थरमॅक्स लिमिटेड

कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत भांडवली वस्तू (औद्योगिक उत्पादनासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री) क्षेत्र महत्त्वाचे असते. भारताच्या अर्थव्यवस्थेत स्थानिक बाजारपेठ मोठी असल्याने भारतासाठी तर हे क्षेत्र विशेष महत्त्वाचे आहे. स्थानिक उपभोगासाठी व आयातीसाठी दर्जेदार उत्पादनांची गरज असल्याने यंत्रसामग्री क्षेत्र विशेष महत्त्वाचे आहे. उच्च दर्जा तसेच किफायतशीर उत्पादन खर्चात उत्पादन करण्यासाठी तंत्रज्ञानस्नेही यंत्रसामग्रीची गरज आहे. भारतात यंत्रसामग्री मुख्यत्वे चीन, अमेरिका व जर्मनी या देशांतून आयात होते.

भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनांत औद्योगिक उत्पादनाचा हिस्सा ४० टक्क्यांवर नेण्याच्या उद्दिष्टाने मे २०१६ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रथमच भांडवली वस्तू धोरणाला मान्यता दिली. या धोरणात भारतातील भांडवली वस्तूंचे उत्पादन २०१५-१६ मध्ये २.५० लाख कोटींवरून २०२५ मध्ये ७.५० लाख कोटींवर नेण्याचे उद्दिष्ट या धोरणात राखण्यात आलेले आहे. हे धोरण सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाचा एक भाग आहे. कच्च्या तेलानंतर भारत दरवर्षी १.२५ ते १.२३ लाख कोटी रुपयांची यंत्रसामग्री आयात करतो. म्हणूनच दोन वित्तीय सेवाक्षेत्रातील गुंतवणुकांच्या शिफारशीनंतर भांडवली वस्तू उत्पादक असलेल्या ‘थरमॅक्स’ची शिफारस करीत आहे.

वीजनिर्मिती, रसायन उद्योग, पोलादनिर्मिती आदी उद्योगांसाठी औद्योगिक वापराच्या भांडवली वस्तूंचे उत्पादन थरमॅक्स करते. कंपनीची उत्पादने कमी क्षमतेचे बाष्पक, सांडपाणी प्रक्रिया, औद्योगिक कचऱ्यावर प्रक्रिया, हवाप्रदूषण नियंत्रण यासाठी वापरली जातात. बाष्पकांची निर्माती असलेल्या बॅबकॉक विलकॉक्स जगविख्यात कंपनीबरोबर थरमॅक्सचा तंत्रज्ञान हस्तांतर करार झाला असून भारतात हा संयुक्त प्रकल्प बाष्पकांची निर्मिती करतो. ऊर्जानिर्मिती कंपन्यांचा विस्तार विविध धोरणांनी अडकला असल्यामुळे पुरेशा मागणीच्या अभावी हा संयुक्त प्रकल्प तोटय़ात असून पुढील आर्थिक वर्षांत हा प्रकल्प नफ्यात येईल. कंपनीने सुपर क्रिटिकल बॉयलरची आखणी पूर्ण केली असून येत्या वर्षांत त्याच्या वाणिज्य उत्पादनास सुरुवात होईल. कंपनीचा दैनंदिन कारभार मेहेर पदमजी व एमएस उन्नीकृष्णन पाहतात. आगा व पदमजी कुटुंबीयांव्यतिरिक्त, ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, मॅरिकोचे अध्यक्ष हर्ष मारीवाला, कीर्तने-पंडित या सनदी लेखपाल पेढीचे रवी पंडित या नामांकित व्यक्ती कंपनीच्या संचालक मंडळावर आहेत.

सरकारी धोरणांचा भाग असलेल्या ‘स्मार्ट सिटी’ उभारणीची थरमॅक्स ही एक मुख्य लाभार्थी कंपनी आहे. पाणीपुरवठय़ासाठी पाणी शुद्धीकरण यंत्रणा व मलनिस्सारण यंत्रणांचा समावेश थरमॅक्सच्या उत्पादनांत होतो. स्मार्ट सिटीतील व्यावसायिक वापराच्या इमारती, मोठी निवासी संकुले यांना कचरा व सांडपाणी यंत्रणा बसविणे बंधनकारक आहे. थरमॅक्सने कचरा पुनप्र्रक्रियेसाठी ‘बायोकास्क’ नावाचे उत्पादन विकसित केले आहे. हे व यासारख्या प्रक्रिया यंत्रसामग्रीचा थरमॅक्सच्या यशस्वी ठरलेल्या उत्पादनांत समावेश होतो.

वाहन उद्योगासाठी लागू असलेल्या युरो-४ प्रदूषणरोधक निकषांचा सर्वात मोठा लाभार्थी थरमॅक्स आहे. केंद्र सरकारच्या मालकीच्या तेल शुद्धीकरण कारखान्यांना युरो-४ निकषांत बसणारी इंधने तयार करताना प्रक्रिया करणाऱ्या यंत्रांची थरमॅक्स एक प्रमुख पुरवठादार कंपनी आहे. सरकारी रासायनिक खत कारखान्यांच्या विस्तारासाठी यंत्रसामग्रीची मोठी मागणी संबंधितांनी थरमॅक्सकडे नोंदविली आहे. पायाभूत सुविधांचा विकास हे केंद्र सरकारचे महत्त्वाचे धोरण आहे. थरमॅक्सच्या उत्पादनाचा वापर असलेल्या उद्योगांच्या क्षमता विस्तारामुळे, येत्या काळात थरमॅक्सच्या उत्पादनांच्या मागणीत मोठी वाढ संभवत आहे.  कच्च्या तेलाच्या किमती स्थिरावत असल्याने, मध्य आशियातील अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लागत असल्याचे दिसत आहे. मध्य आशिया व पूर्व आशियातील इंडोनेशिया, फिलिपाइन्स, मलेशिया यांसारख्या जिन्नस निर्यातदार देशातील खंडित झालेल्या क्षमताविस्ताराला पुन्हा चालना मिळत असल्याचे दिसून येत आहे. थरमॅक्सच्या व्यवस्थापनाने उत्पादने विकसित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून नवीन बदलत्या बाजारपेठेशी जुळवून घेण्यास थरमॅक्स सज्ज झाली आहे. इंडोनेशियामधील आणि गुजरात राज्यातील दहेज आणि आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथील कारखान्यांचा विस्तार पूर्ण होत आलेला आहे. उत्पादन वाढीस वेग मिळण्यास एखाद्या वर्षांचा कालावधी लागेल. शुक्रवारी ८६१च्या पातळीवर बंद झालेल्या या उमद्या मिड कॅपचा समावेश ४ ते ५ वर्षांसाठी गुंतवणुकीत केल्यास दमदार भांडवली वृद्धी मिळणे शक्य आहे.

राजेश तांबे arthmanas@expressindia.com

(लेखक शेअर गुंतवणूकतज्ज्ञ आणि बाजार विश्लेषक आहेत.)