अर्धा डझन कच्चे लिंबू !   भाग – ९

आजच्या सदरामधे आपल्याला गुंतवणुकीचे मार्गदर्शन करणार आहे कुमारी प्रिया. प्रिया ३१ वर्षांची असून माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात गेली नऊ वर्षे काम करत आहे. तिचे कुटुंब अगदी मध्यमवर्गीय – वडील, आई आणि मोठी बहीण. पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर एका चांगल्या कंपनीत नोकरीला लागली.

पगार मिळायच्या आधी तिची खरेदीची यादी तयार! आयपॉड, आयफोन, लॅपटॉप, कॅमेरा आणि काय काय.. त्यात भर पडली ती इंटरनेटवरच्या खरेदीची – फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, मिन्त्रा सारख्या वेबसाइट जणू काय हिच्या नोकरीला लागण्याची वाट बघत होत्या. अजून धम्माल तर क्रेडिट कार्ड मिळाल्यावर सुरू झाली. गरज नसतानाही फक्त सेल लागलाय म्हणून गोष्टी विकत घेणं हा जणू एक नवा छंद तिला लागला. या सगळ्यांच्या विळख्यात ती कशी आणि किती गुरफटत गेली हे तिलासुद्धा कळले नाही. तिची मोठी बहीण तिला नेहमीच सांगायची की खर्च कमी करून पैसे सांभाळ, पण ती प्रत्येक वेळी बँकेत जमवलेल्या ठेवी दाखवून विषय संपवायची.

स्वत:च्या कामाबद्धल ती फार सजग आणि उत्साही आहे. पण जेव्हा गोष्ट असते स्वत:च्या पैशाचं गणित मांडायची, तेव्हा ती जरा एक हात लांब राहायची. शिवाय आई-वडील यांची बचत फक्त बँकेत असायची. त्यामुळे गुंतवणुकीच्या इतर पर्यायांची काहीच माहिती आधीही नव्हती आणि कधी मिळवलीसुद्धा नाही. तिची अशी इच्छा होती की, तिने पैसे कमवावे आणि तिच्या बँकेने ते सांभाळावे. म्हणजे काय की ती फक्त नोकरी करणार आणि तिची बँक तिचा पैसा वाढवणार यावर तिचा ठाम विश्वास होता.

आपला पैसा आपण सांभाळावा आणि वाढवावा लागतो हे तिला खालील अनपेक्षित गोष्टी घडल्यानंतर उमजले..

तिचा घटस्फोट : अगदी ध्यानीमनी नसताना हा एक मोठा धक्का तिला आयुष्यात फार लवकर सहन करावा लागला. लग्न होईपर्यंत वाचवलेले सगळे पैसे तिने लग्नात खर्च केले आणि अक्षरश: पुन्हा शून्यापासून सुरुवात करायची वेळ तिच्यावर आली.

वडिलांचे आजारपण : वडिलांना हृदयाचा त्रास सुरू झाला आणि अँजिओ करावी लागली. ज्या घरात तिचं कुटुंब राहात होतं, ते वडिलांना रोज चढ-उतार करायला गैरसोयीचं असल्यामुळे ते विकून दुसरीकडे राहायचा निर्णय घ्यावा लागला. परंतु नवीन घर हातात येईपर्यंत भाडय़ाच्या घरात राहायची वेळ आली. आणि त्यामागे चांगलाच खर्च होऊ लागला.

वडिलांची मणक्याची शस्त्रक्रिया : वडिलांच्या या अचानकपणे उद्भवलेल्या ऑपरेशनने तिचे डोळे खाड्कन उघडायचं काम केले. आरोग्य विमा आणि आपत्कालीन निधी का महत्त्वाचे याची जाण तिला शस्त्रक्रियेचा खर्च बघितल्यावर झाली.

स्वत:चे घर : भाडय़ाच्या घरात राहात असताना तिला इच्छा झाली स्वत:चं घर घेण्याची. आई-वडील पण खूश झाले. चला आता तिचा पैसा कारणी लागेल. पण जेव्हा घर घ्यायला गेली तेव्हा लक्षात आले की कर्ज ८० टक्केच मिळत होते आणि उरलेले २० टक्के देण्यासाठी तिच्याकडे पैसे पुरे पडत नव्हते. तोवर वडीलसुद्धा सेवानिवृत्त झाले असल्यामुळे त्यांच्याकडेसुद्धा पैसे मागणे तिला उचित वाटत नव्हते. त्या वेळी मग तिने वाढीव पगारासाठी नोकरी बदलायचा निर्णय घेतला आणि डाऊन-पेमेंटसाठी पैसे साठवायला सुरुवात केली.

