सामाजिक जाणिवेचा अभाव ही खरी शोकांतिका आहे.. त्या महिलांचीही आणि आपल्या समाजाचीही. सध्या उत्तर भारतातील अनेक गावखेडय़ांमध्ये भीतीचे वातावरण आहे, की कोणत्याही क्षणी ते केस कापणारे भूत येईल. या भयाने लोक टोळ्या करून रात्रीची गस्त घालत आहेत. कोणाकडे तीच व्यक्ती चेटूक करते म्हणून संशयाने पाहिले जात आहे. आणि या सगळ्या धामधुमीत देवर्षी किंवा राजस्थानातील भोपा वगैरे मंडळी मालामाल होत आहेत. म्हणजे हे तिहेरी नुकसान आहे. त्या कुटुंबाचे यातून आर्थिक शोषण होते. त्या केस कापल्या गेलेल्या महिलेला नंतर नेले जाते ते एखाद्या भोंदूबाबाकडे. त्यात तिचे आरोग्यविषयक नुकसान होते आणि अशा घटनांतून समाजाचा भयगंड वाढतच जातो. हे काही याच प्रकरणात घडते आहे असे नाही. मंगळयान पाठविणाऱ्या आपल्या या देशात यापूर्वीही ते घडलेले आहे. एक भेदरलेला, अंधश्रद्धाळू समाज हीसुद्धा आपलीच एक ओळख आहे. यात खेदाची बाब अशी की ही ओळख पुसण्याचा पुसटसा प्रयत्नही आपण यशस्वी होऊ देत नाही. तसे केल्यास आपापल्या धर्मावर घाला येईल असा आपला समज असतो. खरी ‘भानामती’ असेल तर ती ही आहे. अशी ‘अंधश्रद्धेची करणी’ आपल्या समाजावर झाली नसती, तर या अशा अंधश्रद्धाळू अफवा उठण्याची काय बिशाद होती? परंतु त्या उठतात आणि पसरतात. फरक एवढाच आहे, की पूर्वी त्या कानोकानी पसरत असत. आज हातोहाती पसरतात. मोबाइलमधील संदेशपीठे हे आजचे त्याचे साधन आहे. त्यातही सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप.

जगभरात आणि त्यातही प्रामुख्याने तिसऱ्या जगात अफवा आणि असत्यवृत्ते पसरविणारे आजचे सर्वात प्रभावी माध्यम कोणते असेल, तर ते व्हॉट्सअ‍ॅप. मोबाइल इंटरनेटची कमी दरातील उपलब्धता यामुळे कोटय़वधी लोकांच्या हाती हे संदेशपीठ आले आहे. त्यातून संदेशांचे चलनवलन होते ते व्यक्ती ते व्यक्ती आणि व्यक्ती ते गट अशा पद्धतीने. ते नक्कीच एक उपयुक्त साधन आहे. परंतु या उपयुक्ततेमध्येच त्याची उपद्रवक्षमताही दडलेली आहे. याचे कारण प्रचाराचे साधन म्हणून ते अत्यंत बेजबाबदार आहे. त्यावर कोणाचेही नियंत्रण नसते. अन्य प्रसारमाध्यमांमध्ये अंगभूत नियंत्रणे असतात. त्यांच्यात किमान जबाबदारीची जाणीव असते आणि शासनयंत्रणेला वेळप्रसंगी ती जबाबदारी निश्चितही करता येते. मोबाइलवरील संदेशपीठांचे तसे नसल्याने ती बेलगाम सुटलेली आहेत. बदनामीची, असत्य प्रचाराची, खोटय़ा बातम्या पसरविण्याची ती केंद्रे झाली आहेत. अनेकदा तो मजकूर चुकीचा, खोटा, खोडसाळ आहे याची जाणीवही व्हॉट्सअ‍ॅपवरून तो पुढे पाठविणाराला नसते. आपण कोणा समाजकंटकांचे ‘फॉरवर्डिग एजंट’ म्हणून काम करीत असतो हेही त्यांच्या गावी नसते. ते बिचारे, ‘ही माहिती मलाच आधी समजली, आता मी ती इतरांना पाठवून त्यांना शहाणे करतो,’ या भाबडय़ा भावनेने वागत असतात. त्यांच्याकडे आलेल्या संदेशांत तर अनेकदा तशी आज्ञावलीच दिलेली असते. त्या आज्ञा कधी, ‘खरे अमुकतमुक असाल, तर हा संदेश इतरांनाही पाठवा,’ अशा अस्मितेला भडकावणाऱ्या असतात, तर कधी ‘आपल्या प्रियजनांची काळजी असेल तर पुढे पाठवा,’ अशा भावनेला हात घालणाऱ्या असतात. सामान्यजन वाहून जातात त्यात. चालू केशकर्तन भानामतीच्या अफवा देशभर पसरल्या त्या अशा प्रकारे व्हॉट्सअ‍ॅपवरूनच. या प्रकरणातील खरा चिंताजनक भाग आहे तो हा. मुले पळविणारी टोळी आली आहे, असे संदेश व्हॉट्सअ‍ॅपवरून पसरतात आणि त्यातून काही लोकांचा बळी जातो. मीठ संपल्याची अफवा पसरते आणि दुकानांसमोर रांगा लागतात. या घटना एकीकडे आणि दंगलींच्या वा आपत्तीच्या काळात व्हॉट्सअ‍ॅपवरून पसरविले जाणारे द्वेषजनक संदेश आणि छायाचित्रे एकीकडे असे हे भयाण चित्र आज आपल्यासमोर आहे.

