गुंतवणुकीसाठी वयाची अट खरे तर तशी नसतेच. मात्र गुंतवणूक हा एक संवेदनशील विषय आहे. त्यात जर वयाची साठी गाठली असेल आणि निवृत्ती घेतलेल्या व्यक्तीच्या गुंतवणूकविषयक बिनधास्तपणाला आवर येणे अथवा जोखीम क्षमतेवर मर्यादा येणे साहजिकच. तरी या वयातही नियोजन केले गेल्यास, वर्धित गुंतवणुकीच्या संधी निश्चितच आहेत..

मार्च २०१४ मध्ये एका राष्ट्रीयीकृत बँकेतून वरिष्ठ व्यवस्थापक पदावरून नितीन भिडे सेवानिवृत्त झाले. त्यांची पत्नी येत्या नोव्हेंबरअखेरीस राष्ट्रीयीकृत बँकेतूनच सेवानिवृत्त होईल. त्यांना एक मुलगी असून ती परदेशातील शिक्षण पूर्ण करून नोकरी करीत आहे. असे हे सुखी-संपन्न त्रिकोणी कुटुंब. ‘लोकसत्ता’चे वाचक असलेले भिडे यांनी ‘अर्थवृत्तांत’कडे काही गुंतवणूक व अर्थनियोजनाबाबत स्पष्टतेसाठी ई-मेल पाठवून विचारणा केली.  नितीन भिडे लिहितात, ‘‘माझ्या पत्नीला पीएफ, ग्रॅच्युइटी आणि संचित रजेची भरपाई मिळून पन्नास लाखापर्यंत रक्कम मिळेल. मी मला मिळालेली निवृत्तिपश्चातची रक्कम बँकेच्या मुदत ठेवीत गुंतविली होती. सुरुवातीला केलेल्या या मुदत ठेवींची मुदतपूर्ती पुढील महिन्यांत होत आहे. माझ्या मुदत ठेवी आणि पत्नीला मिळालेली रक्कम धरून डिसेंबपर्यंत साधारणपणे मोठी रक्कम गुंतवणुकीसाठी उपलब्ध होणार आहे. बँकांच्या मुदत ठेवींचे सध्याचे व्याजदर बघता मुदत ठेवींचे नूतनीकरण करण्याची इच्छा नाही. या पैशाचे नेमके काय करावे याबाबत मार्गदर्शन करावे?’’

Competition among 7 companies under incentive scheme for ACC production
‘एसीसी’ उत्पादनासाठी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७ कंपन्यांमध्ये चढाओढ
Vasai, Solar power, subsidy scheme,
वसई : सौर उर्जा अनुदानाची योजना कागदावरच, ६ वर्षांपासून एकालाही अनुदान नाही
IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
public sector enterprises disinvestment in fy 24
निर्गुंतवणूक लक्ष्याची सरकारला पुन्हा हुलकावणी! सरकारी मालकीच्या कंपन्यांमधील हिस्सा विक्रीतून १६,५०७ कोटींचा लाभ

नितीन, निशा आणि नेहा यांचे हे त्रिकोणी कुटुंब बऱ्याच अंगांनी प्रातिनिधिक आहे. नेहाच्या परदेशातील शिक्षणाचा खर्च नितीन यांनी आपल्या प्रॉव्हिडंट फंडातून मुदतपूर्व काढलेले पैसे आणि आपल्याच बँकेतून घेतलेले शैक्षणिक कर्ज मिळून भागविला. सेवानिवृत्त झाल्यावर अनेक नोकरदार मंडळी आणि विशेषत: बँकेतील सेवानिवृत्त मंडळी जी चूक करतात तीच चूक नितीन भिडे यांनी केली आहे. सेवानिवृत्त झाल्यावर मिळालेला धनादेश वटविण्यासाठी ज्या बँकेत भरला जातो, त्याच बँकेत सर्वसाधारणपणे मुदत ठेव केली जाते. बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना ‘स्टाफ रेट’ मिळत असल्याने त्याचा मोह बँकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना काही सुटत नाही. सर्वसामान्यांपेक्षा अर्धा टक्का व्याज अधिक मिळाल्यामुळे महागाईवर मात करता येत नाही. मुद्दलाची सुरक्षितता आणि भांडवली वृद्धी यांचा समतोल साधायला हवा. तुम्ही भांडवलाची सुरक्षितता जपताना महागाईमुळे तुमच्या मुद्दलाची क्रयशक्ती गमावून बसला आहात.

