तीन दिवस चालणाऱ्या ७ व्या इंडियन रबर एक्स्पो २०१३ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व परिषदेला तसेच खरेदीदार-विक्रेता मेळ्याला आजपासून मुंबई प्रदर्शन संकुलात सुरुवात झाली. भारतासह जगभरातून ५५० हून अधिक कंपन्या सामिल झालेल्या ‘आयआरई २०१३’ हे प्रदर्शन तब्बल ३०,००० चौरस मीटर क्षेत्रफळावर विस्तारले असून, विविध ४२ देशांमधून २५,००० च्या आसपास प्रेक्षक-प्रतिनिधींनी प्रदर्शनाला भेट देणे अपेक्षित आहे.
अमेरिका, मध्य अमेरिका, युरोप आणि आशियाई देशांमधून मोठय़ा संख्येने शिष्टमंडळे ‘आयआरई’साठी दाखल झाली असून, परिषदेतील विविध तांत्रिक सत्रांनाही ते हजेरी लावणार आहेत. ट्रेड रबर उत्पादनात, रिट्रेडिंग आणि रबर कम्पाऊंड मिक्सिंग या क्षेत्रात कार्यरत मंडळींसाठी हे प्रदर्शन म्हणजे पर्वणीच ठरणार आहे. ‘आयआरई २०१३’च्या बरोबरीने यंदा टायर शोचेही आयोजन केले गेले आहे. यंदा होत असलेल्या विविध कार्यशाळा म्हणजे या उपक्रमाचे सर्वाधिक उपयुक्त वैशिष्टय़ ठरेल. या कार्यशाळा आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून चालविल्या जाणार असून, त्यानंतर होणाऱ्या चर्चा-परिसंवादांमध्ये मिक्सिंग आणि रिट्रेडिंग तंत्रज्ञान, टायर आणि उपकरण निर्मिती, कम्पाऊंडिंग विशेषज्ज्ञ, मानक संस्थांचे सदस्य, ट्रेड रबर निर्माते व दुरूस्ती सामग्री यामधील विविध तज्ज्ञ व तंत्रज्ञांचा समावेश असेल. त्याचप्रमाणे सध्याच्या पर्यावरण संरक्षणविषयक नियमावली आणि रबर उद्योगाशी निगडित ताज्या घडामोडी जसे पर्यायी सामग्रीचा निर्मितीत वापर वगैरे विषयी विविध तज्ज्ञ वक्ते मार्गदर्शक म्हणूनही लाभले आहेत.
याच प्रदर्शनादरम्यान खरेदीदार-विक्रेता मेळ्याचे प्रथमच कॅपेक्सिल (केमिकल्स अॅण्ड अलाइड प्रॉडक्ट्स एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल) कडून आयोजन करण्यात आले असून, त्यायोगे युरोपसह अमेरिका व अन्य काही देशातील सुमारे ३० हून अधिक आंतरराष्ट्रीय आयातदारांची भारतातील संभाव्य पुरवठादारांशी आमने-सामने बसून बातचीत घडविली जाणार आहे. जेणेकरून भारतातून निर्यातीच्या संधींना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच, भारताच्या निर्यात सूचीत आणखी उत्पादनांची गुणात्मक भर घातली जाणार आहे.
टायर उत्पादनात (२८%) आणि टायर निर्यातीत (१८%) असा वर्षांगणिक उमदा वृद्धीदर असलेला भारतीय रबर उद्योग उत्तरोत्तर सशक्त बनण्याबरोबरच, जागतिक अर्थकारणात भारताचे योगदान उंचावण्यात महत्त्वाची भूमिका निभावत आहे. भारत आजच्या घडीला नैसर्गिक रबराचा सर्वात मोठा उत्पादक त्याचप्रमाणे जगातील तिसरा मोठा वापरकर्ता देशही आहे. जगातील एक सर्वाधिक वेगाने वधारत असलेली       अर्थव्यवस्था या नात्याने रबर उद्योगक्षेत्रात आणखी विस्तारासाठी आपल्याला मुबलक वाव दिसून येतो, असे या प्रदर्शनाचे आयोजन करणाऱ्या ऑल  इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशन (एआयआरआयए)चे अध्यक्ष नीरज ठक्कर यांनी सांगितले.
यंदा प्रथमच या प्रदर्शनात लघू व मध्यम उद्योगक्षेत्रातूनही मोठय़ा प्रमाणात सहभाग दिसून येणार आहे. हे प्रदर्शन म्हणजे त्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी मोठे व्यासपीठच केवळ ठरणार नाही, तर याच प्रदर्शनात रबर उत्पादनांच्या बडय़ा ग्राहकांनाही आमंत्रित केले गेले असल्याने त्यांच्यासाठी सर्वोत्तम व्यवसाय संधी मिळवून देणारे माध्यमही ठरेल, असेही ठक्कर यांनी स्पष्ट केले. ‘आयआरई २०१३’ला भारतीय रबर मंडळ, ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन या संघटनांचे पाठबळ लाभले असून, अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने त्याला प्रमाणित केले आहे.