शहरीकरण आणि संकुचित सांस्कृतिकता अशा अजब मिश्रणाचा कोलाहल सध्या देशभर जाणवतो आहे. त्याचीच आठवण करून देणारी ही कादंबरी.. वास्तवाची कल्पित गुंफण करत ती संस्कृतिरक्षणाच्या तऱ्हेवर टोकदार भाष्य करते..

‘संस्कृतिकरणाने आपल्याला एकमेकांप्रति स्नेहशील राहण्यास शिकवले का? प्राण्यांपेक्षा माणूस आपापल्या कंपूत अधिक स्नेहशील असतो. मात्र स्वत:च्या कंपूबाहेरील माणसांप्रति आपला दृष्टिकोन जनावरांसारखाच हिंस्र असतो. नीतिवेत्ते व धार्मिक प्रवचनकार यांनी कितीही प्रबोधन केले तरी परक्या समूहातील माणसांविषयीच्या आपल्या भावना हिंस्रच असतात. जनावरालासुद्धा लाजवील असं माणूस वागू शकतो. कदाचित भविष्यामध्ये आपला सर्व मानवांप्रति जरा अधिक दयाळू, उदार दृष्टिकोन निर्माण होईल अशी आशा करू या. अर्थात, तशी खात्री देता येत नाही. असे काही तरी घडेल अशी लक्षणं अजून तरी दिसत नाहीत.’

mumbai traffic congestion
मुंबईतील ‘वाहतूक कोंडी’ची सर्वव्यापी गोष्ट!
Fossils of massive prehistoric snake found in Gujarat
हिंदू पुराणातील ‘वासुकी’ तो हाच का? गुजरातमध्ये सापडले जगातील सर्वात मोठ्या सापाचे जीवाश्म; का आहे हे संशोधन महत्त्वाचे?
Buddhism, Renovation of Buddhist Stupa at Karnataka
२५०० वर्ष जुन्या मौर्यकालीन बौद्ध स्तूपाचे पुनरुज्जीवन; का महत्त्वाचे आहे हे स्थळ?
Loksatta Lokrang A Journey into Documentary Creation movies dramatist
 आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘मला खूप भूक लागली होती…’

– बटरड्र रसेल

(‘अनपॉप्युलर एसेज्’, मराठी अनुवाद-‘ नाही लोकप्रिय तरी उदारमतवादाची कास धरी’).

भारतातले एक महत्त्वाचे डिजिटल किंवा ‘स्मार्ट’ झालेले महानगर. त्यात विविध प्रभाग (सेक्टर्स) निर्माण झाले आहेत. हे प्रभाग चहूबाजूंनी उंच िभती उभारून बंदिस्त करून टाकले आहेत. प्रवेशद्वारांजवळ सुरक्षारक्षकांचा चोख बंदोबस्त आहे. हे नुसते आपले इंटरकॉमवरून ऐकणारे सुरक्षारक्षक नाहीत. लेखक त्यांना ‘रिपीटर्स’ म्हणतो. (शब्दकोशातील जवळ जाणारा एक अर्थ : पुनरुज्जीवित करणारा) मराठीत नीटच बोलायचं तर, आपण त्यांना म्हणू या – ‘राष्ट्रीय स्वयंघोषित संस्कृतिरक्षक’. तर असे हे संकुचित झालेले प्रभाग, भारतात आढळणाऱ्या प्रत्येक जातीपातीचे नि धर्माचे आहेत. त्यांची एक यादीच लेखकाने दिली आहे. त्यातही परत श्रीमंत, उच्च-कनिष्ठ मध्यमवर्गीय असं वर्गीकरण आहेच. गरीब-मजूरवर्ग अर्थात प्रभागाबाहेर आहे. त्यांचं झोपडपट्टीतलं जीवनमान तसंच आहे. हे कल्पित आहे की वास्तव? तर  ही आहे कादंबरी प्रकारातली वास्तवाची कल्पितात केलेली गुंफण. या संकुचित विभागणीचं श्रेय आपल्या पूर्वजांचं आहे. त्यांच्या डोक्यातून कंपूची संकल्पना निर्माण झाली. दु:ख त्याचं नाही, तर आधुनिक माणसाने अशी जुनाट परंपरा अजूनही कायम राखली याचं आहे. म्हणून रसेलचं वरील उद्धृत विचारात पाडतं. महान भारत देशात तर त्याची धग अजूनही पोळून काढतीये. घटनाकारांनी कायद्याद्वारे हे संकुचितपण ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लोकांच्या मनात ते अजूनच फिट्ट बसले. मतपेटय़ांतून राजकीय खतपाणी घातल्यावर अजूनच जोमाने वाढायला लागले. हे वास्तव आहे. जे कादंबरीत परावíतत होताना पुढच्या पातळीवर गेलंय. आता ती संकल्पना ‘प्युरिटी ऑल’- पावित्र्य सर्वासाठी – अशा घोषणेद्वारे अजून पुढे नेली आहे. लेखक याला अत्यंत निकटचे भविष्य मानतो.

