पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जर्मन उद्योगपतींना ग्वाही

अप्रत्यक्ष करप्रणालीतील ऐतिहासिक सुधारणा म्हणून गौरविले गेलेले वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयक पुढील वर्षीपर्यंत लागू होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. भारत व जर्मनीच्या उद्योगपतींपुढे बोलताना त्यांनी सांगितले, की आम्ही वस्तू व सेवा कर विधेयक संसदेत मांडले आहे व ते २०१६ पर्यंत संमत होऊ शकते.

वस्तू व सेवा करासंबंधीचे विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून राज्यसभेत संमत होऊ शकलेले नाही कारण तेथे राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत नाही. हे घटनादुरूस्ती विधेयक असल्याने संसदेने मान्यता दिल्यानंतरही देशातील राज्यांमध्ये निम्म्या विधिमंडळांची मान्यता या विधेयकासाठी आवश्यक असणार आहे.

मोदी यांनी सांगितले, की सरकारने काही निर्णायक पावले उचलली असून गुंतवणूकदारांच्या चिंता त्यामुळे दूर झाल्या आहेत. पूर्वलक्ष्यी प्रभावाने कोणतीही कर आकारणी करणार नाही असे यापूर्वीच जाहीर केले आहे. जनरल अँटी अ‍ॅव्हॉइडन्स नियम (गार) दोन वर्षे लांबणीवर टाकण्याचेही सरकारने ठरवले आहे. भाजपच्या पंधरा महिन्यांच्या काळात जागतिक गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. संरक्षण क्षेत्रात परवान्यांची संख्या कमी करणे, नियमन परवान्यांना गती देणे यांसारख्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. औद्योगिक परवान्यांचा वैधता काळही वाढवला आहे व काही संरक्षण सामग्रीही परवानामुक्त करण्यात आली आहे. वेगवेगळ्या प्रमाणपत्रांची आवश्यकता काढून टाकण्यात आली आहे. संरक्षण औद्योगिक परवान्यांची वैधता ३ वर्षांवरून एकदम १८ वर्षे केली आहे. पर्यायी गुंतवणूक निधीबाबत काही नियम नंतर अधिसूचित केले जातील. स्थावर मालमत्ता गुंतवणूक संस्थांसाठीची भांडवली नफा कर व्यवस्था सुसूत्रित केली आहे. या वर्षी थेट परकीय गुंतवणूक ४० टक्क्य़ांनी वाढली आहे.

हरित ऊर्जेत सहकार्य

हरित ऊर्जा प्रकल्पांसाठी १२.५ कोटी युरो (९१५ कोटी रुपये) कर्ज जर्मनी देणार आहे. त्यात हिमाचल प्रदेश व आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे. भारत सरकार व जर्मनी यांच्यात हरित प्रकल्पांना कर्जपुरवठा करण्यासाठी १२.५ कोटी युरोंचा करार झाला आहे. त्यात ५.७ कोटी युरो कर्ज हिमाचल प्रदेशला मिळणार असून ६.८ कोटी युरो कर्ज आंध्र प्रदेशला मिळणार आहे. कर्जाच्या करारावर अर्थ खात्याचे सहसचिव एस.सेल्वाकुमार व केएफडब्ल्यू मंडळाचे सदस्य रोलँड सिलर यांनी स्वाक्षऱ्या केल्या.