जगाच्या पाठीवरील दुसऱ्या क्रमांकाचा छोटेखानी देश असला तरी राजघराणी, त्यांची ऐषारामी निवासस्थाने, अब्जावधी डॉलर किमतीची पेन्टहाऊसेस यासाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या मोनॅको देशाने भारतीय पर्यटकांना रिझविण्याची विशेष मोहिमच आखली आहे. युरोपमधील या अत्यंत लोभसवाण्या आणि प्रसन्न अशा मोनॅकोमध्ये पर्यटकांना आनंद लुटता येईल असा ऐवज घेऊन खास रोड शोंचे आयोजन देशाच्या मुख्य शहरांमध्ये सुरू आहे. यातून २०१२ मध्ये मोनॅकोला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत तब्बल २५ टक्के वाढ अपेक्षिली जात आहे. २०११ मध्ये जवळपास १५०० भारतीय पर्यटकांनी मोनॅकोला भेट दिली होती.
भारत ही आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण अशी बाजारपेठ बनत आहे, हे येथून येणाऱ्या पर्यटकांच्या वाढत्या संख्येतूनही प्रतिबिंबीत झाले आहे, असे उद्गार मोनॅकोचे भारतातील राजदूत पँट्रिक मेडेसीन यांनी मुंबईत या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना काढले. अर्थकारणाची पूर्ण मदार पर्यटनावरच असलेल्या या देशाने आपल्या अर्थसंकल्पीय तरतूदीच्या ३० टक्के रक्कम भारतासह, ब्राझील, रशिया आणि चीन या ‘ब्रिक’ देशांमध्ये पर्यटनविषयक मोहिमा राबविण्यासाठी करण्याचे ठरविले आहे, असेही या प्रसंगी उपस्थित असलेले मोनॅकोचे विपणन संचालक एरिक मारसन यांनी स्पष्ट केले. भारताच्या दृष्टीने विचार करता खास करून मनोरंजन तसेच ‘माइस’ (बैठका, परिषदा, उद्योग मेळावे, प्रदर्शने) वगैरे प्रकारच्या पर्यटनावर भर दिला जाईल. त्या परिणामी येत्या काही वर्षांत भारतीय पर्यटकांचा ओघ आणखी वाढलेला दिसेल, असे मारसन यांनी सांगितले.