आजच्या आधुनिक काळात, आर्थिक नियोजन करताना, तरुण, पती-पत्नीच्या उद्दिष्टांमध्ये आढळून येणारी व आर्थिक तरतूद करावी लागणारी गोष्ट म्हणजे ‘सॅबॅटिकल लीव्ह’ होय. यासाठी ‘मशागत रजा’ यापेक्षा दुसरा सुयोग्य मराठी शब्द नाही. आजच्या प्रचंड स्पर्धेच्या काळात आयुष्यभर नवीन-नवीन शिकत राहण्याची तरुणांची मानसिकता अशा मशागत रजेला जवळ करणारी आहे. पण बहुधा बिनपगारी असणाऱ्या रजेसाठी आर्थिक सज्जता पुरेपूर नियोजनानेच करावी लागते..
प्राचीन यहुदी ग्रंथांमध्ये दर सहा वर्षांनी एक वर्ष शेतात पीक घेतले जात नसे, असा उल्लेख आढळतो. या विश्रांती काळात शेताची मशागत केली जात असे. याला सॅबॅटिकल वर्ष म्हटले जाई. नंतरच्या काळात प्राध्यापकांना नवीन अभ्यासक्रम शिकून घेण्यासाठी किंवा संशोधनासाठी रजा दिली जात असे. याला सॅबॅटिकल रजा म्हटले जाई. तीच पद्धत आजच्या काळात उद्योग जगतात आढळून येते. आपल्या उद्दिष्टांसाठी नोकरी/व्यवसायातून काही काळ बाहेर येऊन (रजा घेऊन) नव्याने पुन्हा नोकरी/व्यवसायात रुजू होता येते. हा कालावधी ७-८ दिवसांपासून काही वर्षांपर्यंत असतो. ही रजा काही वेळेस भरपगारी असते तर खूपदा बिनपगारी असते. बिनपगारी रजेची तरतूद आर्थिक नियोजनात करावी लागते.
बहुतेक वेळा बत्तीस ते पस्तीस वयादरम्यान आयुष्यात थोडे स्थैर्य आलेले असते. कर्जाचे हप्ते (मुख्यत्वे घराच्या) अंगवळणी पडलेले असतात. मुले शाळेत जाऊ लागलेली असतात आणि पूर्वी शिक्षण सलगरीत्या पूर्ण करता न आलेले आता करता येणे शक्य असते. उदा. आपल्या क्षेत्रात संशोधन (पीएचडी) किंवा आयआयएमसारख्या संस्थेतून एमबीए इत्यादीसाठी आपल्या नोकरी, व्यवसायातून दोन ते पाच वर्षे बाजूला काढावी लागतात. खूपदा कंपन्या यासाठी चांगल्या कर्मचाऱ्यांसाठी येणारा खर्च उचलतात. पुढे पाच वर्षांसाठी नोकरी न सोडण्याचा बॉण्ड लिहून घेतात. नवीन शिक्षणामुळे/ज्ञानामुळे त्या कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेत वाढ झालेली असते. त्याचा फायदा त्या संस्थेस होणार असतो. संशोधन प्रकल्प खूपदा कंपनीच्या सोयीने निवडला जातो. अशा वेळेस अशिलाचे आर्थिक नुकसान होत नाही. आर्थिक नियोजनात याची तरतूद करावी लागत नाही.
