आजवर सात लाखांकडून माहिती सादर

भ्रष्टाचार आणि काळय़ा पैशाला प्रतिबंध घालण्यासाठी घेण्यात आलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकांमध्ये जवळपास ४.५ लाख कोटी संशयास्पदरीत्या जमा करणाऱ्या १८ लाख लोकांकडे प्राप्तिकर विभागाने विचारणा केली. प्राप्तिकर विभागाने पाठवलेल्या एसएमएस आणि ई-मेलला उत्तर न देणाऱ्यांना ‘असंवैधानिक’ ठरवून पत्र पाठवण्यात येणार आहेत.

प्राप्तिकर विभागाने विचारलेल्या प्रश्नाला ७ लाख लोकांनी उत्तर पाठवले आहे. पाच लाखांपेक्षा अधिक रक्कम बँकेत जमा करणारे ९ लाख लोक विभागाच्या रडारावर असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

‘ऑपरेशन क्लीन मनी’ अभियाना अंतर्गत संशयास्पद १८ लाख बँक खातेधारकांना चौकशीसाठी एसएमएस आणि ई-मेलच्या माध्यमातून प्रश्न विचारण्यात आले होते.

यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत वेळ देण्यात आली होती. यानंतर बँकेत जुन्या नोटा बँकेत जमा करणाऱ्या ७ लाख लोकांनी प्राप्तिकर विभागाकडे उत्तर पाठवले आहे. यातील ९९ टक्के आकडेवारी योग्य असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

इतर उत्तर न देणाऱ्यांना असंवैधानिक पत्रे पाठवण्यात येणार आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले.

१८ लाख खातेधारकांकडून पाच लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा

आयकर विभागाने जमा केलेल्या माहितीनुसार, नोटाबंदीच्या पहिल्या ५० दिवसांमध्ये एक कोटी बँक खात्यांमध्ये दोन लाख रुपयांपेक्षा अधिक याप्रमाणे १० लाख कोटी जमा करण्यात आले होते. यामध्ये १८ लाख खातेधारकांनी ५ लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा केली असून, त्यांच्यावर विभागाचा संशय असल्याचे अधिकाऱ्याने पीटीआयला माहिती देताना सांगितले.