अमेरिकी शेअर बाजारातल्या तेजीने गेल्या आठवडय़ात नवव्या वर्षांत प्रवेश केला. ट्रम्प यांच्या निवडणुकीनंतर या तेजीला नवं टॉनिक मिळालं असलं, तरी ताणलेल्या मूल्यांकनाचा विचार केला तर या तेजीचा पुढचा प्रवास साशंकतेच्या सावटाखाली आणि अनेक सुरुंगांच्या सान्निध्यात राहील, असं दिसतं.. 

गेल्या आठवडय़ात (९ मार्चला) जागतिक वित्तीय बाजारांनी एका खास वाढदिवसाची प्रकर्षांने नोंद घेतली. अमेरिकन शेअर बाजारातल्या तेजीने त्या दिवशी आठ र्वष पूर्ण करून नवव्या वर्षांत पदार्पण केलं. ‘तेजीची आठ र्वष’ हा तसा थोडा फसवा शब्दप्रकार आहे. खरं तर मंदीला हुलकावणी देण्याची आठ र्वष असा त्याचा खरा अर्थ आहे. बाजार-निर्देशांकात २० टक्क्यांपेक्षा मोठी घट झाली, तरच त्याला मंदी म्हणण्याचा प्रघात आहे.  जोपर्यंत बाजार एवढय़ा मोठय़ा घसरणीपासून दूर राहील, तेवढी र्वष तेजीची मानली जातात. तेजीच्या काळातही बाजार पाच-दहा (कधी जास्तही) टक्क्यांनी घसरू शकतो, पण २० टक्क्यांची पातळी ओलांडली नाही, तर अशा घसरणीला केवळ तेजीच्या प्रवाहातली पीछेहाट मानलं जातं.

अमेरिकन शेअर बाजारामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात आतापर्यंत मंदीचे १२ कालखंड नोंदवले गेले आहेत. त्यांचा सरासरी कालावधी बारा महिन्यांचा होता. या मंदीच्या कालखंडांव्यतिरिक्त बाकीचा काळ अर्थातच तेजीचे कालखंड होते – त्यांचा सरासरी कालावधी चौपन्न महिने, म्हणजे साडेचार वर्षांचा होता. सध्याच्या तेजीने त्या सरासरीला कधीच पार केलंय. डिसेंबर १९८७ ते मार्च २००० अशी सव्वाबारा र्वष चाललेली तेजी ही अलीकडच्या काळातली सर्वात लांबलचक तेजी होती. त्या काळात निर्देशांक जवळपास सातपट झाला आणि डॉटकॉमचा फुगा फुटल्यावरच ती तेजी थांबली होती. त्या तेजीच्या खालोखाल सध्या सुरू असलेल्या तेजीचा क्रमांक लागतो. ९ मार्च २००९ पासून सुरू झालेल्या या आठ वर्र्षांच्या प्रवासात निर्देशांक आतापर्यंत जवळपास २.८ पट फुगलाय.

जगाच्या शेअर बाजार-मूल्यापैकी ३५ ते ४० टक्के मूल्य केवळ अमेरिकेत असल्याने आणि आजच्या काळात बातम्या आणि बाजारभावनांचं संक्रमण अतिशय वेगाने होत असल्यामुळे इतर बाजारांचा रोखही अनेकदा अमेरिकन शेअरबाजाराशी निगडित असतो. भारतीय शेअर बाजारही याला अपवाद नाही. वर नमूद केलेल्या २० टक्क्यांच्या निकषानुसार भारतीय बाजाराने एकविसाव्या शतकात आतापर्यंत चार वेळा मंदी अनुभवली आहे. त्यातल्या दोन वेळा आपल्या बाजारातल्या मंदीचा कालखंड हा अमेरिकन बाजारातल्या मंदीच्या कालखंडाच्या आसपासचा राहिला आहे. इतर दोन वेळाही अमेरिकन बाजार तांत्रिकदृष्टय़ा मंदीत नसला तरी बराच नरम होता. मार्च २०१५ ते फेब्रुवारी २०१६ या काळात भारतीय शेअर बाजाराने शेवटची मंदी अनुभवली, तर अमेरिकन बाजाराने दहा टक्क्यांची पीछेहाट अनुभवली.