तर अशा टोकाच्या कल्पितात शालिनी व तिचं कुटुंब ओढलं जातं. शालिनी ही या कादंबरीची प्रोटागॉनिस्ट. सर्व कथा तिच्याच परिप्रेक्ष्यातून सांगितली जाते. तीच पूर्णवेळ कथांतर्गत निवेदक आहे. कादंबरी अकरा प्रकरणांतून सादर केली जाते. सुरुवात होते, ‘द वॉल’ या प्रकरणाने. पहिल्याच तीन ओळींत तिच्या नवऱ्याशी म्हणजेच रिझशी झालेल्या संभाषणातून शालिनीची मुलगी लला हरवल्याचं कळतं. मग ‘प्युरिटी वन’ नावाच्या प्रभागाचं व त्याच्यामुळे उभारलेल्या िभतीचं वर्णन येतं. कबुतरांनी व्यापलेली ती एक अगम्य जागा आहे. आता महानगराचं सत्ताकेंद्र असल्यावर असणारच ना! या सर्व प्रभागांवर देखरेखीला एक कौन्सिल नेमली आहे. या प्रभागातल्या एका इमारतीवर झेंडा डौलाने फडकतोय. काळ्या पिरॅमिडचं चिन्ह त्यावर आहे. जे कौन्सिलच्या हुकूमशाहीचं प्रतीक आहे. त्या इमारतीतल्या एका छोटय़ा खोलीत ‘प्युरिटी वन’ची पहिली वीट स्थापली आहे. तिच्या दर्शनाला असंख्य श्रद्धाळूंची झुंबड उडालीये. हा प्रभागच त्यातल्या त्यात स्वच्छ आहे. बाकी सगळीकडे कचऱ्याचे नुसते ढिगारे पसरलेत. त्यातून सुटलेल्या घाणीने पोटात मळमळतं. त्याच घाणीत प्रभागाबाहेरचे झोपडपट्टीवासी विक्रीलायक गोष्टी शोधत फिरत असतात. त्या प्युरिटी वन प्रभागात शालिनी ललाच्या वाढदिवसानिमित्त मेणबत्ती लावायला गेलीये. एकोणिसाव्या वाढदिवशी शालिनीला ललाची आठवण मृगजळासारखी भासते. कारण वयाच्या तिसऱ्या वर्षीच ललाला जबरदस्तीने उचलून नेलंय. त्यामुळे ज्या काही छोटय़ा-मोठय़ा आठवणी आहेत त्या तिच्या मनात घर करून आहेत. प्रकरणाशेवटी रिझचीही सोबत कायमची संपल्याचं कळतं. तोही आठवणीतून तिच्याशी गप्पा मारत आहे.