वरील सगळ्या घटनांमुळे तिच्या आयुष्याला दर वेळी एक नवीन वळण मिळत गेले. तिच्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांची तिला जाणीव झाली आणि हळूहळू तिने स्वत:ला आणि स्वत:च्या पैशाला शिस्त लावायला सुरुवात केली. पुढे आयुष्यात तिला काय हवे याची तिने एक यादी तयार केली आणि मग गेली एका आर्थिक सल्लागाराकडे. मिळालेल्या सल्ल्यानुसार तिने खालील गोष्टी केल्या :

* आयुर्विमा

सुरुवातीच्या आयुष्यात बचतीची सुरुवात झाली ती आयुर्विम्यामुळे. दरमहा हप्त्याचे पैसे बाजूला काढून ठेवण्यामध्ये एक शिस्त होती. परंतु कुणी तरी काढायला लावली म्हणून पॉलिसी काढली आणि पैसे गुंतवले असे झाले होते. अनेक वर्षे चालू असलेल्या विमा पॉलिसी पुरेशा नसल्यामुळे आणि आर्थिक जबाबदारी जास्त असल्यामुळे उशिराने का होईना, तिने टर्म प्लान घेतला. तिच्यावर असलेल्या गृहकर्जाची आणि तिच्या आई-वडिलांच्या आर्थिक सक्षमतेसाठी तिने हे पाऊल उचलले.

* आरोग्य विमा

तिने आरोग्य विम्याकडे कधी बघितलेच नव्हते. वडिलांची अँजिओ झाली त्या वेळी तिच्या बहिणीच्या मेडिक्लेममध्ये तो खर्च निभावून गेला होता. पण जेव्हा वडिलांच्या  मणक्याची शस्त्रक्रिया अचानकपणे करायची वेळ आली, तेव्हा मात्र तिला चांगलेच टेन्शन आले. कारण तिच्या कंपनीच्या मेडिक्लेममध्ये फक्त निम्माच खर्च निघत होता. बाकीच्या पैशाची सांगड कशी घालायची हे काही कळेना. सुदैवाने त्या वेळी तिच्या मेहुण्याने त्यांचा आरोग्य विमा काढलेला होता आणि दोन्हीकडे क्लेम करून पैसे पुरले. नाहीतर चांगलाच फटका बसायची वेळ आली होती. या घटनेनंतर तिने ताबडतोब आई आणि वडील दोघांचे आरोग्य विम्याचे कवच वाढविले. सुदैवाने एका वर्षांतच आईच्या शस्त्रक्रियेसाठी तिला त्याचा आधार मिळाला. पण फ्लोटर कव्हर कमी पडल्यामुळे थोडे पैसे खिशातून द्यावे लागले.

*  स्वत:चे घर

तिने बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी घर घ्यायचे ठरविले. त्यामुळे स्वस्त मिळाले, पण उशिरा ताबा मिळाल्यामुळे व्याज जास्त द्यावे लागले. शिवाय नीट चौकशी न केल्याने बिल्डरने सांगितलेल्या वित्त कंपनीकडून अधिक व्याजावर कर्ज घेतले. दोन वर्षांनी जेव्हा तिच्या बहिणीने तिला लक्षात आणून दिले तेव्हा तिने कर्ज दुसऱ्या कमी व्याजदराच्या बँकेत फिरविले. दीड टक्के इतके व्याज वाचवून कर्जाचा हप्ता कमी केला.

*  म्युच्युअल फंड

आजही तिला म्युचुअल फंड काय आहे हे समजत नाही. पण तिने नेमलेल्या सल्लागाराने तिच्यासाठी व्यवस्थित नियोजन करून तिला एसआयपी सुरू करून दिल्या आहेत. कर वाचविण्यासाठी एप्रिल महिन्यापासून ‘ईएलएसएस’मध्ये एसआयपी पद्धतीने गुंतवणूक सुरू केली आहे. तिच्या गेल्या वर्षभराच्या गुंतवणुकीचे परतावे २२ टक्के आहेत.

