एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राच्या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करणे, आपल्या फायद्याचा उमेदवार वा पक्ष निवडून यावा याकरिता प्रयत्न करणे यात नवे काहीही नाही. अनेक राष्ट्रे तसे करीत असतात. अमेरिका त्यात अग्रभागी. पण अगदी भारतही त्यात मागे नाही. जानेवारी २०१५ मध्ये श्रीलंकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत रॉ या भारताच्या गुप्तचर संघटनेने हस्तक्षेप केल्याचा आरोप माजी अध्यक्ष महिंद राजपक्षे यांनी केला होता. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयासाठी रशियाचे हुकूमशहा व्लादिमीर पुतिन स्वत: प्रयत्नशील होते. रशियन माहिती-शर्विलकांमार्फत तेथे हिलरी क्लिंटन यांच्या प्रचारमोहिमेवर हल्ला केला जात होता. ट्रम्प यांच्या विजयात त्याचा मोठा वाटा आहे असे मानले जाते. अमेरिकेचा याबाबतचा सर्व इतिहास पाहिला तर यावरून तेथे एवढा गदारोळ होण्याचे काहीच कारण नव्हते, परंतु तरीही तो होत आहे. तो निवडणुकीच्या काळात झाला. आता पुन्हा एफबीआय आणि एनएसए या गुप्तचर संघटनांच्या प्रमुखांची काँग्रेसच्या गुप्तहेरगिरीविषयक स्थायी समितीसमोर साक्ष झाली. त्यावरून या आरोपाला उकळी आली आहे. याचे कारण हा केवळ परराष्ट्राने केलेल्या हस्तक्षेपाचा प्रश्न नसून, त्या परकी हाताला ट्रम्प यांनी हात लावून मम म्हटल्याचा सवाल आहे. अत्यंत गंभीर असा हा आरोप आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवाराने आपल्या विजयासाठी शत्रुराष्ट्राशी संगनमत केले असा तो आरोप आहे. एफबीआयकडून त्याचा तपास करण्यात येत आहे. हे सगळ्यांनाच माहीत होते. परंतु सोमवारी काँग्रेससमोर एफबीआयचे संचालक जेम्स कॉमी यांनीच त्याची माहिती दिल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. ते एवढे, की त्यावरून आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष धडधडीत खोटे बोलू लागले आहेत. रशियाने निवडणुकीवर प्रभाव पाडला नाही, असे एफबीआय आणि एनएसएच्या प्रमुखांनी स्पष्ट केले असल्याची ट्विप्पणी अध्यक्षांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून करण्यात आली आहे. ती आणि त्यासोबत दिलेली चित्रफीत पाहिली की कोणासही वाटावे, या संस्थांनी ट्रम्प यांना निर्दोषत्वाचे प्रमाणपत्रच दिले आहे. वास्तविक तसे काहीही नाही. त्यांच्या साक्षीतील निवडक भाग घेऊन ट्रम्प यांनी तसे भासविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हा शुद्ध खोटेपणा झाला. हे ट्रम्प यांचे खास प्रचारतंत्र. आपल्यावरील प्रत्येक आरोप खोटाच आहे, असे दडपून सांगतानाच, आरोपाच्या बातम्यांना ‘फेक न्यूज’ म्हणून हिणवायचे, टीका करणाऱ्या पत्रकारांना विकले गेलेले म्हणायचे, हे ते तंत्र. तथ्य, वस्तुस्थिती काहीही असो. त्यात खोटेपणाची अशी भेसळ करायची की, त्यातून एक पर्यायी वास्तव निर्माण व्हावे, असा हा प्रकार. आताही तेच सुरू आहे आणि ट्रम्प यांचे बिचारे समर्थक – त्यांना ते सगळे खरे वाटत आहे. ट्रम्प हे कसे देशाच्या विकासासाठी काम करतात, परंतु त्यांचे देशद्रोही विरोधक आणि माध्यमे त्यांना ते करू देत नाहीत, असेच त्यांना वाटत आहे. हे खरे ट्रम्प यांचे यश. त्यावर एफबीआयच्या स्पष्टीकरणामुळे किती डाग पडेल हे सांगणे कठीण आहे. ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल फ्लिन यांना रशियाशी संबंध असल्याच्या कारणावरून राजीनामा द्यावा लागला होता. ट्रम्प यांच्या जावयाने निवडणूक काळात रशियाच्या राजदूतांची भेट घेतली होती. हे सारे उजेडात येऊनही ट्रम्प यांच्यावरील त्यांच्या भक्तांचा विश्वास अढळ आहे. कारण खोटे हेच खरे अशी नवसामान्य – न्यू नॉर्मल – परिस्थिती त्यांनी निर्माण केली आहे. आज तीच त्यांच्या फायद्याची ठरत आहे.