आपल्या गुंतवणूकदारांसाठी वर्ष सांगता करणारा डिसेंबर महिना कायम फलदायी राहिला आहे. गेल्या २० वर्षांचा मागोवा घेतल्यास डिसेंबर महिन्याने सरासरी दोन अंकी फायदा गुंतवणूकदारांच्या पदरी पाडला आहे. किमान ०.०७ टक्के आणि कमाल १५.७ टक्के अशा या महिन्यातील परताव्याचा स्तर आहे. २० वर्षांत अपवाद १९९४, २०००, २००१ आणि २०११ अशा नकारात्मक कल दाखविणाऱ्या केवळ चार वर्षांचा म्हणता येईल. आपल्या बाजाराची चालकशक्ती असलेल्या पाश्चिमात्य विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या (एफआयआय) आर्थिक वर्षांची सांगता डिसेंबरमध्ये होत असल्याने, तसेच नाताळसह, नव्या वर्षांच्या स्वागताचा उत्सव सुट्टय़ा घेऊन साजरा करण्याचा कल पाहता, एफआयआयकडून या महिन्यात गुंतवणुकीचा ओघ विलक्षण घटत असतो. तरीही डिसेंबर महिन्याची गुंतवणूकदारांना काही ना काही देण्याची कीर्ती मात्र अबाधित आहे. परंतु डिसेंबरमध्ये तगडी वाढ दाखविणारा बाजाराने जानेवारीच्या मध्यापर्यंत अकस्मात तोंडघशी पाडले आहे, याचीही अनेक उदाहरणे आहेत हे गुंतवणूकदारांनी लक्षात घ्यावे.
सध्याचा बाजार तेजीचा हे मात्र नि:संशय सांगता येईल. या तेजीत केवळ निर्देशांकात सामील असलेले आघाडीच्या समभागांनाच नव्हे तर स्मॉल कॅप आणि मिड कॅप गणले जाऊन काठावर राहिलेल्या समभागांनाही या तेजीने सामावून घेतले आहे. गेल्या काही दिवसात वर्षांतील उच्चांक स्तर गाठणारे आणि उत्तरोत्तर तेजीचे सर्किट लागणारे बहुतांश समभाग मिड कॅप, स्मॉल कॅप धाटणीचेच आहेत. यातून ही तेजी सुदृढ व सर्वसमावेशक असल्याचा प्रत्यय मिळतो. बाजाराचा तांत्रिक कलही सकारात्मकताच दर्शवीत आहे.
मागील आठवडय़ात याच स्तंभात, १७१ रुपयाच्या भावावर सुचविलेला मदरसन सुमी (पुन्हा मिडकॅप!) २०० रुपयांपर्यंत गेला आहे. बाजारात सध्या जागतिक स्तरावरून नकारात्मक बातम्या आदळण्याचे प्रमाण घटले आहे, तर देशांतर्गत आर्थिक सुधारणांचे अडसरीचे वातावरण निवळत चालले आहे. आता बाजाराची सारी सूत्रे रिझव्‍‌र्ह बँकेच्याच हाती असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. देशाची ही पत-नियंत्रक शिखरसंस्था १८ डिसेंबरला आपला पवित्रा स्पष्ट करेल. तोवरच्या आठवडय़ात बाजारातील तेजीचे सत्र असेच चालू राहील असे वाटते. नवीन खरेदीसाठी मिंडा इंडस्ट्रीज तर दीर्घकालीन दृष्टिकोनातून महिंद्र फोर्जिग चांगला वाटतो.