आदित्य म्हणाला, ‘‘आता आपल्या घरातलं वातावरण पूर्वीसारखं कधीच होणार नाही का?’’ केतकीच्या मनात आलं की, असं काय मोठं आभाळ कोसळलं आहे ज्याच्यामुळे घरातलं वातावरण एवढं गढूळ झालं आहे? की आपण ते करतो आहोत? मात्र यातून बाहेर पडायला हवं. नोकरी जायची फक्त शक्यता आहे. आत्ताच नकारार्थी विचार केला तर फक्त खालीच कोसळायला होणार.. सावरायला हवं. शांत डोक्याने विचार केला तरच मार्ग सुचेल..

आज मकरंदला ऑफिसातून यायला उशीर झाला. नेहमीसारखा तो बोलत नव्हता. थकला असेल म्हणून केतकीही काही बोलली नाही. जेवतानाही तिने बोलायचा प्रयत्न केला तर नंतर बोलू म्हणाला. रात्री केतकी खोलीत आल्यावर मात्र त्यानं प्रचंड टेन्शन आल्याचं सांगितलं. संध्याकाळी मीटिंगमध्ये कंपनी सध्या आर्थिक अस्थैर्यातून जात आहे त्यामुळे पगाराचे पैसे कमी करण्यात येतील किंवा कदाचित नोकरीतून कमी करतील याची कल्पना देण्यात आली. हे ऐकून केतकीलाही धक्का बसला. आत्ताशी कुठे घराचं कर्ज फिटलं होतं. अजून आदित्य, अस्मिताची शिक्षणं व्हायची होती. विचार करता करता केतकी तर त्या दोघांच्या लग्नाचं कसं होणार इथपर्यंत पोहोचली. दोघांनाही रात्री नीट झोप लागली नाही.
सकाळी अस्मिताने कॉलेजची फी या आठवडय़ात भरायची असल्याचं सांगितलं. एक लाख रुपये भरायचे होते. ‘आताच हिची एवढी फी तर आदित्यच्या वेळेला किती फी असेल? तो काय शिकेल यावर ते अवलंबून राहील. तो अजून कोणत्या तरी वेगळ्या क्षेत्रात गेला, त्याची फी खूप जास्त असेल तर? कसं काय नियोजन करणार आपण? म्हातारपणाचीही व्यवस्था करायला हवी.’ अशा अनेक विचारांच्या गर्तेत केतकी शिरत गेली. परिणामी तिचा ताण वाढत गेला.
या गोष्टीला आता दीड महिना होऊन गेला. मकरंदच्या ऑफिसमधून दहा जणांना कमी करण्यात आलं. घरातील ताण वाढतच होता. केतकीचं घरातलं बोलणं कमी झालं होतं. मकरंदची चिडचिड वाढली होती. मुलं घरात दोघांचा अंदाज घेऊन वागायची. शेवटी रात्री न राहून आदित्य जेवताना म्हणाला, ‘‘आता आपल्या घरातलं वातावरण पूर्वीसारखं कधीच होणार नाही का?’’ केतकीला हे ऐकून भडभडून आलं. त्या क्षणी तिच्या मनात आलं की, असं काय मोठं आभाळ कोसळलं आहे ज्याच्यामुळे घरातलं वातावरण एवढं गढूळ झालं आहे? की आपण ते करतो आहोत? जे काहीही असेल, पण यातून पटकन बाहेर पडायला हवं. मकरंदशी आजच बोलायला हवं.
