जवळपास ६० वर्षांचा वारसा आणि जगभरात चार खंडातील ८० हून जास्त देशांना १८ हजार वेगवेगळ्या प्रकारच्या बेअरिंग्जची निर्यात करणाऱ्या युरोपातील अग्रेसर यूआरबी समूहाने भारतात आपला उत्पादन प्रकल्प साकारण्याचे ठरविले आहे. १९९२ पासून भारताच्या बाजारपेठेत उपकंपनी यूआरबी इंडियामार्फत अस्तित्व असलेल्या या समूहाने देशांतर्गत उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतातील या उत्पादन प्रकल्पासाठी जागेची निश्चिती लवकरच केली जाईल. आपला हा पहिलावहिला उत्पादन प्रकल्प साकारण्यासाठी ५० दशलक्ष युरोच्या गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. रोमानिया, तुर्कस्तान आणि हंगेरीनंतर कंपनीचा हा जागतिक स्तरावरील चौथा उत्पादन प्रकल्प असेल, अशी माहिती यूआरबी इंडियाचे अध्यक्ष हारून एडिगझेल यांनी दिली.
यूआरबीच्या प्रमुख उत्पादनांमध्ये डीप ग्रोव्ह बॉल बेअरिंग, थ्रस्ट बॉल बेअरिंग, सिलिंड्रीकल बॉल बेअरिंग, स्फेरिकल बॉल बेअरिंग, टेपर्ड रोलर बेअरिंग आणि स्पेशल बेअरिंग्ज यांचा समावेश आहे. भारतातील नव्या प्रकल्पातून या सर्वाचे उत्पादन घेतले जाणार असून, त्यांचा वापर रेल्वे, ऊर्जा, खाणकाम, धातूकाम, शेती सीमेंट, पोलाद या पायाभूत उद्योगांमध्ये तसेच मटेरियल हँडलिंग या कामात निर्यातीला पर्याय या स्वरूपात होईल.
या प्रकल्पासाठी आवश्यक कच्चा माल रोमानियातून पुरविला जाईल आणि त्याची जुळणी आणि फिनिशिंगसह तयार होणारे अंतिम उत्पादन हे ७० टक्के स्थानिक बाजारपेठेसाठी तर ३० टक्के निर्यातीसाठी वापरात येईल. स्थानिक वापर व निर्यातीचे हे प्रमाण भविष्यात ५०-५० टक्के पातळीवर       आणले जाईल. भारतातून होणारे उत्पादन हे प्रामुख्याने युरोप व अमेरिकेच्या बाजारपेठेत निर्यात केले जाणार आहे.