भारतामध्ये सल्ला फुकट मिळतो. सल्ला देणारा आपण सल्ला देण्यायोग्य आहोत किंवा कसे हा विचार न करता सल्ला देतो आणि ज्याला सल्ला दिला जातो तो सल्ला देणाऱ्याच्या ज्ञानाचा विचार न करता त्या सल्लय़ानुसार आपले निर्णय घेत असतो. डॉ. रवींद्र रेगे २०१० मध्ये  दुबईतील ३० पेक्षा अधिक वर्षांच्या वास्तव्यांनंतर भारतात कायम वास्तव्यासाठी परत आले. डॉ. रेगे यांनी परदेशातील दीड दोन कोटभराची बचत भारतात आणली.  खरे तर डॉ. रेगे यांनी व्यावसायिक वित्तीय नियोजकाला आपले आर्थिक नियोजन करण्यास सांगायला हवे होते. परंतु एका आगंतुकाने  डॉ. रेगे यांना त्यांची बचत बँकेच्या मुदत ठेवीत गुंतवण्याचा सल्ला दिला. बँकेची मुदत ठेव म्हणजे ‘सुरक्षित’ असा डॉक्टरांचा समज त्या ‘सल्लागारा’ने करून दिला. वास्तवात महागाईच्या दरामुळे व मुदत ठेवींच्या व्याजावर भराव्या लागलेल्या आयकरामुळे डॉक्टरांच्या बचतीची क्रयशक्ती निम्म्यापेक्षा कमी झाली आहे. डॉक्टरांनी केलेल्या एका १० लाखाच्या मुदत ठेवीचे आज १४.८७ लाख झाले आहेत. डॉक्टरांची बचत खरेच सुरक्षित आहे काय?

आपल्यावर लहानपणापासून अनेक कळत न कळत संस्कार होत असतात. यापैकी एक संस्कार म्हणजे बँक मुदत ठेवी म्हणजे सुरक्षित गुंतवणूक. मुलगा नोकरीला लागला आणि त्याचे बचत खाते उघडले की सर्वात आधी त्याला बँकेत आवर्ती ठेव खाते उघडण्याचा सल्ला दिला जातो. बदलत्या काळानुसार सर्वात पहिला संस्कार हवा तो बचतीवरील परतावा महागाईच्या दरापेक्षा अधिक असेल तरच त्या साधनांत गुंतवणूक करण्याचा. बचतीचा दर महागाईच्या दरापेक्षा अधिक नसेल तर बचतीचे क्रयमूल्य गमावण्याचा धोका अधिक असतो. मर्यादित जोखीम स्वीकारून बचतीचे क्रयमूल्य टिकवणे कधीही सुरक्षित गुंतवणुकीपेक्षा हिताचे असते. भारतात जी लोकप्रिय गुंतवणूक साधने आहेत ती सर्वच साधने निश्चित उत्पन्न देणारी आहेत. विमा उत्पादने व मुदतठेवी यांतील गुंतवणूक ही मार्केट लिंक्ड नसल्याने ही साधने लोकप्रिय आहेत. गुंतवणूक करताना मुदतपूर्तीसमयी किती रक्कम मिळणार हे ठाऊक असल्याने मुदत ठेवींबद्दल लोकांचा जिव्हाळा आहे. या व्यतिरिक्त स्थावर मालमत्ता व सोन यामध्ये भावनिक कारणांमुळे गुंतवणुकीला पसंत दिली जाते. परंतु विमा उत्पादने, मुदत ठेवी, सोने आणि स्थावर मालमत्ता या गुंतवणुकांवरील परताव्याचा दर हा महागाईच्या दराहून किमान २० ते ३० टक्के कमी आहे. साहजिकच बचतीची क्रयशक्ती कमी करणारी ही गुंतवणूक साधने आहेत.

