मोसमानुरूप पादत्राणे तसेच जॅकेट आदींमध्ये केलेल्या नावीन्यपूर्ण बदलांना बडय़ा महानगरांबाहेरही उमदा प्रतिसाद मिळालेल्या ‘वूडलँड’ने देशभरात चालू आर्थिक वर्षांत नव्या ६० दालनांची भर टाकण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. यासाठी ९० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून कंपनीने १,३०० कोटींच्या उलाढालीचे उद्दिष्ट राखले आहे.
पादत्राणे क्षेत्रातील ‘वूडलँड’चे गेल्या दोन दशकांहून अधिक कालावधीपासून भारतात अस्तित्व असून कंपनीचे देशभरात पाचहून अधिक ठिकाणी उत्पादन प्रकल्प आहेत. पादत्राणांबरोबरच कंपनीने मोसमानुरूप वापरात येणाऱ्या जॅकेटसाठी अनोखे तंत्रज्ञान अवलंबिले आहे. बाहेरचे हवामान व अंतर्गत सुटसुटीतपणा यासाठी आपल्या उत्पादनात बदल करण्यात आले आहेत.
कंपनीच्या या उत्पादनांना मोठी तसेच निमशहरांमधून तसेच तरुण वर्गाकडून विशेष प्रतिसाद मिळत असल्याचे ‘वूडलँड’चे व्यवस्थापकीय संचालक हरकिरत सिंग यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. अशा वस्तूंची उपलब्धता विस्तारण्याच्या दिशेने कंपनी आणखी ६० दालने सुरू करत असल्याचेही ते म्हणाले. कंपनी वर्षांला ४० लाख पादत्राणांची निर्मिती करते व वर्षांगणिक ती २० टक्क्यांनी वाढविली जाते.
देशभरात ४८० दालन साखळी व ४०० अन्य दालनांमध्ये विविध वस्तू उपलब्ध असताना ‘वूडलँड’ सरासरीच्या १,५०० चौरस फूट दालनांऐवजी १,००० चौरस फूट दालनांचे जाळे विस्तारणार असल्याचे सिंग यांनी सांगितले. त्याचबरोबर गेल्या वर्षांतील कंपनीची १,००० कोटी रुपयांची उलाढालही १,३०० कोटी रुपयांपर्यंत नेण्यात येईल, अशी माहितीही सिंग यांनी दिली.

टाटा, रिलायन्स नवे स्पर्धक..
पादत्राणे क्षेत्रात विदेशी कंपनी बाटाचे अस्तित्व कायम असताना देशी कंपन्यांनीही यात आपले स्थान बळकट करण्याचा प्रयत्न गेल्या काही महिन्यांपासून सुरू केला आहे. टाटा समूहातील टाटा इंटरनॅशनलने अमेरिकेच्या एरोसोल्सची महिला वर्गासाठीची पादत्राणे भारतात उपलब्ध करून दिली आहेत. एरोसोल्सच्या पादत्राणांच्या येथील विविध दालनांमध्ये विक्रीचे अधिकार यामार्फत टाटा इंटरनॅशनलला मिळाले आहेत. तर गेल्याच आठवडय़ात रिलायन्स रिटेलने आपल्या दालनांमध्ये पाश्चिमात्य कंपनी पॅलेस शूसोर्सची पादत्राणे उपलब्ध करून दिली. कंपनीने खासोहिला क्रीडापटू सानिया मिर्झा हिच्या प्रमुख उपस्थितीत नव्या उत्पादनांची शंृखला सादर केली होती.
 ई-कॉमर्ससाठी विशेष उत्पादने
ग्राहकांचा ई-कॉमर्सकडील वाढता कल लक्षात घेत ‘वूडलँड’ने या गटासाठी स्वतंत्र पादत्राणे आदी उत्पादने तयार करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे कंपनीची उत्पादने तोच दर्जा राखून अधिक वर्गापर्यंत पोहोचण्यास सहकार्य होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. एरवी कंपनीची पादत्राणे अधिकृत दालनांमध्ये किमान ३,००० रुपयांपुढे उपलब्ध आहेत. कंपनीच्या स्वत:च्या ऑनलाइन व्यासपीठावरील विक्रीवाढ गेल्या तीन वर्षांत दुप्पट झाल्याचेही सांगण्यात आले.