या केशकर्तनी भानामतीमधून आपल्यासमोर ही दोन संकटे एकाच वेळी अधोरेखित झालेली असून त्यावरून ‘केस’ किती गंभीर आहे हे दिसते. त्यातील एक संकट आहे ते समाजातील अंधश्रद्धाळूपणाचे, मनोविकारांबाबतच्या अज्ञानाचे आणि दुसरे आहे मोबाइली संदेशपीठांवरून पसरविल्या जात असलेल्या अफवांचे, ‘फेकन्यूज’चे. त्यांचा मुकाबला करण्यात आपण कसूर केली तर केसच नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या सारासार विचारबुद्धी-कर्तनाच्या घटना घडू लागतील. आणि ती ‘भानामती’ नसेल.

First Published on August 19, 2017 2:33 am

Web Title: womens hair being chopped off in sleep
 1. K
  keshav ubale
  Aug 23, 2017 at 4:00 pm
  भोळ्या भाबड्या लोकांच्या भावनांशी खेळताना लाज का वाटत नसावी.
  Reply
  1. G
   Gomya
   Aug 22, 2017 at 8:33 pm
   बापट आज तल्लीन हाेऊन किर्तन सांगत आहेत. या व्यासपीठावर करणायापेक्षा घरी किर्तन करून पहा. घरचे बुडावर लत्ताप्रहार करून हाकलून देतील ! साेम्या, लेका, तू केतकर साहेबांचे अग्रलेख खरेच वाचलेस का ? वाचले असशील तर बाेळक्यात काही प्रकाश कसा नाही पडला ? उगाच फालतू प्रतिक्रीया खरडून हजेरी भरण्याची कामे करता ? तुमचा पगार कापायला पाहिजे !!!
   Reply
   1. U
    Ulhas
    Aug 21, 2017 at 4:35 pm
    आनंद साहेबांची "अग्रलेख लिहिण्या इतकी बातमी मोठी आहे का?" हि प्रतिक्रिया अगदी पटली. अक्षरशः खंडप्राय देश, अफाट विविधता, विलक्षण सामाजिक/धार्मिक/शैक्षणिक कंगोरे, अनेक वर्षपासूनची श्रद्धा/अंधश्रद्धा आणि काही वैयक्तिक राग-लोभ अश्या मोठ्या कॅनव्हासवर लोकसत्तासारख्या वर्तमानपत्राने हे चित्र काढावे काय? "म्हशीला तीन तोंडाचे रेडकू. पाहण्यास अलोट गर्दी" ह्या धाटणीच्या बातम्या छापणाऱ्या वर्तमानपत्रात अशी बातमी आली तर एकवेळ समजू शकते. परंतु, लोकसत्तामध्ये थेट अग्रलेख? काय राव!
    Reply
    1. विनोद
     Aug 20, 2017 at 7:31 pm
     येडपट बापट !
     Reply
     1. दयानंद नाडकर्णी
      Aug 20, 2017 at 2:39 pm
      संपादक महाशयांना बहुधा त्यांच्या अग्रलेखावरील माझी प्रतिक्रिया पसंत पडली नसावी. कारण ती येथे प्रकाशित केलेली दिसत नाही. हे बरोबर नाही. एखादा विषय माहित असो व नसो, त्या विषयाचे पूर्ण आकलन अथवा ज्ञान असो व नसो, संपादक मात्र कोणत्याही विषयावर अग्रलेख लिहून प्रसिद्ध करतो पण वाचकांनी तसं केले तर ते त्यांच्या पचनी पडत नाही. वारंवार लोकशाही, भाषण स्वातंत्र्य, मुद्रण स्वतंत्र्य, नागरिकांचे हक्कावर गदा, िष्णुता वगैरे विषयावर मोठं मोठी कवने झोडायची आणि वेळ आली कि आपल्या सोईनुसार आपल्याला पसंत असलेल्या प्रतिक्रिया प्रसिद्ध करायच्या आणि कोणी विरोधी लिहिले तर त्या दाबून ठेवायच्या. मग तुमची िष्णुता अशा वेळी कोठे असते संपादक महाशय ????? ा माहित आहे हि प्रतिक्रिया पण तुम्ही प्रसिद्ध करणार नाहीत.
