यंदा व्यापारी-उत्पादकांसाठी उत्साहहीन दिवाळी!

वस्तू व सेवा करासारख्या नवीन अप्रत्यक्ष करप्रणालीसह, नोटाबंदीच्या चटक्यांचे सामान्यांप्रमाणेच व्यापार-उद्योग क्षेत्रावर परिणामांची छाया सणोत्सवापर्यंत कायम राहिल्याचे दिसून आले. २०७४चे हिंदू संवत्सर गुरुवारी सुरू झाले असताना उत्पादक, निर्माते, मोठे व्यापारी तसेच किरकोळ दुकानदार यंदाची दिवाळीत निरुत्साहच अनुभवत असल्याचे आढळून आले.

readers comments on loksatta editorial
लोकमानस : अन्न सुरक्षा यंत्रणांचे पितळ उघडे
Competition among 7 companies under incentive scheme for ACC production
‘एसीसी’ उत्पादनासाठी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७ कंपन्यांमध्ये चढाओढ
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
amravati orange producer farmers marathi news
गुढीपाडव्याची पहाट संत्री उत्पादकांसाठी ठरली भयावह; गारपिटीमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज

वर्षभरापूर्वी नोटाबंदी दिवाळीनंतर जाहीर झाली होती. मात्र यामुळे अर्थव्यवस्थेत रोकडटंचाई निर्माण होऊन व्यापाऱ्यांनाही रोखीने व्यवहार करणे कठीण होऊन बसले होते. ही परिस्थिती निवळत नाही तोच वस्तू व सेवा कराची मात्रा जुलैपासून लागू झाली. नव्या आर्थिक वर्षांच्या दुसऱ्याच तिमाहीपासून लागू झालेल्या या ऐतिहासिक अप्रत्यक्ष करप्रणालीमुळे व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली.

रोजगाराबाबतची अनिश्चितता, महागाई यामुळे ग्राहकवर्गाकडून यंदा प्रतिसाद नव्हता. परिणामी व्यापाऱ्यांनीही या कालावधीत उत्पादनाची कमी मागणी नोंदविली. तर उत्पादन निर्मात्या कंपन्यांनी वस्तूंचे कमी उत्पादन घेतले. यामुळे यंदाच्या दिवाळीतही नव्या मालाची कमतरता बाजारात जाणवत आहे. केवळ निमित्त म्हणून यंदाच्या दिवाळीला दुकाने ‘सजली’ आहेत; मात्र या सणोत्सवापासून मागणीला, क्रयशक्तीला तसेच बाजाराला व अप्रत्यक्षपणे अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याबाबत व्यापार, उद्योग क्षेत्रातून साशंकता व्यक्त केली जात आहे.

किरकोळ तसेच घाऊक बाजाराच्या तुलनेत सध्या ऑनलाइन मंचावर वस्तूंची खरेदी-विक्री मोठय़ा प्रमाणात होत आहे. पर्यावरण जागरूकतेमुळे यंदा फटाक्यांची विक्रीही कमी होत असल्याचे सांगितले जाते. तसेच विशेषत: सजावटीच्या वस्तूंमध्ये चिनी उत्पादनांकरिता असलेली मागणी यंदा रोडावल्याचे व्यापारी सांगतात.

सराफ बाजाराची लकाकी लुप्त

मौल्यवान धातूकरिता असलेल्या खरेदीदारांच्या हौसमागणीवर सरकारने आणलेल्या र्निबधांचा विपरीत परिणाम यंदा सराफ क्षेत्रावर दिसून आला. नोटाबंदी जाहीर होण्याच्या तास-दोन तासाच्या अवधीत मिनिटाचीही सवड न मिळालेल्या सराफ व्यावसायिकांना पुढील कालावधी मात्र संथ गेला. हे चित्र अगदी यंदाचा दसरा, चालू आठवडय़ातील धनत्रयोदशीपर्यंत कायम होते. परिणामी चालू वर्षांत सोन्याचे व्यवहार ७०० टनाच्या खाली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एरवी भारत हा १,००० टन सोने मागणी नोंदविणारा देश आहे.

स्थावर मालमत्ता क्षेत्राचे कंबरडे मोडले

नोटाबंदीपूर्वीपासून मंदीत असलेल्या स्थावर मालमत्ता क्षेत्राचे नोटाबंदीने कंबरडेच मोडले. मोठय़ा प्रमाणात रोखीने व्यवहार होणाऱ्या या क्षेत्रावर रेरा या नव्या नियमावलीनेही गंडांतर आणले. मागणी कमी व पुरवठा अधिक अशा वातावरणात घरांचे दर स्थिर असूनही या क्षेत्राला चालू वर्षांच्या गुढीपाडवा, दसरा आणि आता दिवाळीलाही उभारी मिळू शकली नाही.

वाहन क्षेत्र जोमात

दिवाळीत विशेष मागणी असणाऱ्या क्षेत्रापैकी वाहन क्षेत्राने तुलनेने चांगले दिवस अनुभवले. या क्षेत्रालाही वस्तू व सेवा करासह वाढीव अधिभाराचा सामना करावा लागत आहे. मात्र देशातील वाहन क्षेत्राने दसरा अर्थात सप्टेंबरसह दिवाळीतील ऑक्टोबरमध्येही  उत्तम व्यवसाय नोंदविला आहे.

आधी नोटाबंदी आणि नंतर वस्तू व सेवा करप्रणाली यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंता आहे. बाजारभावनेवर विपरीत परिणाम करणाऱ्या घटना होऊन आता काही महिने झाले आहेत. मात्र वातावरणातील भीतीत बदल झालेला नाही. सरकार स्तरावर या दिशेने काही सकारात्मक पावले पडल्यास नव्या हिंदू संवस्तरात चित्र बदलण्याची शक्यता आहे.  – मोहन गुरनानी, अध्यक्ष, चेंबर ऑफ महाराष्ट्रीय इंडस्ट्रिअल ट्रेड