पुढच्या ‘टॉवर्स’ नावाच्या प्रकरणात वर्तमान आणि भूतकाळाचं मिश्रण करून शालिनी स्वत:विषयी माहिती सांगते. त्रेचाळीस वर्षांची विधवा सध्याला एका खुराडय़ासारख्या रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्समध्ये राहतीये ज्याला टॉवर्स असं नाव आहे. कौन्सिलनं इथं तिच्यासारख्या अनेक जणींची सोय केली आहे. कौन्सिलच्या मते, ‘अशा’ नियम तोडणाऱ्या स्त्रियांना शहराबाहेरच ठेवलं पाहिजे. कौन्सिलचा एक प्युरिटी कॅम्प (गोमूत्र िशपून पावित्र्य लादणारी वसाहत?) आहे. शालिनी तिथे चार महिने राहून आल्याचंही कळतं.

संस्कृतिरक्षकांची दहशत कशी आहे, हे लेखकानं अनेक उदाहरणांसह स्पष्ट केलंय. त्यातलं एक इथं येतं – रूप या लहान मुलाचं. रूपची आई वेगळ्या प्रभागातली आहे. तरी ती आपल्या इथं राहते या क्षुल्लक कारणावरनं त्यांचे शेजारी संतापतात. नंतर वादावादीचं रूपांतर संस्कृतिरक्षकांना बोलावण्यापर्यंत जातं. रूप पळून जातो. पुढे त्याच्या आई-वडिलांचं काय झालं, हे गुलदस्त्यात असलं तरी आपल्याला ते चांगलंच समजतं. हा रूप शालिनीला भेटतो, पण त्याला ती वाचवू शकत नाही. त्यामुळे ललाच्या आठवणीने ती जखम अजूनच बोचू लागते.

तिसरं प्रकरण आहे – ‘मा अ‍ॅण्ड पापा’. यात तिचा आणि एकूणच या प्रभाग व्यवस्थेचा भूतकाळ पूर्णपणे उलगडतो. शालिनी रिझचं कॉलेजवयीन परस्पराकर्षण, लपून घेतलेल्या पाप्या, चोरून केलेला सेक्स, दोघांचे वेगवेगळे प्रभाग, शालिनी अरोरा पॅव्हेलियनची तर रिझचं मुसलमान असणं, रिझचा धाकटा भाऊ नाझ ज्याचा त्यांच्या प्रेमाला पािठबा असणं, शालिनीला भेटण्यासाठी संस्कृतिरक्षकांना खोटी ओळखपत्रं काढून चकवणं, तर कधी पसे चारून जाणं.. असं सगळं वगरे वगरे येतं.

चौथ्या – ‘सेंटर ऑफ हिज पाम’ या प्रकरणात वडिलांना संस्कृतिरक्षकांनी मारणं, मग त्यांचा मृत्यू, शालिनी-रिझचं एकमेकांवर वाढत गेलेलं प्रेम, मग झालेला निकाह, पहिली रात्र वडिलोपार्जति घरीच घालवण्याची प्रथा मोडून पंचतारांकित हॉटेलच्या खोलीत घालवण्याची आधुनिक प्रथा पाळणं, ज्यामुळे रिझच्या घरून संताप व्यक्त होणं, शालिनीचा हिजाब वापरायला नकार, शेवटी त्यांच्या प्रभागात न राहता ‘ईस्ट एण्ड’ या मुक्त विचारांच्या लोकांच्या प्रभागात राहायला जाणं (रिझ मुस्लीम असला तरी मुक्त विचारांचा आहे, हे ठसतं.) असं सगळं घडून कादंबरीचा प्रवास नव्या टप्प्यावर येऊन ठेपतो.