बचत खात्याऐवजी म्युच्युअल फंडाचे लिक्विड फंड अधिक परतावा देणारे व सोयीचे आहेत. प्रत्येक फंड घराण्याच्या किमान एका फंडाला इन्स्टंट रिडम्प्शन सुविधा देणे ‘सेबी’ने सक्तीचे केले आहे. त्यामुळे ही गुंतवणूक खूप तरल आहे. इतकी त्यातून पैसा काढून घ्यायचे म्हटले तर अगदी पुढील १५ मिनिटांत बँक खात्यात पैसा जमाही झालेला दिसून येईल. लिक्विड फंड हे आधुनिक युगातील बचत खाते असून एका टिचकीवर गुंतवणूक करणे व लिक्विड फंडातून पैसे काढून घेणे शक्य झाले आहे. ज्या म्युच्युअल फंडाची मोबाईल अ‍ॅप आहेत त्या म्युच्युअल फंडांत मोबाईलचा वापर करून गुंतवणूक करणे शक्य आहे. त्या आधी ‘केवायसी’ प्रक्रियेचे अर्थात ओळख पटवून देणाऱ्या दस्तऐवज सादर करण्याचे सोपस्कार पूर्ण करणे गरजेचे आहे.

बँकांच्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर उगमस्थानीच कर (टीडीएस) कापला जातो तर बँकेच्या मुदत ठेवींऐवजी रोखे गुंतवणूक करणाऱ्या (डेट) म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे कधीही कर कार्यक्षम असते. रोखे गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुक ३ वर्षे काढून घेतली नाही तर  झालेला भांडवली नफा (कॅपिटल गेन) इंडेक्सेशनसाठी पात्र ठरतो. त्याआधी गुंतवणूक काढून घेतली तर अल्प मुदतीचा भांडवली वृद्धी कर (शॉर्ट टर्म कॅपिटल गेन) भरावा लागतो. बँकेच्या मुदत ठेवी मुदतपूर्व काढून घेतल्यास विहित व्याजापेक्षा कमी व्याज तर मिळते. शिवाय बँका ठेव मुदतपूर्व काढून घेतल्याबद्दल दंड (पेनल्टी) सुद्धा आकारतात. त्याउलट म्युच्युअल फंडांचे डेट फंड (रोखे गुंतवणूक करणारे फंड) हे बाजार संलग्न परतावा देतात. रोख्यांच्या किंमती मुख्यत्वे दर महिन्याला जाहीर होणारा महागाईचा दर रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण सरकारच्या वेगवेगळ्या घोषणाच्या परिणामांनुसार खालीवर होत असतात. महागाईचा दर कमी झाला तर आनंदाने उसळी मारतात व रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदरात वाढ केल्यास खाली जातात. देशातील सर्वात मोठा रोखे विक्रेता भारत सरकार आहे त्या खालोखाल विविध राज्ये आपल्या खर्चासाठी रोखे विकून निधी उभारत असतात. या रोख्यांवर रिझव्‍‌र्ह बँकेचे संपूर्ण नियंत्रण असते. पर्यायाने केंद्र सरकारने वेळेवर व्याज आणि मुदतपूर्तीनंतर मुद्दल देण्याची हमी दिलेली असते. केंद्र व राज्य सरकारच्या रोख्यांच्या व्यवहारावर रिझव्‍‌र्ह बँकेच्या पब्लिक डेट ऑफिसचे नियंत्रण असते. महागाईच्या दराहून अधिक परतावा मिळवायचा तर रोखे व समभाग यांचा मिलाफ साधायला हवा. अशा गुंतवणुकीतून बचतीची वृद्धी आणि स्थैर्य यांचे संतुलन मिलाफ साधता येतो. वित्तीय नियोजनात समभाग व रोखे यांचे प्रमाण किती असावे याचा ढोबळ अंदाज शंभर उणे सध्याचे वय असा मांडता येतो. म्हणजे  व्यक्तीचे आजचे वय ४५ असेल तर त्याची ५५ टक्के रक्कम समभाग गुंतवणुकीत असावी व ४५ टक्के रक्कम रोखे गुंतवणुकीत असावी.

