पहिल्या सात महिन्यात १.१४ लाख कोटी रुपये जमा
देशाच्या प्रत्यक्ष कर महसुलात एक तृतीयांश हिस्सा राखणाऱ्या देशाच्या आर्थिक राजधानीतून होणाऱ्या प्राप्तिकर संकलनात यंदा तब्बल २० टक्क्य़ांची वाढ झाली आहे. मुंबईतून १.१४ लाख कोटी रुपये प्राप्तिकर भरणा झाला आहे. अर्थसंकल्पातील संपूर्ण आर्थिक वर्षांतील प्राप्तिकर संकलनाच्या ७.९७ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान विविध १७ विभागांमधून ३.६३ लाख कोटी रुपयांचे प्राप्तिकर संकलन झाले आहे.
चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या आठ महिन्यांतील ही आकडेवारी आहे. १ एप्रिल ते २१ नोव्हेंबर २०१५ दरम्यान शहरातील प्राप्तिकर संकलन २०.१७ टक्क्य़ांनी वाढून ते १.१४ लाख कोटी रुपये झाल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या मुंबईचे प्रमुख आणि प्रधान मुख्य आयुक्त डी. एस. सक्सेना यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
मुंबईतून अग्रिम करभरणा मात्र अवघ्या ६.४७ टक्क्य़ांनी वाढला असून, एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान तो ५८,००० कोटी रुपये झाला असल्याची माहितीही सक्सेना यांनी यावेळी दिली. करवजावट स्रोत संकलन १० टक्क्य़ांनी वाढत ५३,०६२ कोटी रुपये झाल्याचेही ते म्हणाले.
केंद्र सरकारचे चालू आर्थिक वर्षांसाठीचे मुंबई विभागातून प्राप्तिकर संकलनाचे लक्ष्य २.५६ लाख कोटी रुपयांचे असून, पहिल्या अर्धवित्त वर्षांतील प्रत्यक्ष करसंकलन ३५.८ टक्क्य़ांनी वाढून ते ३.२४ लाख कोटी रुपये झाले आहे.