नेमक्या चुका कोणत्या?

नितीन यांनी नेमकी हीच चूक केली. ही चूक होती हे नितीन यांनाही पटल्याचे त्यांच्या पत्रावरून स्पष्ट होते. त्यामुळे निशा यांच्या सेवानिवृत्तीच्या वेळी मिळालेले पैसे गुंतविताना व्यावसायिक सल्लागाराची मदत घ्यावी असे वाटते. अनेकदा गुंतवणूक विश्वात ‘डू इट युअरसेल्फ’ ही एक मोठी चूक ठरू शकते. जी नेमकी चूक नितीन भिडे यांच्याकडून घडली. म्युच्युअल फंड म्हणजे शेअर बाजारातील गुंतवणूक आणि शेअर बाजार म्हणजे सट्टा असा गैरसमज झालेले नितीन भिडे यांची मानसिकता शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी साजेशी नव्हती. गुंतवणूक सल्लागाराने तुम्हाला तुमच्या गरजेप्रमाणे विविध पर्याय सुचविले असते. हे सर्व पर्याय शेअर बाजाराशी निगडित गुंतवणुकीचे असते असे नव्हे. रोखे, समभाग, आर्ब्रिटाज आणि याचे संयोजन असलेल्या विकल्पांमधून एक किंवा अनेक पर्याय तुम्हाला सुचविले असते. समजा तुम्ही १ एप्रिल २०१४ रोजी ‘अबक’ रोखे फंडात १ लाख गुंतविले असते, तर १२ ऑक्टोबर २०१७च्या ‘रेग्युलर ग्रोथ’ एनएव्हीनुसार तुमच्या गुंतवणुकीचे बाजार मूल्य १,३८,३८३ रुपये झाले असते. या गुंतवणुकीवर ९.८ टक्के वार्षिक परतावा मिळाला असता आणि या गुंतवणुकीला तीन वर्षांहून अधिक कालावधी झाल्यामुळे तीवर दीर्घकालीन भांडवली नफ्यावर इंडेक्सेशनचा लाभ मिळेल. तुमचा भांडवली नफा २४,६६७ रुपये असून इंडेक्सेशनपश्चात हे उत्पन्न तुमच्या पेन्शनमध्ये मिळविल्यास तुम्हाला नगण्य कर भरावा लागेल. हा कर वाचविण्यासाठी गुंतवणूक केल्यास तुमचे सर्व उत्पन्न करमुक्त असेल. या उलट रक्कम बँकेच्या मुदत ठेवीत गुंतविल्यामुळे त्यावर मिळालेले व्याज तुमच्या उत्पन्नाचा एक भाग धरले गेले. साहजिकच तुमचे निवृत्तिवेतन आणि मुदत ठेवींवरील व्याज मिळून तुम्ही २० टक्के कर कक्षेत आहात. म्हणून मुदत ठेवींवरील करपूर्व परतावा ६.३७ टक्के तर करपश्चात परतावा ४.९८ टक्के आहे.

निशा यांनी नेमकी गुंतवणूक कुठे करावी?

