भारताचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार कौशिक बसू यांची आंतरराष्ट्रीय आर्थिक महासंघाच्या (आयईए) अध्यक्षपदाची सूत्रे २३ जून २०१७ रोजी हाती घेतली. या पदावरील त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल.

मेक्सिको येथे झालेल्या आयईएच्या १८ व्या जागतिक परिषदेच्या समारोप सत्रात, कॉर्नेल विद्यापीठाचे रवी कानबूर यांच्यासह बसू यांचेही भाषण झाले. या भाषणापासूनच महासंघाच्या नेतृत्वस्थानी बसू यांच्या निवडीच्या चर्चेने मूळ धरले, असे कॉर्नेल विद्यापीठाने प्रसिद्धी पत्रकान्वये स्पष्ट केले आहे. या विद्यापीठाच्या इंटरनॅशनल स्टडीज विभागात व्याख्याते म्हणून ते सध्या कार्यरत आहेत.

कौशिक बसू हे २००९ ते २०१२ या काळात भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत होते, तर २०१२ ते २०१६ या दरम्यान जागतिक बँकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांची कारकीर्द राहिली आहे. जगभरातील व्यावसायिक अर्थतज्ज्ञांचे पुढारपण करणारा आघाडीचा महासंघ म्हणून आयईएचा लौकिक असून, जागतिक स्तरावर आर्थिक धोरणाला वळण देण्याचे व संशोधनाचे काम हा महासंघ करीत असतो. आयईएच्या माजी अध्यक्षांमध्ये नोबेलविजेते केनेथ अ‍ॅरो, रॉबर्ट सोलोव, अमर्त्य सेन आणि जोसेफ स्टिग्लिट्झ यांचा समावेश आहे.