परंतु, खूपदा भरपगारी रजा किंवा शिक्षणखर्च आस्थापनांतून मिळणार नसेल तर नोकरीचा राजीनामा दिला जातो, अशा वेळेस आर्थिक तरतूद करताना शिक्षण खर्च, कर्जाचे त्या कालावधीतील हप्ते व नेहमीचा मासिक घर खर्च या सर्वासाठी तरतूद आधीच्या काही वर्षांत करून ठेवावी लागते. उदाहरण म्हणून आयआयएम अहमदाबादमधून आपण एमबीए करण्याचे उद्दिष्ट विचारात घेऊ. वर्ष २०१६ ते २०१८ या शैक्षणिक कालावधीसाठी फी रु. १९.५ लाख आहे. कर्जाचे हप्ते दरमहा रु. ३५०००/- प्रमाणे २४ महिन्यांचे रु. ८.४ लाख व दरमहा घरखर्च रु. ३००००/- प्रमाणे २४ महिन्यांचे रु. ७.२० लाख, आयुर्विम्याचे वर्षांचे हप्ते रु. १ लाख मिळून एकूण तरतूद रु. ३६ लाख करणे.
ही तरतूद काही प्रमाणात कर्ज काढून तर मुख्यत्वे आधीच्या कालावधीत यासाठी बचत करून केली जाते. सध्याच्या काळात स्त्रिया नोकरी करीत असतात त्यामुळे घरखर्चाची तरतूद कमी केली जाते. बहुतेक वेळा ही संधी (शिक्षणासाठी रजेची) नवरा आधी घेतो. दोन/तीन वर्षांनंतर पत्नी पुढील शिक्षणाचा विचार करते.
आर्थिक नियोजनात दोघेही आपल्या उच्च शिक्षणासाठीची आर्थिक तरतूद आवर्जून नमूद करतात. उच्च शिक्षणातील गुंतवणूक सर्वात जास्त परतावा देते. शेअर बाजारातील गुंतवणूक काही काळ उणे परतावा देऊ शकते. बाजार भाव खाली जाऊ शकतात. ज्ञानार्जनातील गुंतवणूक कायमच खात्रीचा परतावा पुढील काही वर्षे देते. वरील उदाहरणात एकूण तरतूद रु. ३६ लाख आहे. दोन वर्षे अभ्यासक्रम संपल्यावर मिळणारे वेतन दर वर्षी ३६ लाखांनी वाढण्याची शक्यता खूप असते. आणि हे वेतन निवृत्तीपर्यंत वाढतच राहते. या शिक्षणानंतर आपण एका वेगळ्या उंचीवर / कार्यकक्षेत जातो जेथे व्यवस्थापनाचे नियम वेगळे असतात.
आजच्या प्रचंड स्पर्धेच्या काळात आयुष्यभर नवीन-नवीन शिकत राहावे लागते. अन्यथा आपण या स्पर्धेतून बाहेर फेकले जातो. म्हणून पन्नासाव्या वर्षीसुद्धा नवीन लहान अभ्यासक्रम (रिफ्रेशर कोर्सेस) निवडले जातात. ऑल्वीन टॉफलर यांनी म्हटले आहे, ‘एकविसाव्या शतकात अशिक्षित माणूस म्हणजे ज्याला लिहिता वाचता येत नाही तो नसून, जो शिकत नाही, जुने शिकलेले विसरून नवीन शिकत नाही, असा आहे.’
स्त्रियांच्या बाबतीत बाळंतपणाची रजा आणि मुले वाढवताना काही काळासाठी (एक ते पाच वर्षे) नोकरीतून राजीनामा देऊन बाहेर पडावे लागते. मुले थोडी मोठी झाली की पुन्हा नवीन नोकरी शोधली जाते. सरकारी आस्थापनातून नोकरीवर हक्क ठेवून रजेवर जास्त काळासाठी राहणे काही वेळा शक्य असते; परंतु खासगी क्षेत्रात ही सुविधा नसते. मध्यंतरीच्या कालखंडात खूप बदल झालेले असतात. आता दर दोन-तीन वर्षांनी टेक्नॉलॉजी बदलते. नवीन उपकरणे बाजारात येत असतात. त्यासाठी नवीन कौशल्ये आत्मसात करावी लागतात. एखादा अभ्यासक्रम करावा लागतो. जिथे लोकसंख्या कमी आहे अशा देशांत, माणसांच्या चांगल्या जीवनमानाची काळजी घेतली जाते. इस्रायलमध्ये सरकारतर्फे अशा महिलांसाठी विशेष कार्यशाळा घेतल्या जातात. युरोपमध्ये अशा महिलासांठी कमी तासांच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत.