पाचवं प्रकरण ‘वॉटर’ या शीर्षकाचं. यातून भविष्यात होणारी एक महत्त्वाची समस्या लेखक समोर आणतो. ती म्हणजे, पाण्याचा दुष्काळ व त्यातून होणारा सामाजिक गोंधळ. आता सपना नावाची आया ललाच्या देखभालीला ठेवली आहे. ती आहे स्लमर (झोपडपट्टी भागातली). तिचा भावी नवरा आशीष, कौन्सिलचे प्रधानसेवक जोशीजींसाठी काम करतो. या प्रकरणातला शालिनी व नाझमधला एक संवाद महत्त्वपूर्ण ठरतो. कारण त्यात नाझ फंडामेन्टलिस्ट होऊन प्रभागांचं समर्थन कसा करायला लागलाय हे दाखवलं जातं. तो ईस्ट एण्डच्या मोकळ्या संस्कृतीविरोधात आहे. त्या सपनाला बॉयफ्रेंड कसा असू शकतो? लला संध्याकाळपर्यंत बाहेर खेळू कशी शकते? शालिनी दुपारी तीन वाजता बीअर कशी ऑफर करू शकते? हे प्रश्न, त्यांची उत्तरं त्याच्या डोक्याबाहेरची आहेत. ते दोघं जेव्हा ललाला आणायला बागेत जातात तेव्हा संस्कृतिरक्षकांचा उन्माद परत बघायला मिळतो. आता तर त्यांना ‘गणवेश’ही मिळालाय. ‘युनिटी फ्रॉम प्युरिटी’ (अर्थात, पवित्रतेतून एकात्मतेकडे) ही घोषणाही जोडीला आहे. हे शालिनीच्या डोक्याबाहेरचं आहे आणि नाझला त्यातून आनंद मिळतोय. त्यानंतर कौन्सिल रॅलीची घटना घडते. पाणी नीट मिळत नसल्याने वैतागून झोपडपट्टीवासीयांचा मोर्चा निघाला आहे. तेव्हाचं शहरातलं ट्रॅफिक, काही जणांचं मानसिक संतुलन बिघडल्याने वेडय़ासारखं वागणं.. थोडक्यात, अस्वस्थता पसरलेली दिसते.

त्या मोर्चाची सांगता एका जाहीर कार्यक्रमात होते, जिथे जोशीजींचं टिपिकल भाषण होतं. ‘मित्रों मित्रों’ करून पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं, सर्व महानगर पवित्र करण्याचं, चांगले दिवस आणण्याचं अशी ढीगभर आश्वासनं दिली जातात. उपस्थित संस्कृतिरक्षक व सर्व धर्मप्रमुखांकडून समान रीतीनं टाळ्यांचा कडकडाट होतो. (इथं एक लक्षात घेतलं पाहिजे, की मुस्लिमांचे प्रतिनिधी इमाम वगरे लोकांचाही जोशीजींना पािठबा आहे. कारण शेवटी आपापले सुभे राखायचे असतील तर विविध धर्माना आतून इतरांशी हातमिळवणी करायला लागते.) या प्रकरणाशेवटी ललाचं अपहरण होतं. निमित्त ठरतं, शालिनी-रिझनं दिलेली टिपिकल उच्चभ्रू पार्टी. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याचा प्रश्न गंभीर असताना रिझ पसे चारून आपल्या खासगी स्वििमग पूलमध्ये पाणी भरतो. हे कारण पुढे करून संस्कृतिरक्षक घुसतात. लाठय़ाकाठय़ांनी हाणामारीला सुरुवात करतात. शालिनी व इतर काही स्त्रियांना ट्रकमध्ये घातलं जातं. रिझला मारून टाकल्याचं (नंतर) कळतं. हे प्रकरण संपतं तेव्हा कादंबरी बरोबर अध्र्यात आली आहे.