समभाग गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड एक आदर्श पर्याय आहे. त्यातही नियोजनबद्ध गुंतवणुकीचा (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान – एसआयपी) अवलंब केल्यास दरमहा लहान रकमेच्या गुंतवणूकीतून मोठी वित्तीय ध्येये गाठता येतात. सेवानिवृत्ती, मुलांची शिक्षणे, अशक्य वाटणारी तरी जोपासलेली स्वप्ने, राहून गेलेले छंद यासाठी मोठी रक्कम जमवण्याचे सामर्थ्य समभाग गुंतवणुकीत आहे. मुद्दल गमावण्याच्या धोक्यापेक्षा महागाईमुळे बचतीची क्रयशक्ती कमी होण्याचा धोका अधिक गंभीर आहे. म्हणून महागाईच्या दराहून अधिक परतावा मिळाला तरच बचत फलद्रुप होते.

महागाईच्या दरापेक्षा अधिक परतावा मिळवायचा असेल तर गुंतवणुकीत रोखे आणि समभाग यांचा समतोल साधायला हवा. हा समतोल साधण्यासाठी गुंतवणूकदाराच्या जोखीम सहन करण्याच्या क्षमतेनुसार म्युच्युअल फंडांचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. समभाग गुंतवणुकीसाठी लार्ज कॅप पासून नॅनो कॅपपर्यंत आणि रोखे गुंतवणुकीत लिक्विड फंडापासून क्रेडिट अपॉच्र्युनिटी फंडापर्यंत जोखीम आणि परतावा यांचा मेळ घालणारे हे पर्याय आहेत.

निष्कर्ष : डॉ. रेगे यांच्या बाबत जे घडले ते तुमच्या बाबतीत घडू नये, यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. म्युच्युअल फंडांच्या रोखे व समभाग योजनांचा योग्य मेळ साधल्यास महागाईमुळे बचतीची क्रयशक्ती घटण्यापासून बचाव करता येईलच. परंतु उत्तम कर नियोजनाचाही लाभ घेता येईल,  हे नक्की.

हे लक्षात घ्या..

*  मुदत ठेवींवरील व्याजावर उद्गम कर (टीडीएस) कापला जातो.

*  रोखे योजनांचा कस हा या गुंतवणुकीतील सुरक्षितता, तरलता आणि परतावा या निकषांवर जोखला जायला हवा. एखाद्या रोखे योजनेच्या सुरक्षितेबाबत किंचितसा संशय जरी असेल तरी तिच्याकडे पाठ फिरविणे उत्तम.

*  रोखे योजनेचा तरलता हा सर्वात मोठा गुणविशेष आहे, पण तरलताच नसेल तर अशा योजनेत पैसे घालणे टाळले पाहिजे.

*  सुरक्षितता आणि तरलतेच्या पायऱ्या चढल्यानंतर, तिसरी पायरी ही परताव्याची आहे. परंतु होते नेमके उलटेच. अनेक गुंतवणूक परताव्याचे प्रमाण आधी पाहतात आणि ते जास्त असले की तडक गुंतवणूक करायला सरसावतात.

*  किंबहुना पैसा टाकल्यावर रोखे योजनेतून भरमसाट परताव्याची अपेक्षा नसावी. रोखे योजनांतून प्रचलित महागाई दरापेक्षा १ टक्का व काहीसा अधिक परतावाही समाधानकारक मानता येईल.

*  काळजीपूर्वक गुंतवणूक आणि फेर आढावा घेत राहिल्यास तुलनेने सुरक्षित आणि चांगल्या परताव्याचे हे साधन निश्चितच आहे.

व्यापार प्रतिनिधी arthmanas@expressindia.com

Disclaimer: Mutual fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.