इंग्रजी भाषेचा काहीतरी कायमस्वरूपी बंदोबस्त केला नाही तर जनता तुम्हाला सुखाने जगू देणार नाही, असे मी राज्यव्यवस्थेला मनातल्या मनात ठणकावले. माझ्या एका मराठी मित्राशी मी इंग्रजीत वाद घालत होतो. एका मुद्दय़ावर मला त्याची चामडीच लोळवायची होती. पण ऐनवेळेला  been की being हे ठरवण्यात माझा वेळ गेला आणि तो बाजी मारून गेला. मी जगातल्या अनेक देशांमध्ये फिरलो आहे. इंग्रजी ज्यांची मातृभाषा आहे, त्याही देशांमध्ये अनेकदा गेलो आहे. पण आपल्या मराठी लोकांशी इंग्रजीत बोलायला जितकी भीती वाटते, तितकी एखाद्या ब्रिटिश माणसाशी बोलतानाही वाटत नाही. मग आपल्याच मातृभाषेत बोलणाऱ्या मराठी लोकांशी इंग्रजीत बोलताना भीती का वाटत असावी? मुळात आपल्याला मराठी माणसाशी इंग्रजीत बोलावेसे का वाटावे, हाच एक कळीचा मुद्दा आहे. मराठी माणसाशी जर तुम्ही इंग्रजीत बोललात तरच तो तुम्हाला महत्त्वाचा समजतो, हे माझ्या लक्षात आले आहे.

मी एकदा एका आदिवासी पाडय़ावर गेलो होतो. तिथे एका छोटय़ाशा घरात गेलो. घराचा मालक कंबरेला टॉवेल गुंडाळलेला आणि वरती संपूर्ण उघडा. आम्हाला त्याने घरात चटईवर बसवले आणि तो आत चहा आणायला गेला. मधल्या काळात मी त्याच्या भिंतीवर पाहिले तर चक्क त्याने त्याचा पासपोर्ट भिंतीवर फ्रेम करून लावला होता. मला फ्रेम करून लावलेला पासपोर्ट पाहून मजा वाटली. त्यात या आदिवासी माणसाने मुळात पासपोर्ट का काढला असेल याचेच आश्चर्य वाटले. त्याने मला चहा दिला आणि भिंतीवरून काढून त्याचा पासपोर्ट माझ्या हातात दिला. त्याच्या पासपोर्टवर चार-पाच देशांचे शिक्के होते. पासपोर्टवर चार-पाच देशांचे शिक्के आले की आपल्याकडे लोक रस्त्यावरून गुडघ्यापर्यंत पॅन्ट घालून फिरायला लागतात. त्यानेही गुडघ्यापर्यंतच टॉवेल गुंडाळला होता, या योगायोगाचे मला हसू आले. रस्त्यावरून हाफ पॅन्ट घालून फिरणाऱ्यांसारखे आर्थिक भाग्य या टॉवेल गुंडाळून फिरणाऱ्याच्या वाटय़ालाही येईल अशी मला आशा आहे. तर ते असो. ‘कुठे कुठे गेला होतास?’ मी त्याला विचारले. त्याने मला चार-पाच गावांची नावे सांगितली. कोणत्या तरी सरकारी खात्याने आदिवासी कलाकारांची कला जगभर पोहोचावी म्हणून एक उपक्रम योजला होता. त्याअंतर्गत हा टॉवेलवालापण गेला होता. ‘इंग्लंडच्या राणीनेही माझ्याकडून खरेदी केली..’ असे त्याने मोठय़ा अभिमानाने सांगितले आणि फोटोही दाखवला. त्या फोटोत तो आणि राणी चर्चा करताना दिसत होते. ‘तुला इंग्रजी येते का?’ असे मी त्याला विचारले. तर तो ‘नाय बा..’ असे उत्तरला. ‘मग तू काय बोललास?’ विचारल्यावर म्हणाला, ‘साहेबांनी मला सांगितले होते, कोणी ‘हाऊ मच?’ विचारले की ‘फाइव्ह पाऊंड’ सांगायचे. खूप लोक आले. मी त्यांना माझ्या वस्तूंची किंमत सांगितली. त्यांनी मला पैसे दिले.’ वस्तू दाखवायची आणि ‘फाइव्ह पाऊंड’ अशी किंमत सांगायची. त्याला किंमत पटली तर तो घेतो किंवा तीन पाऊंडाला मागतो. याच्या पलीकडे व्यवहार काय असतो? राणीला ‘हर मॅजेस्टी’ म्हणू की ‘ऑनरेबल हेड ऑफ कॉमनवेल्थ’ म्हणू, या गोंधळात जर तो टॉवेलवाला पडला असता तर ‘फाइव्ह पाऊंड’ सांगायचेच राहिले असते. व्यवहार महत्त्वाचा! भाषा त्यानंतर येते. हे आपल्या लोकांना कधी कळणार?