पुढचं प्रकरण आहे – ‘प्युरिटी कॅम्प’. याचा प्रमुख आहे- डॉ. अय्यर नावाचा थंड डोक्याचा राक्षस नाही तर माणूसच. कारण सध्याची शिक्षण नावाची प्रक्रिया अशी आहे, की तुम्ही जेवढय़ा जास्त तथाकथित पदव्या मिळवाल तेवढं असंवेदनशील होत जाण्याचं प्रमाण जास्त. थंड डोक्यानं गुन्हे करणं सोप्पं. डॉ. अय्यरच्या मते, या कॅम्पमधून ते व्यवस्था चालू ठेवू इच्छिणारी माणसं निर्माण करतात. त्यासाठी निळ्या-पांढऱ्या कॅप्सूलचा व्यवस्थित डोस इथं आणलेल्यांना दिला जातो. शालिनी त्याला ललाबद्दल विचारते, तेव्हा तिची देखभाल आता कौन्सिल करेल, असं तो म्हणतो. मग इतर जणींच्या दुर्दैवी कथा सांगितल्या जातात. एकीनं आपल्या मत्रिणीशी (समलिंगी विवाहाला भविष्यात मान्यता) लग्न केलं म्हणून तिला इकडे आणलं गेलं; एकीला तिच्याच गावातला, एकाच गोत्रातला मुलगा आवडत होता, पण प्रभागाची संमती नव्हती म्हणून तिची रवानगी इथं झाली; एकीनं खतना या जुलमी प्रथेविरुद्ध मोहीम उघडल्याने तिला संस्कृतिरक्षकांच्या तावडीत दिलं गेलं.. अशी काही उदाहरणं.

पुढच्या पोलर नाइट प्रकरणात शालिनी स्वत:ला टॉवरमधून कसं सोडवते ते येतं. प्युरिटी कॅम्पमधून तिला टॉवरमध्ये हलवलं गेलंय. तिथून बाहेर पडण्यासाठी तिला कौन्सिलच्या न्यायपीठाला सामोरं जावं लागतं. न्यायपीठ तिला निवाडा सुनावण्यासाठी रात्री बोलावते. तिथला प्रमुख मग तिच्यावर बलात्कार करतो. (मोर सकाळी कितीही ब्रह्मचारी वाटला तरी रात्री तो काय करतो, हे आपल्याला माहीत नाही बाबा. त्याचप्रमाणे संस्कृतिरक्षकांनाही रात्री लैंगिक वासना अनावर होत असाव्यात.) ललासाठी शालिनी हेही सहन करते.

‘फॉरबिडन फ्रूट’ प्रकरणात काही खुलासे होतात. तिला कौन्सिलच्या एका महत्त्वाच्या खात्यात छोटी नोकरी दिली जाते. दीपनीता ही तिची जुनी मत्रीण भेटते. तिच्याशी बोलताना नाझचा उल्लेख येतो. पार्टीच्या वेळी संस्कृतिरक्षकांना बोलावण्याचं कृत्य नाझचंच, हे शालिनीचं ठाम मत ती बोलून दाखवते. नाझ आता त्यांच्या प्रभागाचं बडं नेतृत्व; शिवाय कौन्सिलमध्येही मोठय़ा पदावर असल्याचं कळतं. त्यानं वडिलोपार्जति संपत्तीतनं रिझला बेदखल केलंच, वर परत त्याचा ईस्ट एण्डमधला फ्लॅटही बळकावलाय.

पुढचं प्रकरण ‘सेटलमेंट’. या प्रकरणात अजून एका समस्येकडे लक्ष वेधलं जातं. ती म्हणजे कचऱ्याची. शहरामध्ये प्रमाणाबाहेर कचरा साठतोय. डोंगरच तयार झालेत त्याचे. पूर्वेकडील हारनगरच्या डोंगरावर सात आठवडय़ांपासून लागलेली आग विझली नाहीये. तिकडे शालिनी ‘मिनिस्ट्री ऑफ सेटलमेंट’ या ऑफिसात शिरून तिच्याकडे काम करणाऱ्या सपनाचा पत्ता शोधून काढते. तिथल्या संगणकामध्ये शहरातल्या सर्व जनतेचा डाटा जमा आहे. तिला सपना नावाच्या दोन नोंदी योग्य वाटतात. त्या दोघींच्या मुलींचं वय एकोणीस नोंदलेलं असतं जे ललाशी मिळत असतं.