*  शेअर्स

हे क्षेत्र तर तिच्यासाठी एखादी परकीय भाषा असल्यागत आहे, परंतु तिच्या सल्लागाराने तिला चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये हळूहळू गुंतवणूक करायला समजावलं. त्याच्या सल्ल्यानुसार केलेल्या शेअर्समधल्या गुंतवणुकीतून तिला ६७ टक्के इतका परतावा मिळालेला आहे.

या पुढे आयुष्यात तिने शिस्तबद्ध पद्धतीने आगेकूच करायचं ठरविले आहे, ते असे :

* दीर्घकालीन आर्थिक नियोजन

स्वत:च्या घरात राहायला गेल्यानंतर तिने तिच्या भविष्याचा डोळसपणे विचार करायला सुरुवात केली. आतापर्यंत पैसे आले आणि गेले असा व्यवहार करून तिने स्वत:चे बरेच नुकसान करून घेतले होते. म्हणून या पुढे नीट विचार आणि चौकशी करून मगच गुंतवणूक करायचे मनाशी पक्के केले. जे समजत नाही ते सल्लागाराला विचारून करायचा निर्णय ठाम करून तिने तिचे आर्थिक नियोजन करायला सुरुवात केली. आपल्या पुढील आयुष्यात काय कमवायचे आहे आणि निवृत्तिपश्चात जीवनाची सोय कशी करायची आहे हे सगळे तिने लिहून काढले आणि त्यानुसार गुंतवणूक करायला सुरुवात केली.

*  पै पै चा विचार

आता कुठेही पैसे खर्च किंवा गुंतवणूक करतेवेळी ती हा प्रश्न स्वत:ला विचारते – मला याची खरेच गरज आहे का? मला ही गुंतवणूक उपयोगाची आहे का? यामुळे चुकीचे गुंतवणूक पर्याय गळ्यात घालणाऱ्या लोकांना आपल्यापासून लांब ठेवायला ती आता शिकली आहे.

* गुंतवणूक पडताळा

दर महिनाअखेरी ती तिच्या सल्लागाराकडून केलेल्या गुंतवणुकीचा पडताळा करून घेते. आपली गुंतवणूक ठरल्याप्रमाणे होतेय का आणि केलेली गुंतवणूक अपेक्षेप्रमाणे परतावे देतेय का, या प्रश्नांची उत्तरे ती सल्लागाराकडून नियमित घेत असते. कधी ठरविलेली गुंतवणूक करूनसुद्धा महिन्याअखेरीला थोडे पैसे शिल्लक राहिले तर ते कुठे गुंतवायचे हेसुद्धा ती सल्ल्याशिवाय करत नाही. हे काम जरी खर्चीक असले तरी योग्य सल्ल्यासाठी ती पैसे मोजते. जे काम आपल्याला करता येत नाही, त्यासाठी पैसे मोजून काम करवून घेणे योग्य हे या मागचे उद्दिष्ट.

प्रियाला फिरण्याची खूप हौस आहे. तिने पुढे जाऊन एखादा गाळा घेऊन तो भाडय़ाने देण्याचासुद्धा विचार केला आहे. शिवाय आयुष्यात नुसती नोकरी करीत तिला नाही जगायचे आहे. जमले तर पुढच्या १५ वर्षांत स्वत:चे काहीतरी करायचे स्वप्न ती उराशी बाळगून आहे. हे सर्व ती आर्थिक नियोजनातून साकार करू शकेल असे आता तिला ठामपणे वाटू लागले आहे. विशीतल्या अल्लडपणातून बाहेर पडून तिने आता तिशीतल्या प्रगल्भतेकडे आत्मविश्वासाने वाटचाल केली आहे. तिच्यासारख्या एकटय़ा स्त्रियांना ती आज हेच सांगू इच्छिते की, स्वत:बरोबर आपल्या पैशाचीसुद्धा काळजी घेतली की आयुष्याचा प्रवास सुखकर होऊ शकतो. तिने रॉबर्ट कियोसाकी यांचे Rich Dad Poor Dad आणि सोफी किन्सेला यांचे Shopaholic ही पुस्तकेही सुचविली आहेत.

(टीप : गोपनीयता राखण्याकरता गुंतवणूकदार मैत्रिणीचे नाव बदलले आहे.)

तृप्ती राणे  trupti_vrane@yahoo.com