Relief for flood affected Chirner due to works started before monsoon
पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या कामांमुळे पूरग्रस्त चिरनेरला दिलासा?
Dried pods of opium, Dhule, opium Dhule,
धुळे : लसूण भरलेल्या मालमोटारीत हे काय… पोलीसही चकित
A dumper full of cargo broke into two pieces in an accident nashik
जळगाव: वाळूने भरलेल्या डंपरचे अपघातात दोन तुकडे
navi mumbai buses marathi news, navi mumbai bus poor condition marathi news
डिझेल बसगाड्यांची दुरवस्था, एनएमएमटीच्या डिझेलवरील बसगाड्यांची तात्पुरती डागडुजी करण्यावर भर

जगाचा नकाशा समोर आणला तर लक्षात येते, इतका मोठा रशिया.. त्यांना इंग्रजी येत नाही. इतका मोठा चीन.. त्यांनाही येत नाही. इटली, फ्रान्स, जपान, जर्मनी, कोरिया, अरब देश.. सगळेच आपल्यापेक्षा दुबळी इंग्रजी बोलतात. किंवा काही लोकांना तर अजिबात बोलता येत नाही. पण त्यांच्या आत्मविश्वासात त्याने काहीही फरक पडत नाही. ते जगभर आपल्या वस्तू/ सेवा आत्मविश्वासाने विकत असतात. इंग्रजी येत नाही म्हणून त्यांच्या विकासात कुठेही अडथळा येत नाही. मग आपलेच गबरू इंग्रजी येत नाही म्हणून खांदे पाडून का फिरत असतील?

भारतात जे कॉर्पोरेट इंग्रजी बोलले जाते त्या इंग्रजीचा आणि इंग्रजांच्या इंग्रजीचा काही संबंध असेल असे मला वाटत नाही. किंबहुना, माझा असा दृढ विश्वास आहे की कॉर्पोरेटमध्ये इंग्रजी आत्मविश्वासावर बोलली जाते; व्याकरणावर नाही. जातीमुळे, आई-बापाच्या सामाजिक प्रतिष्ठेमुळे किंवा अजिबात भीडभाड नसल्याने काही जणांना मुळातच जास्त आत्मविश्वास असतो आणि मग ते बिनधास्त व्याकरणबिकरण गुंडाळून ठेवून धश्चोटपणे इंग्रजी बोलत राहतात. अक्कल असो- नसो; त्यांच्या इंग्रजी बोलण्याच्या आत्मविश्वासामुळे उगाचच इतरांना ते कोणीतरी महत्त्वाचे आहेत असे वाटते आणि त्यांना नवनव्या संधीही मिळत राहतात.

इंग्रजीच्या अवास्तव प्रतिष्ठेचा व्हायरस आपल्या सगळ्याच व्यवस्थेमध्ये शिरलाय. अनेक विद्वान आणि ज्ञानी लोक इंग्रजी बोलता येत नाही म्हणून आत्मविश्वास गमावून कोशात जाऊन बसलेत. आणि अनेक फुटकळ लोक फक्त इंग्रजी बोलता येते म्हणून ज्ञानी समजले जाताहेत. इतक्या दुर्दैवी स्थितीत आपण येऊन पोहोचलो आहोत. मी वर उल्लेख केलेल्या कोणत्याही देशाच्या प्रगतीशी इंग्रजीचा कोणताही संबंध नाही हे वारंवार सिद्ध झाले आहे. पण आपल्या खुरडत खुरडत चाललेल्या प्रगतीशी इंग्रजीचा थेट अनतिक संबंध आहे. इंग्रजी येणाऱ्या फुटकळ फुलबाज्या फटाके म्हणून मिरवताहेत आणि दारुगोळ्याने ठासून भरलेले फटाके संकोचाने आपलीच वात कुरतडत बसलेत. ‘कुष्ठरोग आनुवंशिक नाही’, ‘पाणी गाळा, नारू टाळा’ याचे जसे लोकांना अक्कल यावी म्हणून राष्ट्रीय अभियान राबवले गेले, तशी इंग्रजी भाषा महत्त्वाची नाही, गुणवत्तावान असणे व कौशल्यपूर्ण असणे, ज्ञानी असणे महत्त्वाचे आहे, हे लोकांना पटवून देण्यासाठी राष्ट्रीय अभियान राबवले गेले पाहिजे आणि हा गैरसमज समूळ नष्ट केला पाहिजे.