या व्यतिरिक्त सामाजिक उपक्रमांत सहभागी होण्यासाठी काही जण वर्ष – दोन वर्षे आपल्या नोकरी/व्यवसायातून बाजूला होतात. भारतात इन्फोसिस किंवा टाटा यांसारख्या कंपन्या, अशा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देतात. एल अ‍ॅण्ड टी म्युच्युअल फंडाच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख गौरव वॉरमन यांनी रस्त्यावरील गरीब मुलांसाठी, निधी संकलनासाठी सायकलवरून काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास केला होता. इतर आस्थापनांमधील याबाबतची परिस्थिती फारशी उत्साहवर्धक नाही. अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, कॅनडासारख्या देशांमध्ये अशा पद्धतीत केलेल्या कामाचे योग्य मूल्यांकन करून, बढतीच्या वेळेस विचारात घेतले जाते. केंद्र व राज्य सरकारनेही याप्रमाणे योजना आखली होती.
आर्थिक नियोजन करताना या कालावधीसाठीच्या घरखर्चाची तरतूद किंवा इतर जबाबदाऱ्यांची तरतूद विचारात घेतली जाते. बहुतेक वेळा वयाच्या ४० ते ४५ दरम्यान किंवा ऐन तारुण्यात (लग्नापूर्वी) यासाठी रजा घेतली जाते. समाजसेवेची आवड असणाऱ्या व्यक्ती हा निर्णय घेतात. आजच्या काळात आपली आर्थिक घडी सांभाळून हे निर्णय घेतले जातात.
आपले छंद, आवडी निवडी जोपासण्यासाठी काही वेळेस मशागत रजा घेतली जाते. आपल्या रोजच्या दिनक्रमात आपले छंद, कला जोपासण्यास वेळ मिळत नाही. नृत्य, संगीत, फोटोग्राफी नव्याने शिकण्यासाठी किंवा ध्यानधारणा, योगासने, वाचन (एखाद्या विषयाचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने) यासाठी रजा घेतली जाते. प्रवासाची आवड असल्यास आपल्या कुटुंबाबरोबर किंवा आपल्या पालकांबरोबर काही काळ निवांतपणे घालवता यावा म्हणून काही महिने किंवा वर्ष रजा घेतली जाते. आज भारतात हे विचित्र वाटेल अशी परिस्थिती आहे. पण युरोप, अमेरिकेत या गोष्टी सहज आढळून येतात. यासाठीचे नियोजन खूप आधीपासून चालू होते. म्हणजे छंद जोपासण्यासाठी लागणारा कालावधी, येणारा खर्च, या काळातील इतर जबाबदाऱ्या उदा. मुलांचे शिक्षणासाठी खर्च, घरखर्च, कर्जाचे हप्ते, विम्याचे हप्ते इ. सर्वाची तरतूद विचारांत घेतली जाते.
याचे फायदे –
स्वत:ची ओळख- नेहमीच्या आरामदायी चाकोरीतून (कम्फर्ट झोन) बाहेर येऊन काम केल्याने नवीन नेतृत्व गुण निर्माण होतात. आपलीच आपल्याला नव्याने ओळख होते, आत्मविश्वास वाढतो.
नवीन उत्साह – अशा रजेनंतर नवीन ज्ञान, प्रशिक्षणामुळे नवीन दृष्टीने, उत्साह चैतन्यासह ती व्यक्ती कामास नव्याने सुरुवात करते. आपल्या इतर सहकाऱ्यांत स्फूर्ती निर्माण करते.