      Reply
      1. S
       Shriram Bapat
       Aug 20, 2017 at 1:03 pm
       काल साम वाहिनीवर दाभोलकर यांच्या खुनाला ४ वर्षे होत आहेत यासाठी एक चर्चा घडवून आणली गेली. त्यात दोन दाभोलकर, एक पानसरे, माजी पोलीस सुराडकर आणि अतुल लोंढे भागी झाले होते. काहीही सिद्ध झालेले नसताना सर्वानी सनातन संस्थेवर यथेच्छ दुगाण्या झाडल्या. सनातनचे इचलकरंजीकर , वर्तक किंवा पुनाळेकर असल्यावर या सर्वांची दातखीळ बसते, त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत चर्चा घडवून आणली. अतुल लोंढे यांनी तर मेधा पानसरे या पानसरे यांच्या कन्या आहेत असे म्हणून आपले नसलेले ज्ञान पाजळले. एखाद्या संस्थेच्या प्रतिनिधींच्या गरहजेरीत त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप करायचे हे अन्यायाचे आहे आणि ते न्यायाची मागणी करणाऱ्यांकडूनच होत आहेत.
       Reply
       1. S
        Shriram Bapat
        Aug 20, 2017 at 11:31 am
        दाभोलकर यांनी आदल्या रात्री उशिरापर्यंत एका सभेत जात-पंचायतींविरुद्ध प्रचार केला होता. काही दिवसांपूर्वी वशीकरण, तंत्र-मंत्र यांचा अवलंब करून गरिबांना नाडणाऱ्या दोन मुस्लिम बाबांचा पर्दाफाश करत पोलिसी कारवाई करवली होती. या दोन्ही प्रकरणातील बाधितांना दाभोलकर यांच्या खुनासाठी तात्कालिक कारण होते. त्या दृष्टीने तपास न करता सनातनवर आरोप ठेऊनच तपास करायचा असला तर तपास होतो पण तो फलदायी ठरत नाही. कल ्गींचे तर नावही कोणी ऐकले नव्हते. सनातनवर आरोप ठेवायचा तर कल ्गींचा खून करण्याचे त्यांना काय कारण असेल याचाही कोणी विचार करत नाहीये. निखिल वागळे हे 'माझा खून होणार' म्हणून उडया मारत आहेत. त्यांनी 'गुड नाईट' किंवा 'काला हिट ' पासून दूर राहावे. त्यांना काहीतरी व्हायचे आणि आळ सनातनवर यायचा. अंधश्रद्धा म्हणजे पुरावा नसताना एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे. अंनिस आणि पुरोगाम्यांनी सनातन संस्थेला खुनी मानणे ही अंधश्रद्धाच आहे. त्यांच्याबद्धल ज्याच्या मनात अंधश्रद्धा नाही अशा माणसाने हे वाचून छापण्यायोग्य ठरवले तर तुम्हाला हे वाचताही येईल.
        Reply
        1. U
         umesh
         Aug 20, 2017 at 10:01 am
         दाभोलकर यांचा एक युक्तिवाद याबाबतीत फार खरा व महत्वाचा होता घरात सर्वात जास्त उपेक्षित महिला असतात कुटुंब कितीही उच्च शिक्षित असो या घरातील महिला सर्वांचे लक्ष वळवून घेण्यासाठी असले प्रकार करतात महिलांना जसे सन्मानाने वागवाल हे प्रकार बंद होतील बाकी करणी भानामती वगैरे बोगस आहेत यात आता पुन्हा चर्चा करण्यातही अर्थ नाही
         Reply
         1. M
          madhav kulkarni
          Aug 19, 2017 at 2:49 pm
          सध्याच्या भाजप युगात हिंदूंच्या अंधश्रधदेवर बोलणे म्हणजे हिंदुत्वावर टीका करणे आणि त्यामुळे कोणी त्यावर टीका करायचे धाडस करत नाहीत. दाभोलकरांचा जीव जातो पण तपास होत नाही.कधी वाटते आपण आपल्या समाजाला पंधराव्या शतकात तर घेऊन जात नाही ना. सुशिक्षित माणसेच अंधश्रद्धा जोपासताना दिसतात. स्वामी- साधूकडे जातायत. वास्तुशास्त्र , ज्योतिषीकडे जातात. अशिक्षितांनी ज्यांच्याकडे पाहायचे तेच अंधश्रद्धेत बर लेले दिसतात.
          Reply
          1. U
           Unison
           Aug 19, 2017 at 2:03 pm
           विनोद चू आहे.