कधी नव्हे ते केतकीला मकरंदशी बोलताना थोडं दडपण आलं. ती त्याला म्हणाली, ‘‘असं किती दिवस चालायचं?’’ त्यावर मकरंद पटकन म्हणाला की, ‘‘अगं, माझ्या हातात काही आहे का? अजूनपर्यंत नोकरी आहे. पगार कमी केलेला नाही, पण डोक्यावर टांगती तलवार राहणारच ना?’’ केतकी धीर एकवटून म्हणाली, ‘‘मला हे घरातलं वातावरण खूप खटकतंय. म्हणजे आपल्यामुळेच तयार झालं आहे ते. माझं कमी बोलणं. तुझी चिडचिड.’’ हे ऐकून मकरंद अधिकच चिडला म्हणाला, ‘‘मी काय मुद्दाम चिडतो? परिस्थितीच तशी आहे. तू तरी असं बोलायला नको होतंस. जरा तरी समजून घे.’’ केतकी त्याला समजावत म्हणाली, ‘‘मला तुझी चिडचिड का होते ते कळतंय. आपण सर्वच एका तणावाखाली आहोत. चांगल्या दिवसांबरोबर संघर्षांचेही दिवस येणार हे मान्य करायला हवं. पगार कमी झाला किंवा नोकरी गेली तर त्यावर काही तरी उपाययोजना करायची की परिस्थितीवर खापर फोडून मोकळं व्हायचं? हातावर हात ठेवून बसायचं का?’’ मकरंदला वाटलं हिची नोकरी छान चालू आहे म्हणून उपदेशाचे डोस पाजायला सुचतंय. तो चिडूनच म्हणाला, ‘‘आर्थिक मंदी आहे, जगात काय चाललंय ते माहिती आहे ना? कुठेही नोकऱ्या नाहीत. मी कमी का प्रयत्न करतोय?’’
केतकी म्हणाली, ‘‘मी तुला नोकरी शोध म्हणत नाही तर तूच तुझ्यासाठी संधी निर्माण कर, असं सांगते आहे. नाही तरी सारखा म्हणायचास ना या साचेबंध कामाचा कंटाळा आला आहे म्हणून. मग तुला जे आवडतं, जे तुला करायचं होतं त्यात काही उद्योग चालू करता येतो का बघायचा. खूप भांडवल लागणार नाही पण जे करताना आनंद मिळेल असं बघायचं. पहिल्यांदा पैसे कमी मिळतील. पण ठीक आहे ना.’’ याने मकरंद अजूनच चिडला, त्याने केतकीकडे रागाने बघितलं. मनात मात्र मोठय़ा मोठय़ांदा म्हणाला की, ‘हिला आयुष्य म्हणजे हिंदी सिनेमा वाटतोय. नोकरी गेली, मनासारखं, आवडीचं काम हिरो करायला लागला आणि श्रीमंत झाला. किंवा कोणाची तरी जायदाद मिळाली आणि सुटला प्रश्न.’ मनातलं वाचल्यासारखं केतकी त्याला म्हणाली, ‘‘मी सिनेमातल्या सारखं नाही तर खरंच मनापासून सांगते आहे. शांत असताना तू विचार करून बघ. खूप काही सुचेल. आता झोपूयात.’’
सकाळी उठल्यावर केतकी खूप दिवसांनी रियाझाला बसली. आवाजही चांगला लागला होता. मकरंदलाही तिच्या सुरांनी बरं वाटलं. तोही चालायला गेला. चालण्यापेक्षा डोक्यातल्या विचारांचा वेग जास्त होता. ‘मला खूप गोष्टीत रस आहे. कॉलेजमध्ये मी नाटकात काम करायचो, लिहायचो. वाचतो तर पहिल्यापासून, कोणताही विषय मला ताज्य नाही. कॉलेजमध्ये मी सगळ्यांना गणित किती छान समजावून सांगायचो. आतासुद्धा आदित्यच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेच्या वेळी अभ्यास घेतलाच की. गणितातली गंमत सांगितली होती. सायकलवरून किती भटकायचो. कॅम्पिंग करायचो. तिथेच तीन दगडांची चूल करून जेवण करायचो. तसं वेगवेगळे पदार्थ करायला मला खूप आवडतात.
कामाच्या धकाधकीत आपल्याला काय आवडतं हेच विसरून गेलोय. ही संधी आहे असं समजून या चाकोरीच्या शिवाय अजून काही करता येईल. खरंच मन शांत असेल तर किती तरी गोष्टी आठवतात, सुचतात. रागावलेलो असताना विवेकावर पडदा पडतो, विचार करता येत नाही, वादविवाद होतात.’
‘आपली परिस्थिती खूप वाईट नक्कीच नाही. केतकीचा पगार येतोच आहे. आता अनावश्यक खर्च कमी करायला हवेत. मल्टिप्लेक्समधला सिनेमा हजारात जातो. हॉटेलिंग पण कमी करूयात. मुलांना कपडय़ांची आवड, त्यामुळे खूप कपडे घेतले जातात. कित्येक कपडे घातलेही जात नाहीत. मुलांना कल्पना द्यायला हवी. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तब्येत उत्तम ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. व्यायाम, चौरस आहार केला पाहिजे म्हणजे काम करायला एनर्जी राहते आणि डॉक्टरचा खर्च वाचतो. केतकीशी बोलून नीट प्लानिंग करू.’ आता त्याचा मूड चांगला झाला होता.
