संगीत कार्यक्रमांना वाहिलेल्या देशातील या धाटणीच्या पहिल्या मनोरंजन वाहिनीची पुनर्बाधणी करण्यात येत असून तिचे प्रसारण अधिक घरांमध्ये पोहोचण्यासाठी कंपनीची आघाडीच्या डीटीएच कंपन्यांबरोबर सुरू असलेली चर्चा प्रगतिपथावर आहे.
संगीत विषयक कार्यक्रम, स्पर्धा, थेट प्रक्षेपण आदी २४ स्वतंत्ररीत्या उपलब्ध असलेल्या इनसिंक वाहिनीची स्थापना स्वत: व्हायोलिनवादक असलेल्या रतिश तागडे यांनी दोन वर्षांपूर्वी केली. सुरुवातीच्या टप्प्यातच दक्षिणेत मिळालेल्या प्रतिसादाच्या जोरावर कंपनीने अन्य भागात विस्तार करणे सुरू केले.
इनसिंकची प्रवर्तक कंपनी असलेल्या परफेक्ट ऑक्टेव्ह मिडिया प्रोजेक्टस कंपनीचे कार्यकारी संचालक के. गणेश कुमार यांनी सांगितले की, तूर्त स्थानिक केबलवर दिसणारी ही वाहिनी लवकरच विविध डीटीएच वाहिन्यांवरही झळकेल. कंपनीची पुनर्रचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मूळचे तमिळ असलेले कुमार यांचा विविध संत व त्यांच्या अभंगाचा अभ्यास असून अभंग पठणातील महाराष्ट्राचा मानाचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
हिंदुस्थानी, कर्नाटकी, सुफी, गझल आदी संगीत प्रकारातील कार्यक्रमांसाठी कंपनी प्रक्षेपण करते. कंपनीकडे सध्या संगीतविषयक ६०० तासांच्या कार्यक्रमांचा खजिना आहे. गेल्या दोन वर्षांत कंपनीची वाहिनी देशभरातील १.४० कोटी घरांमध्ये पोहोचली आहे.
कंपनीतील कार्यरत वरिष्ठ अधिकारी हे स्वत:ही कोणत्यातरी संगीत प्रकारातील जाणते असून कंपनीच्या संचालक मंडळावर पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित शिवकुमार शर्मा, शंकर महादेवन, उस्ताद राशीद खाँ, पंडित विजय घाटे आदी प्रसिद्ध व्यक्ती आहेत.