           Reply
           1. विनोद
            Aug 19, 2017 at 10:55 am
            बापट आज तल्लीन हाेऊन किर्तन सांगत आहेत. या व्यासपीठावर करणायापेक्षा घरी किर्तन करून पहा. घरचे बुडावर लत्ताप्रहार करून हाकलून देतील !
            Reply
            1. विनोद
             Aug 19, 2017 at 10:39 am
             साेम्या, लेका, तू केतकर साहेबांचे अग्रलेख खरेच वाचलेस का ? वाचले असशील तर बाेळक्यात काही प्रकाश कसा नाही पडला ? उगाच फालतू प्रतिक्रीया खरडून हजेरी भरण्याची कामे करता ? तुमचा पगार कापायला पाहिजे !!!
             Reply
             1. R
              rahul
              Aug 19, 2017 at 10:29 am
              आहो तुम्ही देवावर विश्वास ठेवता तर ावर पण विश्वास ठेवावा लागेल हे एवढे साधे आहे
              Reply
              1. A
               anand
               Aug 19, 2017 at 9:36 am
               अग्रलेख लिहिण्या इतकी बातमी मोठी आहे का ?
               Reply
               1. S
                Shriram Bapat
                Aug 19, 2017 at 9:33 am
                केस कापणारे , मंकी मॅन वगैरे अफवांवर विश्वास ठेवणारे, त्यातून शारीरिक, मानसिक, आर्थिक हानी करून घेणारे 'अशिक्षित' हे त्या नुकसानीला पात्रच असतात आणि एकदा वाईट अनुभव घेतला की त्यातून शहाणे होतील असे समजता येईल पण 'वास्तू' शास्त्रासारख्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्या त्या शास्त्रा(?) वरील लेख छापणाऱ्या लोकसत्तासारख्या वृत्तपत्रांचे काय करायचे ? केंद्र सरकारच्या मंत्रालयात पत्रकारांना मज्जाव केल्याने मंत्री-संत्री-सचिव काही बोलत नाहीत (अपवाद फक्त मराठीतील सर्वश्रेष्ठ संपादकांचा ,ज्यांना सोडायला मंत्री दारापर्यंत येतात) त्यामुळे पुड्या सोडता येत नाहीत म्हणून जाहीर ओरडा करणाऱ्या पत्रकारांचे काय ? अंदाजाने काही छापणे या सुद्धा राजकीय अफवाच नाहीत का ? अनेकदा 'लालकिल्ल्यातून' किंवा ' ्याद्रीच्या वाऱ्यातुन' तेच वाचायला मिळते. तेव्हा याबाबतीत वृत्तपत्रांची स्थिती 'आपण हसे लोका, शेमबुड आपल्या नाका' अशी आहे.झोपलेले जागे होतात, पण झोपेचे सोंग घेतलेले कधीच जागे होत नाहीत. निखिल वागळेंना हा प्रश्न विचारल्यावर ती आर्थिक मज ी असते असे उत्तर त्यांनी दिले होते हे जु ेबाजी सारखेच आहे.
                Reply
                1. विनोद
                 Aug 19, 2017 at 9:23 am
                 भारताचा हिंदुस्तान केल्यावर पुढचा टप्पा तालिबानीकरणाचा. त्याचीच लक्षणे आहेत. हाेय ना भक्त उमेश ?
                 Reply
                 1. A
                  Anil Jagtap
                  Aug 19, 2017 at 8:55 am
                  दुर्बल मानसिक क्षमता असणार्‍या समाजाला सबळ साधने मिळाली की असेच होणार. आवकात नसणारी 'जनता' नामक निर्बुद्ध झुंड स्वतःला समाज म्हणवते यावरूनच आपण किती दांभिक आहोत हे लक्षात येते.
                  Reply
                  1. S
                   Somnath
                   Aug 19, 2017 at 8:52 am
                   खरंच आजचा लेख बऱ्याच अर्थानी गंभीर आहे पण थोडसं गरगरायला झाले कारण चुकून जुन्या संपादकांचा काळ आठवला.कदाचित कुबेर सुट्टीवर असल्याचा भास झाला.प्रत्येक गोष्टीवर मनाचे तर्क लावून नावडत्या सरकारला पाण्यात पाहण्यात लेखणी खर्च केल्यामुळे लेखाचे महत्व कमी तर होते पण जो संदेश जनमानसात जायला पाहिजे तो तेवढ्या मनावर ठसत नाही.वाचकांच्या प्रतिक्रियेच्या केसेस सुद्धा तश्या गंभीर आहेत अदृश्य रूपात व वेगवेगळी नवे धारण करणारे अंधाऱ्या कोठडीतील काही विनोदी गुलाम एक प्रकारे वाचकांच्या प्रतिक्रियेच्या केस कापण्याचे धंदे करत आहे.
                   Reply
                   1. Load More Comments