घरी आल्यावर त्याने नाश्त्याला पटकन होईल म्हणून तांदळाची उकड केली. सर्वानी ती मिटक्या मारत खाल्ली. मकरंदही खूश झाला. केतकीला तो म्हणाला, ‘‘आज ऑफिसमधून येताना शेजारच्या अथर्व क्लासेसमध्ये जाऊन येतो. तिकडचे सर मला विचारत होते की, तुम्ही आदित्यला अभ्यासात मार्गदर्शन करता तसं आमच्याकडच्या मुलांना पण अभ्यास कसा करायचा, विषय कसा समजून घ्यायचा याचं मार्गदर्शन करा.. मी त्यांच्याकडे लक्ष दिलं नव्हतं पण आज संध्याकाळी जाऊन येईन.’’
तिथे गेल्यावर सरांनी मकरंदला दहावीची आता जी फेरपरीक्षा होणार होती त्याला बसणाऱ्या मुलांना शिकवण्याची गळ घातली. मकरंद शनिवार-रविवार मुलांना शिकवत होता. समजावून सांगण्याची हातोटी त्याच्याकडे होती, वेगवेगळ्या पद्धतीने तो विषय समजून सांगत असे. मुलांनाही अभ्यासात रस वाटू लागला होता.
शिवाय त्याने आपल्या कुकरीतला आनंदही पुन्हा घ्यायला सुरुवात केली. तो रोज नेट, टी.व्ही. शोज, पुस्तकांवरून वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवायचा. अस्मिताने विचारले, ‘‘तुमच्या हाताला चव आहे. माझा मित्र कुशल जसं ‘पॉप-अप’ ठेवतो तसं आपण पण ठेवूयात का? ‘पॉप-अप’ म्हणजे एका दिवसाचे रेस्टॉरंट. खूप मज्जा येते. लोकांना आपण ठेवत असलेल्या पदार्थाची लिस्ट, त्यांची किंमत, वेळ आणि ठिकाण कळवायचं. घरात पदार्थ बनवू आणि गच्चीत मांडणी करू. आम्ही तिघं आहोत तुमच्या मदतीला आणि मैत्रिणी पण येतील.’’
मकरंद मनात म्हणाला, ‘‘काय गंमत आहे, स्वयंपाकवाल्या बाईला किंमत नाही पण त्याचाच शेफ झाला की त्याचा भाव वाढतो. आपण बघतोच की हे टीव्हीवरच्या रिअ‍ॅलिटी शोज्मध्ये. पण या सगळ्यात एक मात्र गोष्ट झाली की, आज ऑफिसमधील परिस्थिती तशीच आहे. पण मला काय करायला आवडतं आणि काय करताना आनंद होतो आहे हे कळलं आणि मी ते करताना जास्त वेळ द्यायला लागलो, थकायला झालं तरी समाधान मिळतंय. बाकीच्यांनाही त्याचा उपयोग होतोय, मी केलेलं खायला त्यांना आवडतंय. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतही मी आनंदी राहू शकतोय. कदाचित याचा अर्थ ‘ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान।।’ या उक्तीप्रमाणे असावा. केतकी म्हणत होती त्यात तथ्य आहे. मला या आवडणाऱ्या गोष्टींतून छोटय़ा प्रमाणावर का होईना व्यवसाय सुरू नक्की करता येईल. जसं की क्लास किंवा छोटासा वेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थाचा जॉइन्ट चालू करता येईल. यातून पैसाही चांगला मिळू शकतो, थोडा वेळ लागेल. शेवटी पैसा महत्त्वाचा आहे पण सर्वस्व नाही..
केतकी आणि मकरंदने छोटीशी भाडय़ाची जागा बघितली. तिथे तो शनिवार-रविवार क्लास घेऊ लागला. मध्ये दोनदा मुलं म्हणाली त्याप्रमाणे सोसायटीला पैसे देऊन गच्चीवर ‘पॉप-अप’ केले. आता मकरंदची नोकरी जरी गेली तरी त्यांच्याकडे दुसरे पर्याय होते आणि समस्या उभी राहिली तरी संसार सुखाचा, आनंदाचा करण्याचं कौशल्य त्याच्याकडे होतं.
madhavigokhale66@gmail.com