इंग्लिश ही जगाची भाषा बनली आहे. कोणत्याही देशात, प्रांतात गेल्यावर तेथील स्थानिक भाषा येत नसल्यास इंग्रजीतून संवाद साधून आपल्याला हवी ती माहिती मिळवता येते. याशिवाय आर्थिक व्यवहार, शिक्षण, कामकाज यांची भाषाही इंग्लिशच आहे. त्यामुळे इंग्रजीचे व्यवस्थित ज्ञान असणे आवश्यक आहे. पण केवळ इंग्रजी बोलता येणं, हे पुरेसं नसतं. अनेक ठिकाणी एखाद्या इंग्रजी शब्दाला अधिक चपखल प्रतिशब्द आवश्यक असतो किंवा वाचन करताना एखाद्या कठीण शब्दावर आपली गाडी येऊन अडकते. अशा वेळी सोबत ‘डिक्शनरी’ अर्थात शब्दकोश असणं आवश्यक आहे. मोठमोठय़ा, जाडजूड शब्दकोशांना ‘पॉकेट डिक्शनरी’चे पर्याय उपलब्ध झाले आहेत. परंतु त्यांची जाडीही खिशासाठी जड असते. अशा वेळी आपल्या स्मार्टफोनमध्येच ‘डिक्शनरी’ मिळाली तर?.. अशीच डिक्शनरी, तीही साधीसुधी नव्हे तर ऑक्सफर्ड डिक्शनरी स्मार्टफोनवर उपलब्ध आहे. जवळपास साडेतीन लाखांहून अधिक इंग्रजी शब्द, वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ, हजारो वाक्यांची उदाहरणे आणि अद्ययावत शब्दभांडार असलेले ‘ऑक्सफर्ड डिक्शनरी’चे अॅप अॅण्ड्रॉइडवर विनामूल्य उपलब्ध आहेत. नवनवीन इंग्रजी शब्दांना ‘अधिमान्यता’ देणाऱ्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या माध्यमातून शब्दसंग्रह मिळवून हे अॅप तयार करण्यात आले आहे. याचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे कोणताही शब्द किंवा त्याचा अर्थ शोधण्यासाठी केवळ ‘सर्च’मध्ये त्या शब्दाचे स्पेलिंग टाकताच त्याचा अर्थ स्क्रीनवर झळकतो. विविध विषयशाखा, क्षेत्र यांच्या दैनंदिन व्यवहारांत किंवा अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या शब्दांचा अर्थ या डिक्शनरीमध्ये समाविष्ट आहे. या अॅपचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्यामध्ये ‘कॅमेरा व्ह्य़ूफाइंडर’ची सुविधा असून त्याद्वारे छायाचित्रातील इंग्रजी शब्दांचा अर्थही हे अॅप शोधून देते. या अॅपची ‘प्रीमियम’ आवृत्ती सशुल्क असून त्यामध्ये ७५ हजार शब्दांचे उच्चारही देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून व्यावसायिकांपर्यंत आणि नोकरदारांपासून अभ्यासकांपर्यंत प्रत्येकासाठी हे अॅप अतिशय उपयुक्त आहे.

..आणि ‘शब्दकोश’
इंग्रजी शब्दांचे हिंदी किंवा अन्य भारतीय भाषांतील अर्थ शोधण्यासाठी सध्या सर्वाधिक वापरले जाणारे संकेतस्थळ ‘शब्दकोश डॉट कॉम’ हे आहे. सहज आणि जलद अर्थ देत असल्याने अन्य कोणत्याही ‘डिक्शनरी’ संकेतस्थळांच्या तुलनेत शब्दकोश डॉट कॉमची मदत घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. याच वापरकर्त्यांसाठी ‘शब्दकोश’ने (SHABDKOSH) आता अॅण्ड्रॉइडवर अॅप विकसित केले आहे. या अॅपचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे यावर इंग्रजीतून हिंदी शब्दांचा कोश ‘ऑफलाइन’ उपलब्ध आहे. याचाच अर्थ इंटरनेटचा वापर न करताही हे अॅप काम करते. या अॅपमध्ये इंग्रजी शब्दांचे अर्थ, त्यांचे उच्चार, त्यांचे प्रतिशब्द, हिंदी अर्थ, वाक्प्रचार, विरुद्धार्थी शब्द देण्यात आले आहेत. त्यामुळे एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना आपल्याला त्याचे पर्यायी शब्द आणि त्यांचा वाक्यात उपयोग कसा होतो, हे जाणून घेता येते. याशिवाय इंग्रजी आणि हिंदी शब्दांचे उच्चारही ध्वनीरूपात या अॅपसोबत उपलब्ध आहेत.

असिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com