एका रशियन कंपनीबरोबर आम्ही काम करतोय. त्या कंपनीच्या अधिकाऱ्याला जेव्हा मी भेटलो आणि ओळख झाली तेव्हा माझ्या लक्षात आले की, याला तर अजिबात इंग्रजी येत नाही. याच्याबरोबर कसे काम करायचे, याची काळजीच वाटत होती. पण नंतर लक्षात आले, की साधारण कळू शकेल अशा इंग्रजीमध्ये तर हा व्हॉट्सअ‍ॅपवर आपल्याशी संवाद साधतोय. कसे साधले असेल त्याला हे? हे जेव्हा त्याला विचारले तेव्हा कळले, की तो गुगलचे अनुवाद करणारे अ‍ॅप्लिकेशन वापरतो. आधी मी त्याला जो मेसेज पाठवलाय त्याचा तो त्याच्या भाषेत अनुवाद करून घेतो. नंतर त्याच्या भाषेत उत्तर लिहितो आणि त्याचा इंग्रजीत अनुवाद करून मला पाठवतो. हे सगळे अगदी थोडय़ा वेळात होते आणि एक संवाद पूर्ण होतो. स्वत:च्या मातृभाषेव्यतिरिक्त एकही नवी भाषा न शिकता जगातल्या सगळ्या भाषांमधल्या लोकांशी संवाद करणे, व्यवहार करणे हे आता सहज शक्य आहे. इंग्रजी जाणणाऱ्या तर सोडाच; पण चिनी, रशियन, कोरियन, जपानी- कोणाशीही आपण आता संवाद साधू शकतो आणि तेही आपल्या स्वत:च्या भाषेत. चिनी लोकांनी तर मातृभाषेतून जगातल्या सर्व महत्त्वाच्या भाषांमध्ये संवाद साधता येईल असे मोबाइलचे अ‍ॅप्लिकेशनच बनवले आहे- जे त्यांच्याकडचे सर्वाधिक लोकप्रिय अ‍ॅप्लिकेशन आहे. जगभरातले शेतकरी आपापली कृषी-उत्पादने जिथे चांगली किंमत मिळेल त्या कोणत्याही भाषिक देशांत नेऊन विकताहेत. कलाकार विविधभाषिकांशी संवाद साधून आपली कला सर्वत्र पोहोचवताहेत. अगदी आपल्या ‘दंगल’ चित्रपटाने चिनी भाषेत भाषांतर करून चीनमध्ये हजारहून अधिक कोटींचा व्यवसाय केलाय. कोणत्याही देशातल्या भाषेत तांत्रिक वा वैद्यकीय संशोधन करून संशोधक कोणत्याही देशांत ते किचकट ज्ञान त्यांच्या भाषेत नेऊन विकताहेत. इंग्रजीच कशाला, कोणत्याच भाषेची बंधने परस्पर- संवादावर राहिलेली नाहीत. आपल्याला जर हे वेळीच समजले नाही तर आपले लोक इंग्रजी शिकून जागतिक प्रतिष्ठा मिळू शकेल, या भ्रमात राहून ‘अ‍ॅक्टिव्ह व्हॉइस-पॅसिव्ह व्हॉइस’ची घोकंपट्टी जेव्हा करत असतील, तेव्हा जगातले इतर लोक एकमेकांशी संवाद साधून- तोही स्वत:च्या भाषेत- आपल्या कोसो योजने पुढे निघून गेलेले असतील.

इंग्रजी हे ‘वाघिणीचे दूध’ आहे असे म्हणतात. आपल्यासाठी ते दूध नासले आहे. हे नासलेले दूधच सकस आहे आणि ते प्यायलेच पाहिजे, ही सक्ती केल्यामुळे आपले कितीतरी गुणवान बछडे डरकाळी फोडायची सोडून उगा लाचार ‘क्याव क्याव’ करायला शिकलेत. जंगलात पुन्हा डरकाळी ऐकायची असेल तर या दुधाचा रतीब बदलावा लागेल.

मंदार भारदे mandarbharde@gmail.com