कमी मागणीअभावी चालू महिन्यातही उत्पादन बंद ठेवण्याची वेळ महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र या वाहन निर्मात्या कंपनीवर पुन्हा ओढवली आहे. कंपनीने ऑगस्टमधील उर्वरित कालावधीत चार दिवस वाहनांचे उत्पादन न घेण्याचे ठरविले आहे. कंपनीने यापूर्वीही मर्यादित कालावधीच्या वाहन उत्पादन बंद निर्णयाची अंमलबजावणी केली आहे.
कंपनीने नेमके कोणत्या दिवशी काम बंद ठेवण्याचे धोरण आखले आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. समूहातील महिंद्र व्हेकल मॅन्युफॅक्चर्स लिमिटेडच्या पुणेनजीकच्या चाकण येथील वाहन उत्पादन हे चार दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. चाकणव्यतिरिक्त कंपनीचा महाराष्ट्रात नाशिक व उत्तर भारतात हरिद्वार येथेही वाहननिर्मिती प्रकल्प आहे.  
स्पोर्ट युटिलिटी व्हेकल श्रेणीत आघाडीवर असणाऱ्या महिंद्र कंपनीच्या या श्रेणीतील वाहनांनी जुलैमध्ये ९.९१ टक्के विक्रीतील घट नोंदविली आहे. या महिन्यात १५,९२७ वाहने तयार करण्यात आली असताना १४,३४८ वाहनेच विकली गेली आहेत. त्याचबरोबर चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीत कंपनीची वाहन विक्री तसेच निर्मितीह रोडावली आहे.