गेल्या वर्षभरात देशातील सेन्सेक्स व निफ्टी या प्रमुख निर्देशांकांचा परताव्याचा दर अनुक्रमे ४५ व ४२ टक्के आहे. २८ जानेवारी २०१४ रोजी ६,२८२ वर बंद झालेला एसएनपी बीएसई मिडकॅप निर्देशांक एका वर्षांनंतर २८ जानेवारी २०१५ रोजी १०,८०८ वर बंद झाला. एका वर्षांत या निर्देशांकात तब्बल ७२ टक्के वाढ दिसून आली आहे. याच निर्देशांकात अंतर्भूत असलेल्या सेंच्युरी प्लायबोर्डसारख्या समभागाने मागील एका वर्षांत ५०० टक्के वाढ नोंदविली आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात जेव्हा शेअर बाजार तेजीत असतात तेव्हा गुंतवणूकदारांची पसंती मिडकॅप समभागांना असते. e01या निर्देशांकातील वाढीचे प्रतििबब म्युच्युअल फंडांच्या मिडकॅप योजनांतून दिसून येत आहे. फंडाच्या मालमत्तेनुसार अनुक्रमे पहिल्या पाच योजनांपकी यूटीआय मिडकॅप या योजनेने मागील एका वर्षांत १०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला असून सर्वात कमी परतावा आयडीएफसी प्रीमियर इक्विटी या फंडाने ७५ टक्के दिला आहे. मिडकॅप हा फंड प्रकार सर्वच गुंतवणूकदारांच्या पसंतीचा असला तरी या फंडाच्या निव्वळ मालमत्ता मूल्यात लार्जकॅप फंडांच्या मालमत्ता मूल्याहून वेगाने चढ-उतार सहन करावे लागतात. विशेषत: निर्देशांक जेव्हा गडगडतात तेव्हा मिडकॅप योजनांच्या मालमात्तेत वेगाने घट होते. ज्या योजनेत मागील तीन वष्रे सरासरी एकूण मालमत्तेपकी किमान ६० टक्के गुंतवणूक मिडकॅप समभागांमध्ये आहे अशा योजनांना सेबीने मिडकॅप योजना म्हणून मान्यता दिली आहे. जेव्हा बाजारात तेजी असते तेव्हा या प्रकारच्या योजनांच्या परताव्याचा दर सरासरीहून अधिक असतो तर मंदीची चाहूल लागताच या योजना सर्वात आधी गडगडतात. गुंतवणूकदारांची पसंती लक्षात घेऊन अनेक फंड घराणी गुंतवणूकदारांना आकर्षति करण्यास आपले मिडकॅप फंड घेऊन येण्याच्या तयारीत असून यापकी गुंतवणुकीस कायम खुला असलेला पहिला फंड एलआयसी नोमुराकडून सादर होणार आहे. एलआयसी नोमुरा फंड घराण्यास दहा वर्षांनंतर प्रथमच कायम खुली असलेली योजना सादर करण्यास सेबीने मान्यता दिली आहे.

*मिडकॅप फंडानी वर्षभरात आपापल्या कामगिरीच्या तुलनेसाठी निवडलेल्या निर्देशांकाहून अधिक परतावा दिला आहे. हे जरी खरे असले तरी मिडकॅप गुंतवणुकीतून संपत्तीनिर्मिती ही एका वर्षांपुरती मर्यादित नसून दीर्घ काळ चालणारी प्रक्रिया आहे. संपत्तीनिर्मितीसाठी गुंतवणूकदारांनी दर्जेदार मिडकॅप फंड आपल्या गुंतवणूक सल्लागराच्या मदतीने निवडणे जरुरी आहे.
– मृणाल सिंग, आयसीआयसीआय प्रुडेंशियल मिडकॅप फंडाच्या निधी व्यवस्थापक
*परदेशी वित्तसंस्था मागील वर्षभरापासून मिडकॅप समभागात रस घेत आहेत. आमचे मिडकॅप निर्देशांकाचे लक्ष्य अर्थसंकल्पापर्यंत १२ हजार असून सरकारची सकारात्मकता अर्थसंकल्पातून दिसून आली तर डिसेंबर २०१५ पर्यंत मिडकॅप निर्देशांक १९ हजारांचा टप्पा गाठेल.
– जितेंद्र पुरोहित, एलकेपी सिक्युरिटीज

*गेली चार वष्रे आम्ही म्युच्युअल फंडांच्या मिडकॅप योजनांची शिफारस करीत आहोत. मिडकॅप समभागांचे अत्यंत आकर्षक मूल्यांकन व अव्वल समभाग हुडकण्याचे निधी व्यवस्थापकांचे कौशल्य यांच्या मिलाफामुळे मिडकॅप फंडातून संपत्तीची निर्मिती होऊ शकली. आज मूल्यांकन जरी आकर्षक पातळीवर नसले तरी सरकार बदलामुळे झालेला धोरणात्मक बदल व सहा टक्यांदरम्यान अर्थव्यवस्था वाढीचा अंदाज यामुळे तीन ते पाच वर्षांच्या कालावधीत मिडकॅप योजनांच्या परताव्याचा दर अव्वल असेल.
– रेणू पोथन, संशोधन प्रमुख, फंडसुपरमार्ट डॉटकॉम