मार्केट मंत्र
गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्सने नवीन शिखर दाखविले. कंपन्यांची आश्वासक तिमाही कामगिरी, महागाई दर पाच महिन्यांच्या खालच्या पातळीवर घसरणे, परिणामी रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर कपातीच्या बळावलेल्या आशा पाहता, सेन्सेक्सचा मजल-दरमजल उच्चांक आश्चर्यकारक म्हणता येणार नाही. पण ते दोन दिवस आणि सप्ताहअखेर शुक्रवारची घसरण मिडकॅप्स समभाग म्हणजे पर्यायाने व्यापक बाजारावर दुर्दैवाने घाला घालणारी ठरली. बाजाराचा आगामी कल नवे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यंदाच्या मंगळवारी रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणातून कोणता ‘धक्का’ देतात त्यावर निश्चितपणे अवलंबून असेल. त्यामुळे पुढल्या सप्ताहात रघुरामा सावर रे.. असा सामान्य गुंतवणूकदारांचा पुन्हा एकच धावा ठरावा.
एकूण औषधी क्षेत्राकडे पाहिल्यास, सन फार्मा, पिरामल एंटरप्राइजेस, ल्युपिन, वोखार्ट, डॉ. रेड्डीज् लॅब हे गेले संपूर्ण वर्षभर दिमाखदार राहूनही सतत तेजी दाखवीत आहेत. अर्थात याला अपवाद रॅनबॅक्सी लॅबचा. रॅनबॅक्सीसंदर्भात मंदीची कारणेही सबळ आहेत. परंतु या समभागात मंदीची अपेक्षा करणारे पुरते फसले आहेत. गेल्या आठवडय़ात त्यांना तोंड लपवायला जागा शिल्लक नव्हती.
बँकिंग क्षेत्रात इंडसइंड बँक सोडून अन्य खासगी बँकांची तिमाही कामगिरी सरस राहिली. आयटी कंपन्यांनीही अपेक्षेपेक्षा उत्तम निकाल दिले. एचडीएफसी, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, रिलायन्स या बडय़ा कंपन्यांचे निकाल तर आश्चर्याचा धक्काच ठरले. पण याची गुंतवणूकदारांवरील मोहिनी त्या दिवसापुरतीच राहिली. वित्तसंस्थांनी चांगल्या तिमाही कामगिरीमुळे भाव वधारलेल्या या उल्लेखित समभागांत लगोलग नफा कमावल्याचे दिसून आले आहे. निकालांच्या दिवशी शेअर बाजारात सक्रिय राहिलेल्या एल अ‍ॅण्ड टी, इन्फोसिस, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी, रिलायन्स, टीसीएस या सर्वाच्याच बाबतीत बाजाराचा असाच अनुभव राहिला आहे.
चालू वर्षांच्या गुंतवणूक-नीतीचा आपण या स्तंभातून नियमित आढावा घेत राहणार आहोत. निर्देशांकात सामील असलेले आघाडीचे समभाग सोडता त्या परिघाबाहेरचे शेकडो समभाग गुंतवणुकीसाठी आजही आकर्षक आहेत, हे पहिल्या भागापासून सांगण्यात आले आहे. मुख्यत: अल्पकालीन लक्ष्य असलेल्या गुंतवणूकदारांनी हाय बीटा म्हणजे दैनंदिन प्रचंड वधघट दर्शविणारे समभाग आपल्या पोर्टफोलियोत ठेवायलाच हवेत. अभियांत्रिकी क्षेत्र, खासगी बँका, पायाभूत क्षेत्रातील निवडक समभागांबद्दल असे म्हणता येईल. पण वर्तमान स्थितीत या समभागांमध्ये ‘स्टॉप लॉस’च्या दंडकांचे कठोरपणे पालन करूनच गुंतवणूक केली जायला हवी. याच सूत्रानुसार पंजाब नॅशनल बँक, बाटा, डीएलएफ, टाटा स्टील यांपासून अशा गुंतवणूकदारांनी लांबच राहावे.

बाजार गप्पा
विविध १७ कंपन्या सध्या बायबॅक ऑफर घेऊन बाजारात उतरतील. म्हणजे किरकोळ भागधारकांकडे असलेले समभाग खरेदी करून प्रवर्तक कंपनीतील आपला भांडवली हिस्सा वाढवतील. पुढच्या सहा महिन्यांत अशा ऑफर्स वरचेवर पाहायला मिळतील. सर्वच ऑफर्स चांगल्या असतील असे नाही. पण काहींबाबत छोटय़ा गुंतवणूकदारांनी अंशत: विक्री करून नफा पदरात पाडून घेण्यास हरकत नाही.

शिफारस
फेब्रुवारीच्या शेवटापर्यंत बाजाराची मार्गक्रमणा ही चढ-उतारांसह सुरू राहील. त्यामुळे गुंतवणुकीचे उद्दिष्ट हे अल्पकाळासाठीच हवे. किंबहुना रिझव्‍‌र्ह बँकेचे आगामी मंगळवारचे पतधोरण बाजाराच्या पसंती-नापसंतीचे आले तरी दिसू शकणारा परिणाम पाहता नव्या खरेदीला या आठवडय़ाला विराम देणेच योग्य ठरेल.