भारत आणि जर्मनी यांच्यात १८ सामंजस्य करार

जर्मन कंपन्यांच्या उद्योगांना ताबडतोब मान्यता व १ अब्ज युरोचा सौरऊर्जा निधी यासह एकूण १८ करारांवर जर्मनी व भारत यांच्यात सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी व जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल यांच्यात चर्चा झाल्यानंतर हे करार करण्यात आले.
भारत-जर्मनी यांच्यात आंतर सरकारी सल्लामसलतीच्या तिसऱ्या शिखर बैठकीत मोदी व मर्केल यांनी संरक्षण, सुरक्षा, गुप्तचर, रेल्वे, व्यापार, गुंतवणूक, स्वच्छ ऊर्जा या विषयांवर चर्चा झाली. दहशतवादाचा मुकाबला हाही विषय त्यात होता. जर्मनी हा आमचा स्वाभाविक भागीदार आहे व भारताला आर्थिक स्थित्यंतर घडवण्यात त्या देशाची मदत होईल. दोन्ही देशांचे अग्रक्रम समान आहेत. आर्थिक संबंध वृद्धिंगत करण्यावर आमचा भर आहे पण दोन्ही देशांपुढे अनेक आव्हाने तसेच संधीही आहेत. शाश्वक भवितव्यासाठी दोन्ही देशांचे प्रयत्न राहतील असे मोदी यांनी सांगितले. आजच्या करारांमुळे मोदी यांच्या मेक इन इंडिया पुढाकारास व परदेशी गुंतवणुकीला चालना मिळणार आहे. संरक्षण उत्पादन तंत्रज्ञान, गुप्तचर माहिती व दहशतवाद, मूलतत्त्ववादाचा मुकाबला या मुद्दय़ांवर दोन्ही देश सहकार्य करणार आहेत. जर्मनीत आधुनिक भारतीय भाषांना उत्तेजन, भारतात परदेशी भाषा शिक्षणात जर्मन भाषेला मोठे स्थान देणे याबाबतही करार झाले. संयुक्त जाहीरनाम्यात जर्मनीने एनएसजी व एमटीसीआर तसेच ऑस्ट्रेलियाबरोबरच्या नियंत्रण व्यवस्थांबाबत भारताने मान्य केलेल्या अटींबाबत भारताची प्रशंसा केली.
सहकार्य परिणाम
या करारांमुळे मोदी यांच्या मेक इन इंडिया पुढाकारास व परदेशी गुंतवणुकीला चालना मिळणार आहे. संरक्षण उत्पादन तंत्रज्ञान, गुप्तचर माहिती व दहशतवाद, मूलतत्त्ववादाचा मुकाबला या मुद्दय़ांवर दोन्ही देश सहकार्य करणार आहेत.