सरकारी बँकांच्या खासगीकरणाचा तसेच सरकार कामगारविरोधी धोरणे राबवीत असल्याचा आक्षेप नोंदवीत एक दिवसाच्या संपावर गेलेल्या बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे बँकिंग व्यवहार मंगळवारी ठप्प पडले. सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील काही बँका या संपात सहभागी झाल्याने ऐन महिन्याच्या अखेरीस  बँक ग्राहक, खातेदारांना मनस्ताप सहन करावा लागला. प्राथमिक आकडेवारीनुसार, एक दिवसाच्या बँक कर्मचारी संघटनांच्या आंदोलनामुळे एक लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज ‘अ‍ॅसोचेम’ या उद्योग संघटनेने व्यक्त केला आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी काही बँकांच्या शाखा तसेच एटीएम ठप्प पडले होते. परिणामी त्यांच्यामार्फत होणाऱ्या व्यवहारावरही विपरीत परिणाम झाला. आपल्या नेहमीच्या मागण्यांबरोबरच निश्चलनीकरण कालावधीत कर्मचाऱ्यांनी केलेल्या अतिरिक्त कामाचा मोबदला देण्याचीही आंदोलकांची मागणी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तसेच खासगी क्षेत्रातील बँकांचे व्यवहार मात्र नियमितपणे सुरू असल्याचा दावाही संबंधित बँक व्यवस्थापनाने केला आहे. प्रस्तावित संपामुळे बँकांचे कामकाज विस्कळीत होण्याबाबत बँकांनी दोनच दिवसांपूर्वी तमाम खातेदारांना सावध केले होते.

अ‍ॅसोचेमने मंगळवारच्या संपामुळे बँकांचे एक लाख कोटी रुपयांहूनचे व्यवहार ठप्प पडल्याचे नमूद केले आहे. बँकांच्या पतपुरवठय़ाबाबतही १,६०० कोटी रुपयांच्या व्यवहारांवर परिणाम झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. बुधवारी कर्मचाऱ्यांचे  मासिर वेतन तसेच निवृत्तिधारकांचे निवृत्तिवेतन दिले जात असल्याने बँकांच्या कामकाजावर आता अधिक ताण येण्याची शक्यता आहे.

४० लाख धनादेश रखडले

  • ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’च्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या या संपात सर्व २७ सार्वजनिक क्षेत्रातील बँका, १८ खासगी बँका, ५६ ग्रामीण क्षेत्रीय बँका व सहकारी बँकांसह, ८ विदेशी बँकांच्या एक लाख ९० हजार शाखांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. सुमारे १० लाख कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला, असे ‘एआयबीईए’ या संपकरी संघटनेचे महासचिव सी. एच. वेंकटचलम यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये स्पष्ट केले. २२,००० कोटी रकमेच्या ४० लाख धनादेशांची वठणावळीचे काम रखडल्याचा त्यांनी दावा केला. मंगळवारच्या संपापासून संघप्रणीत बँक कर्मचारी व अधिकारी संघटनांनी फारकत घेतली होती. ‘नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स’ (नोबो) व ‘नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स’ने (एनओबीडब्ल्यू) या दोन संघटना भारतीय मजदूर संघाशी संलग्न आहेत. या संघटनांचे मिळून ४०,००० कर्मचारी सदस्य असल्याचे सांगितले जाते.