सर्जनशीलता – कोणत्याही प्रश्नाकडे वेगळ्या दृष्टीने, चाकोरीबाहेर जाऊन पाहता येते. वेगवेगळे पर्याय विचारात घेता येतात. या सर्वामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते व पर्यायाने कंपनीस फायदा होतो. इन्फोसिसचे माजी संचालक नारायण मूर्ती एकदा म्हणाले होते, ‘‘आमचे कुशल कर्मचारी ही इन्फोसिसची संपत्ती आहे पण ती आमच्या ताळेबंदात दाखवता येत नाही.’’
पूर्वीच्या काळी शिक्षण संपल्यावर एखाद्याा संस्थेत माणूस चिकटला की निवृत्त होईपर्यंत तेथेच राहत असे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात हे चित्र बदलले. कर्मचाऱ्यांची आस्थापनांवरील बांधिलकी कमी झाली. स्वाभाविकपणे कर्मचाऱ्यांना मशागत रजा, तीसुद्धा भर पगारी! शक्यच नाही. मग नोकरीचा राजीनामा देऊन आपल्या उद्दिष्टांसाठी बाहेर पडणे आले. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला खूप पुढे जायचे आहे. म्हणून अजून शिकायचे आहे. इतरांपेक्षा पुढे जाण्याच्या शर्यतीत व कर्जाचे हप्ते फेडण्याच्या नादात छंद, आवडी जोपासणे विसरायला होते. त्याची आठवण पन्नाशीचा भोज्जा गाठल्यावर होते.
आर्थिक नियोजन करताना कौटुंबिक लक्ष्यांबरोबरच वैयक्तिक उद्दिष्टे लिहिलेली असतात. त्यात महत्त्वाची, कमी महत्त्वाची असे वर्गीकरण असते. तरुण पिढीतील ग्राहक, मशागत रजेचे वर्गीकरण महत्त्वाच्या उद्दिष्टांत करतात. विचार स्पष्ट असतात. अठ्ठाविसाव्या वर्षीच नियोजनात सांगितले जाते की, तेहत्तिसाव्या वर्षी शिक्षणासाठी तीन वर्षे रजा. नंतर दहा वर्षांनी प्रवासासाठी रजा, पन्नासाव्या वर्षी फोटोग्राफी शिकण्यासाठी सहा महिने रजा. कल्पना चांगल्या पद्धतीत मांडलेल्या असतात. मग आर्थिक नियोजन सोपे होते. प्रत्येक गरजेसाठी त्या वेळेस मुदत संपणारी एसआयपी सुचविली जाते. अल्प मुदतीसाठी तरल (लिक्विड) योजनेत किंवा कर्जरोखे स्वरूपात आणि दीर्घ मुदतीसाठी असल्यास इक्विटी म्युचुअल फंडात गुंतवणूक सुचवली जाते. आवश्यक रक्कम नियोजित वेळेच्या पूर्वीच तरल स्वरूपात फिरवली जाते. गरजेनुसार ही उद्दिष्टे एक -दोन वर्षे मागे किंवा पुढे सरकवण्याचा सल्ला नियोजनकार देतो. आर्थिक नियोजन करता करता नियोजनकार आपल्या ग्राहकाच्या हृदयात शिरतो व आयुष्याचे नियोजन (लाइफ प्लॅनिंग) सुरू होते. आर्थिक बाबीबरोबरच नियोजनकार ग्राहकाचे जीवनही समृद्ध करतो.
जयंत विद्वांस sebiregisteredadvisor@gmail.com
(लेखक ‘सीएफपी’ पात्रताधारक आर्थिक नियोजनकार व सेबीद्वारा नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
sukma ram mandir
छत्तीसगडमधील माओवाद्यांनी बंद केलेले राम मंदिर २१ वर्षांनी खुले
Loksatta vasturang On the occasion of Gudi Padwa home purchase investment
गुढीपाडवा आणि गृहखरेदी
Botswana threatening Germany to send elephants
२० हजार हत्तींचं जर्मन कनेक्शन काय? जाणून घ्या