लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण ही राष्ट्रजीवनातील एक गंभीर कृती असते व त्यात चुका करण्यास सुतराम वाव नसतो. याचे भान राहिले नाही की काय होते, याचे उत्तम उदाहरण ‘लोकसत्ता’चे इंग्रजी भावंड ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने बुधवारच्या अंकात प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तातून समोर आले आहे. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणातील एका उल्लेखाबद्दलचे हे वृत्त होते. या भाषणात पंतप्रधानांनी नागला फटेला या उत्तर प्रदेशातील गावाची माहिती दिली. हे गाव राजधानी दिल्लीपासून ३०० किमी अंतरावरचे. गेली सुमारे सात दशके तेथे प्रकाशाची किरणे पोहोचलीच नव्हती. देशात आजही अशी अनेक खेडीपाडी आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आल्यानंतर त्यांनी अशा गावांतील अंधार दूर करण्याचा पण केला आणि त्यातून दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना उदयास आली. देशातील अशा दहा हजार ४५ गावांमध्ये विजेचे खांब रोवण्यात आले. या ‘उपलब्धी’चा नमुना म्हणून पंतप्रधानांनी उदाहरणार्थ नागला फटेलाचा उल्लेख केला. ते म्हणाले, त्या गावात जाण्यासाठी दिल्लीहून फक्त तीन तास लागतात. पण तेथे वीज येण्यासाठी ७० वर्षे लागली. वाक्य टाळ्यांचेच होते. पण वस्तुस्थितीहून विपरीत होते. कारण त्या ६०० घरांच्या गावात आजही ४५० घरांत वीज आलेलीच नाही. बरे, ज्या १५० घरांमध्ये वीज पोहोचली आहे, तीही वेगळ्या मार्गाने. उत्तर प्रदेशात त्याला खास शब्द आहे. कटिया कनेक्शन. गावातील २२ विंधनविहिरींचे पंप चालविण्यासाठी तेथे एक ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. त्यातून या जोडण्या घेतल्या जातात. हे अनधिकृतच. गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे १९८५ पासून हे सुरू आहे. म्हणजेच तेव्हापासून या गावात वीज आहे. याचा अर्थ याचे श्रेय मोदी सरकारचे नाही आणि तरीही पंतप्रधानांच्या भाषणात मात्र हे गाव कसे रोशन केले याचा उल्लेख आहे. एवढेच नव्हे, तर त्या गावातील लोक स्वातंत्र्यदिनी कसे दूरचित्रवाणी पाहतात याचे छायाचित्र पंतप्रधानांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून प्रसिद्ध करण्यात आले. त्याचीही गंमत अशी, की ते छायाचित्र नागला फटेलातील नाहीच. म्हणजे दावा खोटा आणि त्याचा छायाचित्रित पुरावाही खोटा. हा खोटेपणा पंतप्रधानांच्या भाषणातून व्हावा ही लांच्छनास्पद बाब आहे. त्यांच्या भाषणाबद्दल अनेकांचे मतभेद असू शकतील. ते खूपच लांबले. त्यास लांबी होती, खोली नव्हती. बलुचिस्तानबाबत जाहीर उल्लेख येणे अनावश्यक आणि अंतिमत आंतरराष्ट्रीय धोरणास मारक होते, अशी टीका होतेच आहे. त्याचबरोबर हे टीकाकार म्हणजे मोदीद्वेष्टे असून पंतप्रधानांनी काय बोलावे हे शिकविण्याचे धाष्टर्य़ करणाऱ्या या टिक्कोजीरावांची लायकी काय आहे, अशा सवालांतून मोदींचे समर्थनही करण्यात येत आहे. या न्यायाने उद्या एखाद्या आपणांस सिनेदिग्दर्शनाचा अनुभव असल्याशिवाय एखाद्या टुकार चित्रपटावरही टीका करता येणार नाही. परंतु तो मुद्दा वेगळा. येथे प्रश्न असा येतो, की हे स्वातंत्र्य दिनाचे भाषण असून त्यात तथ्यांशी खेळ होता कामा नये याचे साधे भानही मोदी यांच्या भाषणलेखकांना कसे राहिले नाही? मोदी यांची इतिहासाची जाण संशयास्पद आहे हे यापूर्वी दिसले आहेच. पण अशा घटनांमुळे त्यांच्या वर्तमानाच्या आकलनाबद्दलही शंका निर्माण होऊ शकतात. त्यास कारणीभूत माहिती देणाऱ्या यंत्रणा आणि मोदींचे भाषणलेखक असले, तरी त्याची अंतिम जबाबदारी मोदींवरच येते आणि ते भाषण स्वातंत्र्य दिन सोहळ्यातील असेल, तर तेथे चूकभूल द्यावी-घ्यावी असे म्हणण्याची मुळीच सोय नसते.