बरोबर दहा दिवसांनी आपल्या ७५ व्या वाढदिवशी सुमारे १०० अब्ज डॉलरच्या ‘टाटा सन्स’मधून निवृत्त होणारे रतन टाटा हे यापुढे मानद अध्यक्ष म्हणून कार्यरत असतील. रतन टाटा यांचे वारसदार म्हणून ४४ वर्षीय सायरस मिस्त्री यांची यापूर्वीच निवड झाली आहे. ते येत्या २८ डिसेंबर रोजी समूहाच्या अध्यक्षपदावर आरुढ होतील.
पोलाद, खाद्या, वाहन, माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार, बांधकाम आदी विविध क्षेत्रातील आघाडीचा समूह असलेल्या टाटा सन्सच्या संचालक मंडळाची मंगळवारी मुंबईत बैठक झाली. त्यात पद्म विभूषण सन्मानित रतन टाटा यांच्या मानद अध्यक्ष व सायरस मिस्त्री यांच्या नावावर नवे अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले.
तब्बल दोन दशके (१९९१ पासून) टाटा समूहाचे अध्यक्षपद भूषविणारे रतन टाटा यांनी आपल्या वारसदाराच्या शोधासाठी वर्षभरापूर्वीच निवड समिती नियुक्त केली होती. तिच्या परिक्षेत टाटा समूहात संचालक असलेले सायरस मिस्त्री नोव्हेंबर २०११ मध्ये उत्तीर्ण झाले होते. यानंतर त्यांची उपाध्यक्ष म्हणून लगेचच निवड जाहीर करण्यात आली. अगदी काल-परवापर्यंत सायरस यांच्याकडे समूहातील उपकंपन्यांचे प्रमुखपदही टप्पा-टप्प्याने आले. अगदी गेल्याच आठवडय़ात मिस्त्री यांची टाटा स्टील आणि टाटा केमिकल्सचे अध्यक्ष म्हणून नाव जाहीर झाले होते.
टाटा समूहामध्ये सर्वात मोठा (१८.५%) भागीदार असणाऱ्या शापूरजी पालनजी अ‍ॅण्ड कंपनी या कंपनीचे सायरस मिस्त्री टाटा समूहामध्ये २००६ पासून संचालक आहेत. बांधकाम क्षेत्रातील आघाडीच्या उद्योग समूहाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शापूरजी पालनजी मिस्त्री यांचे सायरस हे धाकटे पुत्र होय. त्यांची पत्नी रोहिका छागला ही प्रसिद्ध वकिल इक्बाल छागला यांची मुलगी होय. मिस्त्री यांची एक बहिण रतन टाटा यांचे सावत्र बंधू नवल यांची पत्नी आहे. मिस्त्री यांचे नाव रतन टाटा यांचे वारसदार म्हणून निश्चित होण्यापूर्वीच नवल यांच्यावर समूहाच्या आंतरराष्ट्रीय   व्यवसायाची जबाबदारी सुपूर्द करण्यात आली.
रतन टाटा यांनी १९६२ मध्ये समूहात पाऊल ठेवले. १९७१ मध्ये त्यांची नॅशनल रेडिओ अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. १९८१ मध्ये ते टाटा इंडस्ट्रिजचे अध्यक्ष बनले. येथेच समूहात धोरणे राबविणे उच्च तंत्रज्ञान व्यवसायावर लक्ष केंद्रीत करणे आदींवर त्यांनी भर दिला. कॉर्नवेलमधून १९६२ मध्ये स्थापत्य पदवीप्राप्त असलेले टाटा यांनी त्यावेळी लॉस एंजल्सच्या ‘जॉन्स अ‍ॅण्ड एम्मन्स’मध्येही त्यांनी काम केले. १९७५ मध्ये त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून व्यवस्थापनाचा अभ्यासक्रमही पूर्ण केला.
१९९१ ते २०१२ या आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत टेटली, जग्वार लॅण्ड रोव्हर, कोरससारखे आंतरराष्ट्रीय कंपन्यांवर ताबा प्रक्रिया नेटाने यशस्वी ठरविली. मित्सुबिशी कॉर्पोरेशन, अमेरिकन इंटरनॅशनल ग्रुप, जेपी मॉर्गन चेस, रोल्स रॉईस, टॅमासेक होल्डिंग्स आदी आंतरराष्ट्रीय कंपन्यांवरही त्यांनी संचालक म्हणून काम केले आहे. पंतप्रधानांच्या व्यापार आणि उद्योग समित्यांवरही टाटा हे सदस्य राहिले आहेत.