जागतिक पटलावरील ‘देशाचा समर्पक प्रवक्ता’ असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यातील कामगिरीचा उल्लेख करीत, रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मात्र या दौऱ्यांचे उचित फलित मिळेल या दृष्टीने देशांतर्गत साजेशी पृष्ठभूमी तयार करणारे प्रयत्न होत नसल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले.
पंतप्रधान मोदी विदेशात जाऊन भारताबद्दल जी चांगली प्रतिमा निर्माण करतात, त्याचा प्रत्यक्ष लाभ उचलणारी कारवाई मागोमाग त्वेरेने व्हायला हवी, अशी अपेक्षा राजन यांनी दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली. पतधोरण व अर्थव्यवस्थेविषयी अनेक मुद्दय़ांवर सरकारशी मतभिन्नता उघडपणे व्यक्त करणारे राजन यांनी पंतप्रधान मोदी यांची गुंतवणुकीसाठी आकर्षक केंद्र म्हणून भारताची प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रयत्नांची मात्र तोंड भरून स्तुती केली.
राजन म्हणाले, ‘मोदी आपल्या सर्वाच्या खूप पुढे आहेत. त्यामुळे त्यांची बरोबरी साधण्यासाठी आपल्यालाही अनेकांगाने वेग पकडणे भाग ठरेल. उदाहरणार्थ, भारत एक सशक्त अर्थव्यवस्था असल्याचे विदेशात पटविले गेले आणि त्यावर विश्वास ठेवून कुणी येथे आले तर त्यांना व्यापार-उदिमास अनुकूल सुलभता दिसण्याऐवजी परवाने-मंजुऱ्यांच्या कटकटीला सामोरे जावे लागावे, ही निश्चितच समाधानाची बाब नसेल.’

‘आयएमएफ’च्या प्रमुखपदाच्या स्पर्धेत नाही
आंतराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालकपदासाठी आपण उत्सुक असल्याच्या केवळ अफवा असून, आपण त्या पदासाठी आपण जराही उत्सुक नसून, त्यासाठी अर्जही दाखल केलेला नाही, असे रघुराम राजन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. राजन यांची आयएमएफचे मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून कारकीर्द राहिली आहे.