संगणक आणि स्मार्टफोनच्या जमान्यात बहुतांश जणांसाठी कागद आणि पेनचा वापर केवळ आर्थिक व्यवहारांपुरता उरला आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्यातही आता बँकांचे व्यवहार ऑनलाइन होत असल्याने आपल्यापैकी खूपच कमी जणांना प्रत्यक्ष लिखाण करण्याची वेळ येते. शाळा, महाविद्यालयांतही आता टॅब्लेट, लॅपटॉपच्या वापरास प्रोत्साहन दिले जात आहे. एकूणच पेनशी आपले नाते तुटतेय की काय, अशी परिस्थिती सध्या आहे. यामुळेच जेव्हा बऱ्याच दिवसांनी हातात पेन घेऊन काही लिहिण्याची वेळ येते तेव्हा हातांची थरथर वाढते किंवा पानभर मजकूर लिहितानाही हात दुखू लागतात. त्यामुळे लिहिण्याचा सराव असायलाच हवा. हे काम तुम्ही आता स्मार्टफोनवरही करू शकता. अँड्रॉइडवर इन्क्रिडीबल (INKredible) नावाचे एक अ‍ॅप ही सुविधा पुरवते. या अ‍ॅपमधील नोटबुकमध्ये तुम्ही तुमच्या अक्षरांत लिखाण करू शकता व ते तसेच सेव्ह करूनही ठेवू शकता. स्मार्टफोनवर ‘हॅण्डरायटिंग टूल्स’ भरपूर उपलब्ध आहेत. अशा ‘टूल्स’मध्ये तुम्ही हातांनी जे गिरवता, त्याप्रमाणे अक्षरे टाइप होत जातात. परंतु, इन्क्रिडिबल या अ‍ॅपमध्ये तुम्ही जसे लिहीत जातात तशी अक्षरे तुमच्या हस्ताक्षरात उमटत जातात. विशेषत: टॅबवर, स्मार्टफोन हे अ‍ॅप वापरण्याचा अनुभव खूपच वेगळा आहे. तुमच्याकडे ‘स्टायलस’ असेल तर लिखाणाचा वेग आणि हस्ताक्षर सौंदर्य दोन्ही वाढू शकते. आता याचा उपयोग काय, असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. सर्वप्रथम म्हणजे तुमच्या हस्ताक्षरात तुम्ही स्मार्टफोन वा टॅबवर लिहू शकता.  दुसरे म्हणजे, आपल्या नोट्स, रोजनिशी, आठवणी आपल्या अक्षरांत स्मार्टफोनमध्ये साठवणे म्हणजे एकप्रकारचे ‘डिजिटायझेशन’च नाही का?

या अ‍ॅपसाठी व्हेक्टर ग्राफिक तंत्रज्ञानावर तीन वर्षे संशोधन करून ते विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे लिहिताना अक्षर चुकण्याची किंवा न उमटण्याची शक्यताच नाही. विशेष म्हणजे, तुम्ही हे लिखाण थेट प्रिंट करू शकता किंवा एखाद्या पॉवरपॉइंट सादरीकरणासाठीही वापरू शकता.

दस्तावेजांचे डिजिटायझेशन

जमाना सध्या इंटरनेटवरील व्यवहारांचा आहे. अनेक कंपन्यांचे करारपत्रही ऑनलाइन बनवले जातात आणि तसेच मंजूर केले जातात. अलीकडे फॉर्म १६ हा नोकरदारांसाठी महत्त्वाचा असणारा दस्तावेज ऑनलाइन पाठवला जाऊ लागला आहे. हा दस्तावेज ओपन केल्यानंतर आपल्या डिजिटल स्वाक्षरी पडताळणी (व्हेरिफिकेशन) करावी लागते. यासाठी संगणकावर अनेक सॉफ्टवेअर्स किंवा ऑनलाइन प्रोग्रॅम उपलब्ध आहेत. मात्र, आता ‘डॉक्युसाइन’च्या रूपात तुम्ही स्मार्टफोन किंवा टॅबवरूनही असे व्यवहार करू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही ऑनलाइन पाठवण्यात येणारे अर्ज, दस्तावेज भरू शकता व त्यावर स्वाक्षरीही करू शकता. हे दस्तावेज आपल्या स्मार्टफोनवर साठवून ठेवता येतात व हवे तेव्हा हाताळताही येतात. शिवाय एखाद्या दस्तावेजावर अन्य कुणाची स्वाक्षरी हवी असेल तर त्याला पाठवण्याची सुविधाही या अ‍ॅपमुळे उपलब्ध होते. या माध्यमातून तुम्ही कंपन्यांचे विक्री करार, आरोग्यविम्याचे दस्तावेज, आर्थिक व्यवहारांचे करार, भाडेपत्र अशा अनेक दस्तावेजांचे ‘डिजिटायझेशन’ करून घेऊ शकता. विशेष म्हणजे, हे अ‍ॅप पीडीएफ, वर्ड, एक्सेल, इमेज फाइल असा कोणत्याही प्रकारचा दस्तावेज खुला करून देते. हे अ‍ॅप आयएसओद्वारे प्रमाणित करण्यात आलेले आहे. या अ‍ॅपचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यासाठी शुल्क आकारण्यात येते. मात्र, मोफत अ‍ॅपद्वारे तुम्ही अनेक दस्तावेज हाताळू शकता.

 

असिफ बागवान

asif.bagwan@expressindia.com