म्युच्युअल फंडाच्या निधी व्यवस्थापकांनी सरलेल्या एप्रिल महिन्यात बँकांच्या समभागांमध्ये ८५,३३० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचे आढळून आले. अनेक कारणाने बँकांच्या समभाग मूल्यात झालेली घसरण, त्यांचे स्वस्त मूल्यांकन वाढीव गुंतवणुकीला आकर्षित करणारे ठरले आहे.
प्रचंड बुडीत कर्जानी (एनपीए) ग्रस्त देशाच्या बँकिंग प्रणालीच्या सशक्ततेसाठी रिझव्र्ह बँक आणि सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचे फलित दृष्टिपथात आहे. एनपीएच्या चिंतेतून बँकांच्या समभागांमध्ये सध्या खूपच घसरण झालेली दिसत असली, तरी हीच त्यात गुंतवणुकीची संधी असल्याचे बाजार विश्लेषकांचेही म्हणणे आहे. भारताच्या आगामी आर्थिक वृद्धीपथात बँकाच सर्वात मोठय़ा लाभार्थी ठरतील.
म्युच्युअल फंडाच्या समभागसंलग्न (इक्विटी) योजनांच्या गत महिन्यांतील एकूण मालमत्तेत बँकिंग समभागातील गुंतवणुकीचा हिस्सा २०.२६ टक्के (८५,३३० कोटी रुपये) पातळीवर पोहोचला आहे. मार्चमध्ये हे प्रमाण १९.९२ टक्के (८२,१९६ कोटी रुपये) असे होते, असे ‘सेबी’कडे उपलब्ध माहितीवरून स्पष्ट होते. जानेवारीअखेर गुंतवणुकीचे प्रमाण घसरून ७८,६४४ कोटी रुपये असे होते. त्या आधीच्या ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा तीन महिन्यांत ते अनुक्रमे ८५,३७६ कोटी, ८८,००० कोटी आणि ८५,३०६ कोटी रुपये होते.
विशेषत: दोन्ही प्रमुख निर्देशांक – निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये बँकिंग समभागांचा भारांक मोठा असल्याने, म्युच्युअल फंडाच्या निधी व्यवस्थापकांना बँकिंग समभागांमध्ये गुंतवणूक न टाळता येणारी व अपरिहार्य स्वरूपाचीच ठरते. तथापि आजच्या घडीला उद्योगक्षेत्रनिहाय बँकिंग क्षेत्रावरच त्यांची सर्वाधिक मदार असल्याचे दिसून येते.

बँकांवरच सर्वाधिक मदार
उद्योगक्षेत्रनिहाय बँकिंग क्षेत्रावरच इक्विटी म्युच्युअल फंडांची सर्वाधिक (८५,३३० कोटी रुपये) मदार असल्याचे दिसून येते. सॉफ्टवेअर समभागांमध्ये त्या खालोखाल ४०,१९४ कोटी रु., त्यानंतर औषधी उद्योग ३२,८२० कोटी रु., वाहन उद्योगात
२८,५६३ कोटी रु. आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील समभागांमध्ये २६,५६० कोटी रु. अशी इक्विटी योजनांतून गुंतवणुकीची एप्रिलअखेर स्थिती होती.