मोठय़ा रकमेच्या गुंतवणुकीसह टाटा समूह तिच्या प्रवासी तसेच व्यापारी वाहनांमध्ये लवकरच नवीन श्रेणी दाखल करेल, असे टाटा मोटर्सचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी म्हटले आहे.

भागधारकांना वितरीत कंपनीच्या ७०व्या वार्षिक अहवालात मिस्त्री यांनी नव्या वाहनांमध्ये ग्राहकांच्या भविष्यातील गरजा ओळखून अत्याधुनिक तंत्रज्ञान समाविष्ट करत असल्याचेही म्हटले आहे.
टाटा मोटर्सने तिच्या होरायझनेक्स्ट मोहिमेंतर्गत नॅनो, बोल्ट व झेस्ट या प्रवासी कार नव्या रूपात सादर केल्या होत्या. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कंपनीच्या प्रवासी वाहन विभागाचे उपाध्यक्ष गिरीश वाघ यांनीही यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
वाहन क्षेत्रात भारतीय तसेच जागतिक बाजारपेठेत कंपनी दीर्घकालीन संधी जोपासत असून मोठी गुंतवणूक करून अत्याधुनिक वाहने सादर करत टाटा मोटर्स भविष्यासाठी सज्ज राहणार असल्याचेही मिस्त्री यांनी म्हटले आहे. काही वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या जग्वार लँड रोव्हर नाममुद्रेलाही आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगला प्रतिसाद मिळत असून कंपनी व्यापारी वाहन गटावरही येत्या कालावधीत त्याच प्रमाणात भर देईल, असा विश्वासही मिस्त्री यांनी भागधारकांजवळ व्यक्त केला आहे.
टाटा मोटर्स गेल्या तीन वर्षांपासून ताळेबंदात तोटा सोसला आहे. मार्च २०१५ अखेर संपलेल्या तिमाहीतही कंपनीने ५६.२ टक्के घसरण नोंदवीत १७१६ कोटींचा नफा नोंदविला होता.