भारतीय अर्थव्यवस्थेचा सुधार दृष्टिपथात येण्याची चिन्हे नाहीत. सरलेल्या फेब्रुवारी महिन्यात देशाच्या औद्योगिक उत्पादन दराने पुन्हा उणे दराची नोंदणी केली आहे. एप्रिल २०१३ ते फेब्रुवारी २०१४ असा ११ महिन्यांत देशाच्या औद्योगिक उत्पादननिर्मितीचा प्रवास नकारात्मकतेतच राहिला आहे. फेब्रुवारी २०१४ मध्ये तो -१.९ टक्के तर २०१३-१४ आर्थिक वर्षांच्या पहिल्या ११ महिन्यांमध्ये -०.१ टक्के राहिला आहे.
२०१३-१४ या आर्थिक वर्षांच्या तोंडावर, मार्चमध्ये ३.५ टक्क्यांवर असणारा हा दर आता वर्षभराच्या किमान पातळीवर आला आहे. मार्च २०१३ मधील ही झेप औद्योगिक उत्पादन क्षेत्राने वर्षअखेपर्यंत पाहिलेलीच नाही. उलट गेल्या आर्थिक वर्षांत पाच वेळा दर उणे स्थितीत राहिला आहे. फेब्रुवारी २०१३ मध्ये ०.६ टक्के व एप्रिल २०१३ – फेब्रुवारी २०१४ मध्ये औद्योगिक उत्पादन दर ०.९ टक्के राहिला आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेत सुधार येण्याचे वातावरण असतानाच फेब्रुवारी २०१४ मधील उणेस्थितीतील औद्योगिक उत्पादन दराने चिंता वाढविली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०१३ दरम्यान दर सतत घसरता राहिला आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकात सर्वाधिक, ७५ टक्के हिस्सा राखणाऱ्या निर्मिती क्षेत्रात फेब्रुवारीत ३.७ टक्के तर गेल्या आर्थिक वर्षांतील पहिल्या ११ महिन्यात अवघी ०.७ टक्के वाढ झाली आहे. विविध २२ उद्योग क्षेत्रांतील १३ क्षेत्र ही नकारात्मकतेत नोंदली गेली आहेत.