पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वच्छ भारताची स्वप्ने पडत असली, तरीही त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची मुळीच इच्छा दिसत नाही. खुद्द पंतप्रधानांनीच झाडू हाती घेतल्याने अनेकांना रस्ते साफ करण्यावाचून गत्यंतर उरले नाही. एवढेच कशाला, अगदी शरद पवारांनीही बारामतीत स्वच्छता अभियानात भाग घेण्यासाठी हाती केरसुणी धरली होती. चित्रवाणीवर स्वच्छ भारताच्या जाहिराती सतत झळकत असतानाही, त्या मनाने न पाहण्याचा निर्णय घेणारे भारतीय नागरिक संख्येने कमी नाहीत. पण आपल्याच नेत्याच्या जाहीर सभेला पुण्याहून मुंबईत जाताना द्रुतगती महामार्गावर सगळीकडे घाणीचे साम्राज्य निर्माण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपल्या नेत्याचे मनोगतच समजलेले दिसत नाही. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असणे, हे फायद्याचे असते असाही त्या सर्वाचा समज झाल्याने झुंडशाही करून त्यांनी या महामार्गावर कोठेही टोल भरण्यास नकार दिला. जागोजागी थांबून आपली जेवणे उरकली आणि उष्टय़ा कागदी डब्यांना रस्त्यावरच टाकून ते सारे स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या आपल्या नेत्याच्या सभेसाठी रवाना झाले. हा एवढा निर्लज्जपणा अंगी येतो, याचे कारण सत्ताधारी पक्षाकडून मिळणारे संरक्षण. अन्य कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांपेक्षा आपण अजिबात वेगळे नाही, हे दाखवण्यासाठी सर्वच क्षेत्रांत भाजप कार्यकर्त्यांची सध्या सरशी दिसून येते. मग ते स्वच्छता अभियान असो, की पक्षाचे अन्य कोणतेही कार्यक्रम. स्वच्छ कपडे घालून कचरा काढण्याने देश थोडाच स्वच्छ होणार, असेही त्यांना वाटते. मोदी यांनी त्याचा जेवढा गाजावाजा केला, तेवढय़ा प्रमाणात त्याचा पाठपुरावा केला नाही, अशी तक्रार करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना कचरा निर्माण करणे हाच आपला हक्क वाटत असेल, तर त्यांना सुधारणे कुणाच्याही हातापलीकडचे आहे. स्वच्छता अभियान ही काही सरकारी योजना नव्हे. सरकारी यंत्रणेद्वारे देशात स्वच्छता करणे अजिबात शक्य नाही, हे कोणत्याही शहरातील रस्ते पाहिल्यावर कळू शकते. त्यासाठी नागरिकांची मानसिकता बदलणे हीच एक गरज असते. स्वत: कचरा निर्माण न करण्याबद्दल प्रगत देशांतील नागरिकांमध्ये असलेली कर्तव्याची भावना पाहून भारतीयांना धक्का बसणे स्वाभाविक असते. परंतु हेच भारतीय परत मायदेशात येताच रस्त्यात सहजपणे कागदाचा बोळा टाकण्यात जराही कमीपणा मानत नाहीत. गेले वर्षभर पंतप्रधान मोदी स्वच्छतेबद्दल जे काही बोलत आहेत आणि करत आहेत, ते त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना अजून समजलेले दिसत नाही. स्वत:ला जगाहून चार अंगुळे उंच असल्याचे मानणाऱ्या पुण्यातील भाजपवाल्यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आकाश ठेंगणे झाले आहे. पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात सर्वच्या सर्व जागा भाजपच्या हाती प्रथमच आल्या. त्याने या सर्वाना आकाश ठेंगणे झाले. पण स्वच्छतेबाबतची ही स्थिती केवळ पुणेकरांचीच नाही, ती या पक्षाच्या देशभरातील कार्यकर्त्यांची आहे. कुणालाच या अभियानात काडीचा रस नाही. केवळ सक्ती म्हणून त्यात सहभागी होणे त्यांना क्रमप्राप्त ठरते आहे. तोंडाने जगाला स्वच्छ वागण्याचे आणि नैतिकतेचे धडे देणाऱ्या या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सार्वजनिक ठिकाणी वर्तन कसे करावे, याचेही धडे आता द्यावे लागणार आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या या अस्वच्छता अभियानाने या पक्षाची सांस्कृतिक पातळीही स्पष्ट झाली आहे.