२०१५-१६ या आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यांमध्ये भारतीय बाजारपेठ परदेशी गुंतवणुकीचा ओघ स्वत:कडे खेचण्यात मोठ्याप्रमाणावर यशस्वी ठरली आहे. जागतिक पातळीवर तुलना केल्यास भारताने परदेशी गुंतवणुकीच्याबाबतीत अमेरिका आणि चीन या देशांना मागे टाकण्याची कौतुकास्पद कामगिरी करून दाखविली आहे. चालु आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यांत भारतीय बाजारपेठेत तब्बल ३.१ कोटी डॉलर्स इतकी परदेशी गुंतवणूक करण्यात आल्याचे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. लंडनच्या ‘फायनान्शियल टाईम्स’तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या या अहवालाबद्दल मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून प्रसारमाध्यमांना माहिती देण्यात आली. या अहवालानूसार, २०१५ च्या पहिल्या सहा महिन्यात भारतीय बाजारपेठेत ३.१ कोटी डॉलर्सची परदेशी गुंतवणूक झाली असून ही आकडेवारी चीन ( २.८ कोटी डॉलर्स) आणि अमेरिका (२.७ कोटी डॉलर्स) या देशांपेक्षा सरस आहे. त्यामुळे भारताने जागतिक पातळीवर परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात आघाडी घेतल्याचे ‘फायनान्शियल टाईम्स’ने म्हटले आहे. याशिवाय, विदेशी कंपन्यांकडून इतर देशांमध्ये उपकंपन्यांमार्फत करण्यात येणाऱ्या गुंतवणूकीतही भारताने चीन आणि अमेरिकेपेक्षा आघाडी घेतल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे.
गेल्यावर्षी याच काळात झालेल्या गुंतवणुकीशी तुलना करता भारतीय बाजारपेठेतील यंदाची परदेशी गुंतवणूक दुपटीने वाढली आहे. मागील वर्षी हे प्रमाण १.२ कोटी डॉलर्स इतके होते. त्यावेळी भांडवली गुंतवणुकीच्याबाबतीत चीन, अमेरिका, इंग्लंड आणि मेक्सिको यांच्यानंतर भारत पाचव्या स्थानावर होता.