अनेक महिन्यांत रोडावलेल्या थेट विदेशी गुंतवणुकीनंतर देशातील दूरसंचार क्षेत्राला चालू आर्थिक वर्षांचे पहिले दोन महिने चांगले गेले आहेत. एप्रिल व मे २०१४ मध्ये दूरसंचार क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणूक वार्षिक तुलनेत १.५ अब्ज डॉलर झाली आहे.
२०१३-१४ दरम्यान ही गुंतवणूक १.३ अब्ज डॉलर होती. एप्रिल व मे २०१३ मध्ये ही गुंतवणूक ९० लाख डॉलर होती. भारतीय कंपनीतील व्होडाफोनची १०० टक्क्यांपर्यंतची हिस्सा खरेदी आणि ध्वनिलहरी परवाना लिलाव यामुळे या क्षेत्रातील गुंतवणूक वाढल्याचे ‘सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया’चे महासंचालक राजन मॅथ्यूज यांनी म्हटले आहे.
२०१०मध्ये नव्या पिढीतील ४जी ध्वनिलहरी परवाने मिळविणाऱ्या कंपन्याही आता त्यांच्या व्यवसाय विस्तारासाठी आणखी गुंतवणूक सुरू करतील, असेही चित्र आहे.