अमेरिकन बाजारांमध्ये सध्या सुरू असलेल्या तेजीचा प्रवास सुरुवातीला तसा अडखळतच झाला होता. जागतिक वित्तीय संकटाच्या दु:स्वप्नानंतर २००९ मध्ये सुरू झालेली ही तेजी जेमतेम सव्वा वर्षांची असतानाच ग्रीसच्या दिवाळखोरीचं संकट उभं ठाकलं. तीन महिन्यांमध्ये बाजार अठरा टक्क्यांनी कोसळला. जेमतेम मंदी टाळून बाजाराने पुन्हा उभारी धरली, तर वर्षभरानंतर युरोपियन संकटाच्या दुसऱ्या आवर्तनात २०११ मध्ये बाजाराने पुन्हा तेरा टक्क्यांची आपटी खाल्ली. अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्ह या केंद्रीय बँकेने आणि युरोपियन केंद्रीय बँकेने अभूतपूर्व असं सैल मुद्राधोरण राबवून रोखेखरेदी करण्याचा आणि नवीन पैसा ओतण्याचा सपाटा लावला नसता, तर या तेजीने त्या दोन वर्षांमध्येच कधी तरी अवतार आटोपता घेतला असता. तांत्रिकदृष्टय़ा दोन वेळा मंदी टाळल्यानंतर सप्टेंबर २०११ ते फेब्रुवारी २०१५ या काळातला तेजीचा प्रवास तसा निर्वेध राहिला. या तेजीत आतापर्यंत निर्देशांकात जी वाढ झालीये, त्यातली सुमारे दोन-तृतीयांश वाढ ही त्या साडेतीन वर्षांमध्येच झाली. पुढे अमेरिकन निवडणुकांपर्यंत बाजाराने मंदी तर टाळली, पण निर्देशांक विशेष प्रगती न दाखवता पुढे-मागे घुटमळत होता.

अमेरिकेतल्या निवडणुकांच्या प्रचाराच्या दरम्यान ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांविषयी बाजारातल्या मंडळींना फारसं प्रेम नव्हतं. उलट त्यांची सामाजिक भूमिका आणि चीन-मेक्सिको वगैरे देशांविषयीची आगखाऊ भाषा यांच्यामुळे त्यांच्या कारकीर्दीत शांतता धोक्यात येऊन उद्योग-व्यवसायाची हानीच होईल, अशी बाजाराची त्या वेळची भावना दिसायची. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा-जेव्हा हिलरी क्लिंटन यांचं पारडं भारी दिसायचं, तेव्हा बाजारात तरतरी यायची आणि ट्रम्प यांची सरशी होताना जाणवली की बाजार कोमेजायचा.

या पाश्र्वभूमीवर ९ नोव्हेंबरला ट्रम्प विजयी झाल्याची अनपेक्षित बातमी आली, तेव्हा साहजिकच बाजाराचं निरीक्षण करणाऱ्यांनी असा आडाखा बांधला की २००९ पासून सुरू असलेली तेजी आता राम म्हणणार! पण काही दिवसांमध्ये झालं ते भलतंच. काही दिवसांपूर्वीपर्यंत ट्रम्प हरावेत, म्हणून प्रार्थना करणाऱ्या बाजार-मंडळींनी नव्या वास्तवाशी झपाटय़ाने जुळवून घेतलं. सर्वात आधी अमेरिकेचे हितसंबंध जपण्याच्या ट्रम्प यांच्या भूमिकेतून अर्थव्यवस्थेला काय काय फायदा होईल, याची जंत्री विश्लेषक बनवू लागले. शेअर बाजाराला ओहोटी येण्याऐवजी भरती आली. बाजारातल्या या नव्या खेळीचं ‘ट्रम्प ट्रेड’ असं नामकरण झालं. ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड जाहीर झाल्यापासूनच्या तीन महिन्यांमध्ये अमेरिकन शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसघशीत पंधरा टक्के वाढ झाली. आठवं वर्ष पूर्ण करताना तेजीला अशी जणू नवसंजीवनीच मिळाली!

गेल्या आठ वर्षांची तेजी ही पूर्वीच्या तेजीच्या कालखंडांपेक्षा काही बाबतीत खूप निराळी होती. तिला प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेतल्या तेजीचं तेज नव्हतं. या आठ वर्षांमधला अमेरिकेच्या जीडीपीवाढीचा सरासरी दर फक्त १.२ टक्के होता. फेडरल रिझव्‍‌र्हच्या कुबडय़ांशिवाय अर्थव्यवस्था उभी राहू शकेल, याचा भरवसा आताआतापर्यंत वाटत नव्हता. त्यामुळे अमेरिकेतले व्याजदर एका टक्क्याच्या खाली राहिलेली अशी ही एकमात्र बाजार-तेजी असेल. तिच्या कालखंडात ओबामा आणि काँग्रेस यांच्यातल्या तणावामुळे अमेरिकेने एकदा आपलं सर्वोच्च पतमानांकनही गमावलं. बाजार-तेजीची आठ र्वष पूर्ण होता होता मात्र अमेरिकेच्या आर्थिक निर्देशाकांमध्ये धुगधुगी जाणवायला लागली आहे, रोजगारनिर्मितीने वेग पकडला आहे आणि फेडरल रिझव्‍‌र्हनेही व्याजदर पूर्वपातळीवर नेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