कुठलीही गुंतवणूक करताना गुंतवणूक उद्दिष्ट निश्चित करणे आवश्यक असते. तुम्हा दोघांना तुमच्या आपापल्या बँकांकडून पेन्शन मिळत आहे. मिळणारी पेन्शन तुमच्या मासिक खर्चापेक्षा अधिक आहे. तेव्हा गुंतवणुकीतून नियमित उत्पन्न मिळविणे हा तुमच्या गुंतवणुकीचा उद्देश असता कामा नये. महागाईपेक्षा अधिक परतावा मिळविणे हे तुमच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट असायला हवे. नेहाच्या विवाहाच्या खर्चाव्यतिरिक्त तुमच्या नियोजनात अन्य कुठल्याही मोठय़ा खर्चाचे नियोजन नाही. तुम्हा दोघांनासुद्धा तुमच्या बँकेकडून आरोग्यविम्याची सेवा उपलब्ध असताना इतक्या मोठय़ा रोकडसुलभतेची आवश्यकता नाही. निशा यांनी १० टक्के लिक्विड फंडाच्या ‘इन्स्टंट रिडम्प्शन’ सुविधा असलेल्या फंडात गुंतविणे योग्य ठरेल. लिक्विड फंडातून एकावेळी कमाल ५०,००० रुपये काढता येतात. त्यामुळे दोन लिक्विड फंडात गुंतवणूक असल्यास प्रसंगी एक लाख रुपयांची रोकडसुलभता त्यांना राखता येईल. एका वर्षांने जितक्या पैशाची आवश्यकता भासेल तितके पैसे इक्विटी सेव्हिंग्ज फंडात गुंतवावे. इक्विटी सेव्हिंग्ज फंड हे रोखे समभाग आर्ब्रिटाज या तीन प्रकारात गुंतवणूक करतात. समभाग आणि आर्ब्रिटाज या दोन पर्यायांतील गुंतवणूक एकूण गुंतवणुकीच्या ६५ टक्क्यांपेक्षा कमी नसल्याने या फंडाच्या एका वर्षांपश्चातच्या भांडवली वृद्धीवर आयकर द्यावा लागत नाही. या फंडांनी मागील वर्षभरात ११ ते ८.५ टक्क्यांदरम्यान परतावा दिलेला आहे. तातडीची गरज आणि एक वर्षांनंतर गरज असलेल्या पैशाची तजवीज केल्यानंतर उर्वरित ७५ टक्के निधी हा भविष्यातील भांडवली वृद्धीकरिता गुंतवायला हवा.

निष्कर्ष 

गुंतवणुकीतील तुमची जोखीम सहन करण्याची क्षमता (रिस्क प्रोफाईल) निश्चित केल्यानंतर तुमच्या गुंतवणुकीत कोणते फंड असावे आणि त्यांचे काय प्रमाण असावे हे निश्चित करता येईल. तुम्ही मध्यममार्गी (मॉडरेट) गुंतवणूकदार असाल तर तुमच्या गुंतवणुकीत वर उल्लेख केल्यानुसार दोन लिक्विड फंड, एक इक्विटी सेव्हिंग्ज फंडाव्यतिरिक्त तीन ते चार बॅलन्स्ड फंड आणि एक ईएलएसएस फंड असावा. मागे जाऊन पाहिल्यास, या अशा प्रकारच्या पोर्टफोलिओने मागील पाच वर्षांत १३.२२ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. ही गुंतवणूक महागाईवर मात करणारी आहेच, परंतु महागाईवर मात करण्याच्या जोडीला कर कार्यक्षमसुद्धा आहे. त्यामुळे संपत्ती निर्मिती आणि कर कार्यक्षमता या दोन्ही गोष्टी साध्य झाल्या आहेत. ही गुंतवणूक बँकांच्या मुदत ठेवींपेक्षा अधिक परतावा आणि अधिक कर कार्यक्षम आहे.

arthmanas@expressindia.com

(सूचना : लेखातील कुटुंबाचे गुंतवणुकीचे नियोजन हे प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे.)

Disclaimer: Mutual fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully