एचडीएफसी बँकेच्या चौघांसह सहा जणांना अटक
सार्वजनिक क्षेत्रातील ‘बँक ऑफ बडोदा’च्या माध्यमातून विदेशातील बेकायदेशीर ६,१०० कोटी रुपयांच्या निधी हस्तांतरण प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने मंगळवारी संबंधित बँकेच्या दोन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेच्या नवी दिल्लीतील परकी चलन विनिमय विभागातील एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बँकेच्या नवी दिल्लीतील शाखेतील विविध खात्यांमार्फत हाँगकाँगमध्ये ६,१०० कोटी रुपये हे वायदा वस्तूंच्या आयातीपोटी हस्तांतरित केल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने सुरू केला असून शनिवारी याअंतर्गतच छापा सत्र मोहीम राबविली होती.
कोण आहेत अटकेत?
केंद्रीय अन्वेषण विभागाने हा तपास विस्तारताना मंगळवारी बँक ऑफ बडोदाच्या नवी दिल्लीतील अशोक विहार शाखेतील विदेशी चलन विनिमय विभागाचे सहायक सरव्यवस्थापक एस. के. गर्ग व जैनिश दुबे या दोघांना अटक केली. तर अंमलबजावणी महासंचालनालयाने मंगळवारीच अटक केलेल्या चार जणांमध्ये खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेचा कमल कालरा याच्यासह चंदन भाटिया, गुरुचरण सिंग धवन व संजय अगरवाल या तिघांनाही अटक केली. हे चौघेही १५ खोटय़ा कंपन्यांचे मध्यस्थ म्हणून कार्यरत होते, अशी माहितीही मिळाली आहे.
नेमके काय केले?
कालरा हा बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून भाटिया तसेच अगरवाल यांना प्रत्येक अमेरिकी डॉलरमागे ३० ते ५० पैसे मानधन (कमिशन) घेऊन सहकार्य करीत असे. तर धवन हा तयार वस्त्रप्रावरणांचा निर्यातदार आहे. धवनबरोबर भाटियाने हाँगकाँगमध्ये बनावट कंपन्या स्थापन केल्या होत्या. अगरवालने ४३० कोटी रुपयांच्या प्रमाणातील विदेशी निधी बँक ऑफ बडोदाच्या नवी दिल्लीतील अशोक विहार शाखेमार्फत यशस्वीरीत्या पाठविला होता.
विविध ५९ खात्यांमध्ये ५,१५१ कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती बँक ऑफ बडोदाने तपास यंत्रणेला दिली आहे. पैकी ३४३ कोटी रुपये हे बँकेच्या शाखेत रोकड स्वरूपात, तर उर्वरित ४,८०८ कोटी रुपये हे अन्य मार्गाने जमा झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात झालेले ८,००० संशयास्पद व्यवहार हे जुलै २०१४ ते जुलै २०१५ दरम्यानचे आहे.

बाह्य़ यंत्रणेकडून लेखा परीक्षण
बँकेत झालेल्या गैरव्यवहारांबाबत आम्ही गंभीर आहोत. एकूणच या सर्व प्रकरणाचा तपास करण्यासाठी आम्ही एक स्वतंत्र यंत्रणा नियुक्त करीत आहोत. तर आठवडाभरात बाह्य़ संस्थेकडून लेखा परीक्षण अहवाल समितीसमोर सादर करण्यात येईल. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी बँकिंग व्यवस्थेतत काही बदलही करण्याची योजना आहे.
’ पी. एस. जयकुमार,
नवनियुक्त मुख्याधिकारी

मुख्याधिकारीपदी जयकुमार रुजू

मुंबई : घोटाळ्यांमुळे चर्चेच असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारपदाची सूत्रे पी. एस. जयकुमार यांनी मंगळवारपासून स्वीकारली. ५३ वर्षीय जयकुमार हे खासगी वित्त क्षेत्रातून आलेले पहिले व्यक्तिमत्त्व आहे. सनदी लेखापाल तसेच व्यवसाय व्यवस्थापनातील शिक्षण घेतलेल्या जयकुमार हे व्हीबीएचसी व्हॅल्यू बजेट हाऊसिंग (व्हीबीएचसी) या माफक दरातील घरनिर्मिती क्षेत्रातील कंपनीचे सहसंस्थापक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी राहिले आहेत. राष्ट्रीय गृह बँक (एनएचबी) मार्फत नियमन होणाऱ्या होम फर्स्ट फायनान्स कंपनीचेही ते सहसंस्थापक राहिले आहेत. अमेरिकेच्या सिटी बँकेच्या भारतातील ते व्यवसायात २३ वर्षे कार्यरत होते.