अमेरिकन बाजार-तेजीचं भवितव्य काय असेल, याकडे जागतिक वित्तीय बाजारांचं सध्या लक्ष लागून आहे. एकीकडे ‘ट्रम्प ट्रेड’च्या नावाखाली तेजीला टॉनिक मिळालंय; पण दुसरीकडे समभागांचं मूल्यांकन कमालीचं ताणलं गेलंय. समभागांच्या किमती आणि प्रत्येक समभागाच्या मागे मिळणारा नफा यांचं गुणोत्तर हे मूल्यांकन मापण्यासाठी पाहिलं जातं. सध्या निर्देशांकातील कंपन्यांना मिळणाऱ्या नफ्याच्या प्रत्येक डॉलरमागे समभागांची बाजार-किंमत जवळपास तीस डॉलपर्यंत पोहोचली आहे (रॉबर्ट शिलर यांच्या पद्धतीनुसार). हे गुणोत्तर गेल्या दहा वर्षांच्या सरासरीपेक्षा २७ टक्के जास्त आहे. इतिहासात पाहिलं तर एवढं ताणलेलं मूल्यांकन सहसा मोठय़ा मंदीच्या आधीच अनुभवलं गेलं आहे. २००७ आणि २००९ मधले मंदीचे कालखंड साधारण एवढय़ाच मूल्यांकन-पातळीनंतर सुरू झाले होते. १९८७ ते २००० च्या तेजीत मात्र मूल्यांकनाचं गुणोत्तर जवळपास पंचेचाळीसपर्यंत पोहोचलं होतं.

ज्या वेळी बाजाराचं मूल्यांकन ताणलं जातं, त्या वेळी मंदीच्या धोक्याची पातळी वाढते. मग तेजीला मागे सारून मंदीचं साम्राज्य आणायला कधी काही छोटी निमित्तंही पुरेशी ठरतात. सध्या तर असे अनेक संभाव्य घटक आहेत, की जे निमित्ताचं काम करू शकतील. युरोपात फ्रान्सच्या निवडणुकीनंतर युरोला पुन्हा आव्हान मिळायचा धोका आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातला वाढणारा तणाव, उत्तर कोरियाच्या कुरापती, ब्रेग्झिटच्या वाटाघाटींमध्ये येणारे अडथळे असे अनेक साप बाजार-तेजीच्या आगामी वाटचालीतल्या घरांमध्ये दबा धरून आहेत.

सगळ्यात मोठा धोका हा ‘ट्रम्प ट्रेड’च्या भविष्याविषयीच आहे. अमेरिकेतली प्रकल्प गुंतवणूक वाढवायची आणि आर्थिक विकासाच्या दराला वर खेचायची जादूची छडी ट्रम्प यांच्याकडे नाही, हे हळूहळू बाजार-मंडळींच्या ध्यानात येतंय. आयातीचे मार्ग रोखण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने काही अतिरेकी उपाययोजना केली आणि त्यातून व्यापार-युद्ध किंवा इतर काही दुष्परिणाम झाले तर ‘ट्रम्प ट्रेड’चा फासा उलटाही पडू शकेल. फेडरल रिझव्‍‌र्हकडून व्याजदर वाढवताना काही कमी-जास्त झालं तरदेखील शेअर बाजारात घबराट पसरूशकेल.

या सगळ्या संभाव्य सुरुंगांच्या सान्निध्यात बाजार-तेजीचा आगामी प्रवास होणार आहे. त्यातला कुठला सुरुंग तेजीला नख लावायला अंतिमत: कारणीभूत होईल, ते आता सांगणं तसं कठीण आहे; पण अमेरिकन बाजारातल्या तेजीने नववा वाढदिवस साजरा केला तर ते मोठं आश्चर्य ठरेल! भारतीय शेअर बाजारातही सध्या स्थानिक घटक अनुकूल दिसत असले तरी त्यांना या ‘उधारवया’तल्या सूर्याकडून फार काळ ऊर्जा मिळणार नाही, याची खूणगाठ बांधलेली बरी.

untitled-16

 

मंगेश सोमण

mangesh_soman@yahoo.com

लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात आर्थिक विश्लेषक म्हणून काम करतात.