ओमला रात्रभर झोपच लागत नव्हती. एकसारखा कुशीवर वळत होता. एवढय़ात त्याला स्वयंपाकघरातून कसलीतरी खुडबुड झाल्याचा आवाज आला. पहाट अजून व्हायची होती. ‘आई उठली की काय?’ असा विचार करत तो स्वयंपाकघरात गेला. मात्र समोरचं दृश्य पाहून त्याची दातखीळच बसली.

‘‘बाप्पा, तुम्ही तुमचं आसन सोडून इथे काय करताय?’’ तो कसाबसा सावरत, कापऱ्या आवाजात जवळजवळ ओरडलाच. समोर चक्क गणपतीबाप्पा अवतरले होते. गणेश चतुर्थीला ओमच्या घरी मोठय़ा उत्साहात त्यांची प्राणप्रतिष्ठा झाली होती. स्वयंपाकघरात येतानाच ओमच्या लक्षात आलं होतं की हॉलमध्ये बाप्पांची मूर्ती ठेवलेलं आसन रिकामं होतं. ते पाहून तो आधीच चरकला होता आणि आता त्याच्या समोर साक्षात ‘फुल-साइझ’ बाप्पा उभे होते.

shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

‘‘सॉल्लिड भूक लागलीये. ओम, मी खाणं हुडकतोय. काहीतरी खायला दे नं पटकन!’’ लंबोदर अगदी काकुळतीला येत म्हणाले.

‘‘सकाळीच २१ उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला होता की तुम्हाला बाबांनी, तो का नाही खाल्लात मग? तोपर्यंत मला एकसुद्धा मोदक ‘टेस्ट’ करायला मिळाला नव्हता, माहितेय!’’

‘‘तू खाल्लेस की नंतर एकाच वेळी पाच-पाच मोठाले मोदक. आणि मी कधी खात नसतो तुम्ही दाखवलेला नैवेद्य. मला नुसती हूल देऊन तुम्हीच तो फस्त करता नंतर.’’ हे ऐकून ओम त्याचा खालचा ओठ दातांखाली दाबत ओशाळला.

‘‘बरं! बघतो काही मिळतंय का.’’ ओमने शोधाशोध केली. त्याला फ्रिजमध्ये ठेवलेल्या एका वाटीमध्ये दोन मोदक सापडले. त्याने मोदकांवर भरपूर तूप घालून ती वाटी गणपतीला दिली. दोघे डायनिंग टेबलापाशी येऊन बसले.

 

‘‘ओम, तू या वेळी जागा कसा? मी पकडला गेलो नं त्यामुळे.’’

‘‘काल संध्याकाळभर तबल्याची प्रॅक्टिस करत होतो, खूप दमलो. आज गणेशोत्सवानिमित्त प्रोग्रॅम आहे नं आमचा! मी पहिल्यांदाच माझी कला सारद करणार आहे स्टेजवर. त्यामुळे झोप नसेल लागली कदाचित.’’ बाप्पा आता अगदी ताव मारून मोदक खात होते.

घरी आणलेल्या मातीच्या मूर्तीपेक्षा समोर दिसणारं बाप्पांचं वेगळं रूप ओम निरखू लागला. बाप्पांच्या एका हातामध्ये स्मार्टफोन होता आणि एकामध्ये भलेमोठे हेडफोन्स! वरदहस्त सर्वाना आशीर्वाद देण्यासाठी म्हणून उभा होताच, पण सध्या तो मोदक खाण्यात ‘बिझी’ होता. मोदकाची जागा मोबाइल ‘चार्ज’ करायला भरपूर मोठय़ा ‘कपॅसिटी’च्या ‘पॉवर बँक’ने घेतली होती.

‘‘बाप्पा, तुमचे पाश आणि अंकुश कुठे गेले?’’ ओमने आश्चर्याने विचारलं. ओमला ही आयुधं ठाऊक आहेत हे ऐकून बाप्पांना खूप कौतुक वाटलं.

‘‘मी काळानुरूप बदलतोय. डिजिटल होतोय बाबा! देवाला हल्ली कोणीही घाबरत नाही. लोकांमधल्या दुष्टपणाला लगाम द्यायला माझे पाश आणि अंकुश आता पुरेसे पडत नाहीत. पण तरीही या दुष्टप्रवृत्ती मिटवण्यासाठी माझा अखंड प्रयत्न सुरूच असतो. एरवी तुझ्यासारख्या गुणी भक्तांनी माझी मनापासून आठवण काढली की माझ्या मोबाइलवर ताबडतोब ‘मिस्ड कॉल’ येतो आणि मी गरजेप्रमाणे तुमच्या मदतीला धावून येतो.’’

‘‘आणि हेडफोन्स कशासाठी? आम्ही तर तुमची कित्ती प्रकारे करमणूक करत असतो तुमच्या दहा दिवसांच्या मुक्कामांत!’’

‘‘काही छान छान कार्यक्रम मला पाहायला खरंच खूप आवडतात. पण ते स्पीकर्सवरून कर्कश गाण्यांचं बडवणं सुरू झालं की मी मस्त कानांना हेडफोन्स लावून बसतो. मी माझ्या फोनवर भरपूर अ‍ॅप्स ‘डाउनलोड’ केल्या आहेत. मग मला जेव्हा जे हवं असतं ते मी ऐकतो, बघतो. कसला त्रासच नाही.’’

‘‘आणि तुमच्या सुपाएवढय़ा कानांना मोठेच हेडफोन्स हवेत!’’ ओमने बाप्पांची थोडी चेष्टा केली.

