रेल्वे अर्थसंकल्पातील आव्हानात्मक महसुली लक्ष्याबाबत उद्योगक्षेत्राचा चिंतेचा सूर
मालवाहतुकीसाठी तीन नवीन स्वतंत्र मार्गिका २०१९ पर्यंत विकसित झाल्यास वाहतूक खर्चात मोठी कपात शक्य होणार असल्याने, उद्योगक्षेत्राने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पाचे ‘वृद्धिप्रवण’ असे वर्णन करून स्वागत केले आहे. तथापि कोणतीही भाडेवाढ न करता या अर्थसंकल्पाने निर्धारित केलेल्या १.८४ लाख कोटी रुपयांच्या महसुली उद्दिष्टाच्या सफलतेबाबत साशंकतेचा सूरही व्यक्त केला आहे.
प्रवासी अथवा मालवाहतूक भाडय़ात कोणतीही वाढ नाही हे या अर्थसंकल्पाचे वैशिष्टय़ आहेत, पण तीन नवीन अतिजलद गाडय़ा आणि उत्तर-दक्षिण, पूर्व-पश्चिम आणि पूवरेत्तर किनाऱ्यांवर मालवाहतुकीच्या स्वतंत्र मार्गिका (फ्रेट कॉरिडॉर्स) २०१९ सालापर्यंत उभारण्याचे ठेवल्या गेलेल्या उद्दिष्टाचे उद्योगक्षेत्राने भरभरून स्वागत केले आहे.
या तीन स्वतंत्र मार्गिका दिल्ली व चेन्नईला (उत्तर-दक्षिण), खडगपूर व मुंबईला (पूर्व-पश्चिम) आणि पूर्व किनाऱ्यावर खडगपूर व विजयवाडा यांना जोडणाऱ्या असतील, असे रेल्वे अर्थसंकल्पाने प्रस्तावित केले आहे.
लार्सन अँड टुब्रोच्या रेल्वे व्यवसायाचे मुख्याधिकारी राजीव ज्योती यांनी, देशांतर्गत अर्थव्यवस्थेचा (जीडीपी) विकास मंदावलेला असताना, रेल्वेमंत्र्यांचे १.८४ लाख कोटींचा महसूल गोळा करण्याचे लक्ष्य खूपच महत्त्वाकांक्षी भासत आहे, असे मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी अमलात येण्याने रेल्वेवर ३०,००० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असताना, निर्धारित ९२ टक्के दराने कार्यात्मक परिमाण साधले जाणेही खूपच अवघड दिसत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
भारतीय उद्योग महासंघ अर्थात सीआयआयचे अध्यक्ष सुमित मजुमदार यांनी मालवाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिकांमुळे वाहतूक खर्चात मोठी कपात शक्य होणार असल्याचे सांगितले.
ठरविलेले प्रकल्प मार्गी लावून ते वेळेत पूर्ण करण्यावर भरही स्वागतार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.
मालवाहतूक धोरणाचा तर्कसंगत फेरआढावा, खासगी-सार्वजनिक भागीदारीच्या धोरण आराखडय़ाची फेररचना या गोष्टी खासगी क्षेत्रातील सहभागासाठी आकर्षक ठरतील. रेल्वे वाहतुकीत सुधारणा आणि महसुली वाढीच्या दृष्टीने या पावलांचे उद्योगक्षेत्राने स्वागत केले आहे.
एकात्मिक रेल्वे जाळे विकसित करण्यासाठी पडलेले पाऊल, समर्पित मालवाहतूक मार्गिका बनविण्यावर भर आणि बंदरांना तसेच उत्तर व पूर्व भारताला जोडणारे दुवे निर्माण करून रेल्वेला मालवाहतूक व्यवसायात मोठी वाढ करता येईल, अशी फिक्कीचे अध्यक्ष हर्षवर्धन नेवटिया यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
मालवाहतुकीच्या संदर्भात अनेक गुणात्मक पावले उचलली गेली आहेत, तरी त्यांचे ठोस फलित पाहावे लागेल, असे सीआयआयच्या रेल्वे वहन विभागाचे अध्यक्ष तिलक राज सेठ यांनी सांगितले.
सद्य आव्हानात्मक आर्थिक स्थितीत भाडेवाढ न करता, रेल्वेमंत्र्यांनी भांडवली खर्चाबाबतही कोणतीही तडजोड न करणे खूपच धाडसाचे आहे, असे मत अ‍ॅसोचॅमचे अध्यक्ष सुनील कनोरिया यांनी व्यक्त केले.

निर्यातदारांकडून स्वागत
देशाच्या एकूण ७,५१७ किलोमीटर लांबीच्या सागर किनाऱ्यांना रेल्वे जाळ्याशी जोडण्याचे यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पाने टाकलेल्या पावलाचे निर्यात उद्योगाच्या दृष्टीने सकारात्मक परिणाम दिसून येतील, असा विश्वास इंजिनीयरिंग एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल (ईईपीसी)चे अध्यक्ष टी. एस. भसीन यांनी व्यक्त केला. विशेषत: सध्याच्या भिकार पायाभूत सोयीसुविधांमध्ये सुधारणेची नितांत आवश्यकता होती. देशात व्यवसायनुकूल वातावरणाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरेल, अशी प्रतिक्रिया फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन (फियो) या संघटनेने व्यक्त केली आहे. चेन्नई येथे रेल ऑटो हब विकसित करण्याचे तसेच मालवाहतूक टर्मिनल्स शेजारी असणाऱ्या मोकळ्या जागांमध्ये शीतगृह सुविधा उभारण्याचे रेल्वे अर्थसंकल्पाने केलेले सुतोवाच निर्यातदारांसाठी खूपच उपकारक ठरतील, अशीही या दोन्ही संघटनांची प्रतिक्रिया आहे.