देशात आणि विशेषत: महाराष्ट्रात स्वाइन फ्लूने घातलेले थैमान सरकारच्या अद्याप ध्यानात आलेले दिसत नाही. गेल्या सहा-सात वर्षांत आलेल्या या नव्या रोगाने शेकडोंचे हकनाक बळी जात आहेत. तरीही त्यावर अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात कुणालाही यश आलेले नाही. स्वाइन फ्लूच्या विळख्यात गेल्या दहा दिवसांत राज्यात ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरात यंदा २० ऑगस्टपर्यंत मृत पावलेल्यांची संख्या १०९४ आहे. ती २०१६ मध्ये केवळ २६५ एवढी होती. याच काळात देशभरात लागण झालेल्या रुग्णांची संख्या १७८६ वरून एकदम २२,१८६ पर्यंत गेली. महाराष्ट्रात या रोगाची सर्वाधिक लागण झाली असून बळींची संख्याही सर्वाधिक आहे. या रोगाची लक्षणे सुस्पष्ट नसल्याने त्याची लागण झालेला रुग्ण संपूर्ण तपासणीशिवाय ओळखणे शक्य नसते. ही ‘स्वॅब’ तपासणी करण्याची व्यवस्था फारच थोडय़ा रुग्णालयांमध्ये आहे. खासगी रुग्णालये त्यासाठी साडेचार हजारांपासून ते दहा हजारांपर्यंत शुल्क आकारतात, जे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये ही सुविधा सर्रास उपलब्ध नाही. या रोगावर जे औषध उपलब्ध आहे, ते मुबलक प्रमाणात असल्याचे सरकार सांगत असले, तरीही ते सरसकट देता येत नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. याचे कारण सर्दी, पडसे, खोकला यांसारख्या लक्षणांवर जी नेहमी दिलेली औषधे असतात, ती स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रुग्णावर परिणाम करत नाहीत. सरकारच्या आरोग्य विभागाचे म्हणणे असे, की डॉक्टरांनी सरसकट स्वाइन फ्लू झाल्यानंतर देण्यात येणारे औषध सुरक्षेचा उपाय म्हणून द्यावे. मुळात हे औषध हा रोग होऊ नये यासाठी नाही. शिवाय, या औषधाने अन्य तक्रारी वाढण्याची शक्यता असते. त्यासाठी नव्याने औषध संशोधनाची आवश्यकता आहे. सरकारने त्यासाठी अधिक प्रमाणात लक्ष देऊन, त्यासाठी निधी देऊन यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. मधुमेह, रक्तदाब, क्षय यांसारखे आजार असणाऱ्यांना स्वाइन फ्लू होण्याचा धोका अधिक असतो. त्यातही हा रोग संसर्गजन्य असल्याने, तो वायुवेगाने पसरू शकतो. अशा वेळी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळावे, असे सांगणे मुळीच शहाणपणाचे नाही. हे म्हणजे आग लागू नये म्हणून घरात अग्नीच पेटवू नका, असे सांगण्यासारखे आहे. स्वाइन फ्लूवर प्रतिबंधात्मक औषधाची निर्मिती करण्याचे आव्हान संशोधकांनी स्वीकारले, तरच कदाचित या रोगाची लागण काही प्रमाणात तरी आटोक्यात येण्याची शक्यता आहे. सार्वजनिक सरकारी रुग्णालयांमध्ये ‘स्व्ॉब’ तपासणी स्वस्तात करण्याची व्यवस्था करण्यातही सरकारला अद्याप यश आलेले नाही. एकूणच आरोग्याच्या प्रश्नांकडे किती निर्दय पद्धतीने पाहिले जाते, याचे हे द्योतक आहे. गेल्या काही महिन्यांत या रोगाचा ‘एच वन एन वन’ विषाणू औषधांना दाद देईनासा झाला. त्यामुळे नवे औषध त्वरेने तयार करणे हे एक मोठे आव्हान आहे; पण वेळीच सावध न झाल्याने राज्यातील आणि देशातील अनेक जण हकनाक मरत आहेत, हे निश्चितच शोभादायक नाही. निसर्गात तयार होणाऱ्या नवनवीन विषाणूंशी संघर्ष करण्यासाठी माणसाने संशोधनातून प्रचंड मोठी मजल मारली; पण स्वाइन फ्लूसारख्या रोगावर गेल्या सहा-सात वर्षांत आपल्याला पुरेसे नियंत्रण मिळवता आलेले नाही. तपासणी स्वस्त करणे, प्रतिबंधात्मक औषध तयार करणे आणि लागण झाल्यानंतर हुकमी परिणाम होणाऱ्या औषधाची सर्वदूर उपलब्धता करणे, या त्रिसूत्रीवर आरोग्य विभागाने काम केले नाही, तर या राज्यात हा रोग हाहाकार माजवू शकतो!