‘सपना’ या पुढील प्रकरणात ती पहिल्या सपनाकडे जाते. तो पत्ता आहे महाननगर या झोपडपट्टीतला. तिथे लला नाहीये. सपनाही कोणी तरी वेगळीच आहे. मग ‘िथग्ज दॅट पुल अस टुगेदर’ या शेवटच्या प्रकरणात ती दुसरी सपना बरोबर सापडते. ती कौन्सिल ऑफिसर्स कॉलनीत राहतीये. कारण तिचा नवरा आशीष आता जोशीजींचा उजवा हातच झालाय. या सपनाच्या मुलीचं नाव लक्ष्मी आहे. तिला सपना शालिनीच्या समोर येऊच देत नाही. कारण आता परिस्थिती पूर्णत: बदलली आहे. आधी शालिनी वरच्या वर्गात होती नि सपना स्लमर होती. आता शालिनीकडे काहीच नाही नि सपना वरची पायरी चढलीये. शेवटी संस्कृतिरक्षक बोलावले जातात. ते शालिनीला घेऊन जातात. लक्ष्मीचा चेहरा दूरवरच्या खिडकीत दिसत राहतो. इथं कादंबरी संपते.

कादंबरी पूर्णपणे शालिनीच्या परिप्रेक्ष्यातून लिहिल्याने बाकीच्यांचे दृष्टिकोन जेवढय़ास तेवढे राहतात. त्यामुळे या प्रभाग संकल्पनेच्या गुंत्यात खोलवर ती जात नाही. तसेच शालिनी सोडून इतर कुठलेच पात्र म्हणावे तसे उभे राहत नाही. मात्र भविष्यातलं टोकदार सामाजिक वास्तव उत्तम प्रकारे मनाला भिडतं. पाणी व कचऱ्याचा प्रश्न भविष्यकाळात कसं तीव्र स्वरूप धारण करेल, हे लेखकाने मांडलं आहे. कादंबरीतली पात्रं मात्र त्यातून तशी सुरक्षितच राहतात. ललाचा शोध हे पहिल्या काही पानांतलं सूत्र जाऊन शेवटी एका आईच्या अस्तित्वाची लढाई हे मुख्य सूत्र होऊन बसतं.

इंग्रजीचा तिरस्कार आणि मातृभाषेचा जाज्वल्य अभिमान बाजूला ठेवून भारतीय लेखकाने मातृभाषेतच लिहावं, असं सांगावंसं वाटतं. म्हणजे मग त्यात सर्व समाजघटकांना त्यांच्या त्यांच्या अस्मितेसह सामावून घेता येतं. कारण झोपडपट्टीवासी सपना फाडफाड इंग्रजीत बोलताना केविलवाणी वाटते आणि इंग्रजी संभाषणात वाक्याच्या शेवटी ‘ना’ येणं हे टिपिकल भारतीय आहे. असो. पुस्तकाचं मुखपृष्ठचित्र कथानकावर भाष्य करणारं आहे. भविष्यातील महानगरीय प्रश्नांचं सूचन करणारी ही कादंबरी त्यामुळेच आवर्जून वाचायला हवी. शेवट परत रसेलच्याच अनुवादित वाक्यानेच करू- ‘फक्त माणुसकीला जपा, बाकी सगळे विसरा.’

 

  • ‘लैला’
  • लेखक : प्रयाग अकबर
  • प्रकाशक : सिमॉन अ‍ॅण्ड शुस्टर इंडिया
  • पृष्ठे : २२४, किंमत : ५९९ रुपये

 

– हृषीकेश पाळंदे

hrishpalande@gmail.com