‘‘मी पेन ड्राइव्हही आणलाय बरोबर!’’ बाप्पांनी त्यांच्या पितांबराच्या चोरकप्प्यातून पेन ड्राइव्ह काढला.

‘‘तो कशाकरिता?’’

‘‘प्रत्येक माणसाच्या चांगल्या आणि वाईट कृत्यांचा ‘डेटा’ हल्ली मी या फोल्डर्समधे स्टोअर करतो. ‘सर्च’ करायला सोपं जातं.’’

‘‘मग वरदहस्त का ठेवला आहेस तसाच?’’

‘‘तो माझा वाय-फाय आहे. त्यामधून निघणाऱ्या लहरींचा ‘स्पीड’ जाम सुसाट आहे! त्यामुळे एकाच वेळेस मी २४ ७ ७ तुम्हा सगळ्यांशी कनेक्टेड राहू शकतो.’’

‘‘तो कधीच ‘डाउन’ होत नाही? आमचा वाय-फाय तर सदान्कदा बंद पडत असतो.’’

‘‘पृथ्वीवर होतं कधी-कधी जेव्हा इंद्रदेव कोपलेले असतात, पण माझ्या फोनची देवलोकाबरोबर ‘कनेक्ट’ करण्याची ‘ब्लू-टूथ’ यंत्रणा एकदम मस्त आहे. त्यामुळे प्रॉब्लेम लग्गेच ‘सॉल्व्ह’ होतो.’’ बाप्पा मिश्कीलपणे म्हणाले.

‘‘बाप्पा, तुमचं मूषक हे वाहन नेहमी असतं नं तुमच्याबरोबर?’’

‘‘तो माझा ‘टॉर्च’ आहे, अंधारात रस्ता दाखवणारा.’’

‘‘पण तुमच्या मोबाइलमध्ये असेलच नं टॉर्च?’’

‘‘आहे की! पण मूषक कितीतरी युगांपासून माझा साथीदार आहे. त्याला असा कसा सोडू? मात्र या डिजिटल युगात त्यालाही थोडं ‘अपग्रेड’ करायला हवंय.’’

‘‘बाप्पा, मला तुम्ही जसे आत्ता दिसताय, तसेच सगळ्यांना दिसता?’’

‘‘याच रूपांत दिसतो असं नाही. पण जे माझी मनोभावे प्रार्थना करतात त्यांना मी कुठल्या ना कुठल्या रूपांत नक्कीच भेटतो.’’

‘‘मग परवा मला टीचरांनी वर्गाच्या बाहेर उभं केलं तेव्हा तुम्ही का नाही मदत केलीत माझी?’’ ओम कुरकुरला.

‘‘अरेच्च्या! त्या दिवशी तू तुझा होमवर्क पूर्ण केला नव्हतास. माझ्याकडे चुकीला क्षमा नाही, आणि कष्ट हे केलेच पाहिजेत. तुम्हाला सगळं आयतं मिळालं तर त्याचं काय मोल? मी माझ्या भक्तांची नेहमीच परीक्षा घेत असतो. मात्र तुमच्या अडचणीमध्ये मी तुम्हाला भेटत असतो, तुमची मदत करत असतो आणि करत राहणार, हे नक्की. फक्त तुमचा माझ्यावर ठाम विश्वास असायला हवा.’’

‘‘बाप्पा, तुम्ही माझा कार्यक्रम बघायला याल नं उद्या?’’

‘‘शंभर टक्के! शेवटी तुम्ही मला कलेची देवता मानता नं.’’ ओम एकदम खूश झाला.

‘‘ओम, १०-११ दिवसांच्या माझ्या मुक्कामांत मी दरवर्षी इथल्या छान-छान आठवणी माझ्या मनात साठवून घेऊन जातो. पण या वर्षी मी माझ्या मोबाइल कॅमेऱ्याने सगळं टिपून माझ्या पेन ड्राइव्हवर ‘स्टोअर’ करणार आहे. पुढच्या वर्षीपर्यंतची तरतूद..’’ असं म्हणत बाप्पांनी दोघांचा झक्कासपैकी एक ‘सेल्फी’ घेतला.

इतक्यात त्यांना आई खोलीतून बाहेर येण्याची चाहूल लागली. त्यामुळे एकच पळापळ झाली. बाप्पांनी हातामधला उरलेला मोदक पटकन तोंडात टाकला आणि ते लगबगीने त्यांच्या आसनावर पुन्हा स्थानापन्न झाले. ओम डायनिंग टेबलावर डोकं ठेवून, डोळे मिटून गप्प बसून राहिला. त्याला असं अवघडून झोपलेलं पाहून आईला आश्चर्य वाटलं. शेजारी फ्रिजमध्ये ठेवलेल्या मोदकांची वाटी तिला रिकामी झालेली दिसली. ‘‘ओमला रात्री खूपच भूक लागलेली दिसतेय,’’ असं स्वत:शीच पुटपुटत ती वाटी घेऊन स्वयंपाकघरात गेली.

ती आतमध्ये गेल्यावर ओमने डोकं हळूच वर करून इकडेतिकडे पाहिलं. त्याला बाप्पा त्यांच्या मूळ मूर्तिरूपांत मखरांत बसलेले दिसले. समईच्या मंद प्रकाशात ते त्याच्याकडे पाहून गालातल्या गालांत हसताहेत असा ओमला भास झाला..

प्राची मोकाशी mokashiprachi@gmail.com