देशातील नागरी सहकारी बँकांचे परवाने, नियम, त्यांचा व्यवसाय आकार आदींबाबत पुनर्आढावा व त्याअनुषंगाने योग्य शिफारसी करण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. नागरी सहकारी बँकांसाठी गेल्या वर्षी रिझव्‍‌र्ह बँकेच्या स्थायी सल्लागार समितीने केलेल्या शिफारसींनुसार ही समिती तयार करण्यात आली आहे. गांधी यांच्या नेतृत्वाखालील ही आठ सदस्यीय समिती नागरी सहकारी बँकांचा व्यवसाय आकार, भांडवल पर्याप्तता, नियमन याबाबतचा आपला अहवाल समितीच्या पहिल्या बैठकीनंतर तीन महिन्यांत रिझव्‍‌र्ह बँकेला देईल.