सध्या वार्षिक ११ टक्क्य़ांच्या घरात असलेले गृह कर्ज व्याजदर बँकांकडून आणखी कमी केले जाण्याची शक्यता रिझव्र्ह बँकेच्या संक्रात मुहूर्तावरील पतधोरण बाह्य़ निर्णयामुळे निर्माण झाली आहे. यामुळे गृह कर्जदारांचा मासिक हप्ता काही प्रमाणात शिथिल होऊ शकेल.
सरकारी बँकांमध्ये सर्वाधिक अनुत्पादक मालमत्तेचा सामना करणाऱ्या युनायटेड बँक ऑफ इंडियाने लगेचच पाव टक्का कर्ज व्याजदर कमी केला. बँकेचा आधार दर आता १०.२५ टक्क्य़ांऐवजी १० टक्के असेल. यामुळे बँकेचे विविध कर्ज या प्रमाणात स्वस्त झाले आहे. देशातील सर्वात मोठय़ा स्टेट बँकेनेही व्याजदर कपातीचे संकेत दिले आहेत. बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी बँक कर्ज तसेच ठेवींवरील व्याजदराबाबत e01लवकरच निर्णय घेईल, असे स्पष्ट केले आहे. व्याजदर कपातीचे वातावरण आता निर्माण झाले आहे, असेही त्या म्हणाल्या.
आघाडीच्या आयसीआयसीआय या खासगी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनीही रिझव्र्ह बँकेकडून आणखी व्याजदर कपात होण्याची शक्यता वर्तवीत त्याचा लाभ आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे संकेत दिले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एस. मुनोत यांनीही व्याजदर कपातीवर भर देण्यात येईल, असे म्हटले आहे. बँकेने यापूर्वीच ०.१५ टक्के व्याजदर कमी केला आहे, असे नमूद करून उद्योग क्षेत्राला नवा दिलासा दिला जाऊ शकतो, असे म्हटले आहे.
एचडीएफसी बँकेच्या प्रधान अर्थतज्ज्ञ ज्योतिंदर कौर म्हणाल्या की, अपेक्षेपेक्षा आधी व्याजदर कपात करून रिझव्र्ह बँकेने आपले पतधोरण ध्येयच स्पष्ट केले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या कमी महागाई दराने रिझव्र्ह बँकेला व्याजदर कपात करण्यास प्रवृत्त केले, असे म्हणता येईल.
येस बँकेचे अध्यक्ष राणा कपूर म्हणाले की, अर्थविकासाला चालना आणि गुंतवणूकपूरक वातावरणाच्या दिशने मध्यवर्ती बँकेचे पाऊल पडले आहे. मार्च २०१६ पर्यंत दोन टक्के व्याजदर कपात होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले. सरकारचे असे निर्णय देशाचा अर्थवेग ८ टक्क्य़ांपर्यंत नेईल, असेही ते म्हणाले.
कोटक महिंद्र बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ इंद्रनील पान यांनी म्हटले आहे की, वर्षांतील पहिली व्याजदर कपात रिझव्र्ह बँकेकडून झाली आहे. येणाऱ्या प्रत्येक टप्प्यात प्रत्येकी पाव टक्क्य़ाची व्याजदर कपात आम्ही आणखी गृहीत धरत आहोत. अशा तऱ्हेने आगामी कालावधीत पाऊण ते एक टक्का व्याजदर शिथिलता येऊ शकते.
डीबीएस बँकेच्या अर्थतज्ज्ञ राधिका राव यांनी नमूद केले की, व्याजदर कपातीची रिझव्र्ह बँकेची वेळ निश्चितच आश्चर्यकारक आहे. डिसेंबरमध्ये वाढती महागाई समोर ठेवून रिझव्र्ह बँक काहीशी कठोर बनली होती, मात्र आताच्या दर कपातीमुळे नव्या आर्थिक वर्षांत अध्र्या टक्का व्याजदर कपात होऊ शकते.