पर्यटन स्थळांवर वाय-फाय सुविधा आणि स्काइप केंद्र उभारण्यासाठी एक हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची योजना आखली असल्याची माहिती बीएसएनएलचे संचालक एन. के. गुप्ता यांनी दिली.
बीएसएनएलने यासाठी अनेक उपाययोजना हाती घेतल्या असून गेल्याच आठवडय़ात आम्ही लॅण्डलाइन ग्राहकांना अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. वाय-फाय केंद्रांसाठी दक्षिण परिमंडळातील १४ पर्यटन स्थळे निश्चित करण्यात आली आहेत, असेही गुप्ता यांनी सांगितले.
बीएसएनएलच्या या योजनांसाठी एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक गरजेची आहे आणि त्यासाठी पाच-सहा महिन्यांचा कालावधी लागेल. सध्या बीएसएनएलने अहमदाबाद, फरिदाबाद आणि हैदराबाद येथे अशा प्रकारची केंद्रे उभारली आहेत, असेही ते म्हणाले.
सीटीआरएलएस ही कंपनी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार आहे, तर बीएसएनएल सेवेसाठी बॅण्डविड्थ आणि सेवेसाठी आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार आहे. सीटीआरएलएस आणि बीएसएनएल यामधील महसुलाचे भागीदार राहतील.