तुळशीच्या लग्नानंतर लगीन सराई सुरू होते. मे महिन्यात लग्न, मुंजी मोठय़ा प्रमाणावर असतात. या लग्न सराईसाठी हार, फुले, वेण्या, गजरे या सगळ्या गोष्टी मोठय़ा प्रमाणावर लागतात. मोगरा, निशिगंध, गुलाब, सोनचाफा, शेवंती या सगळ्या फुलांप्रमाणेच आपल्या सुंदर रंगामुळे वरील फुलांच्या पंक्तीमध्ये अगदी सहज सामावले जाते ते फूल म्हणजे अबोली.

या फुलाच्या रंगावरूनच अबोली रंग आला असावा. ना पूर्ण भगवा ना गुलाबी ना लाल. परंतु या सगळ्यात वेगळा दिसेल असा हा सुंदर अनेकांच्या आवडीचा रंग. अबोली भारतीय वंशाची एक झुडूपवर्गीय वनस्पती. Crosssendra infundibuliformis (क्रॉसेन्ड्रा इनफंडीबुलीफॉर्मिस ) हे तिचं शास्त्रीय नाव. अबोलीची उंची जास्तीत जास्त एक ते दीड मीटर इतकी असू शकते. कमी पाण्यात वाढणारी आणि रेताड सोडली तर इतर कोणत्याही प्रकारच्या मातीत सहज वाढते. हिला फुले येण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते. अबोलीला वर्षभर फुले येतात.

Tourists got trapped in dangerous waves
पर्यटकांच्या भरगच्च बोटीचे समुद्राच्या मध्यभागी अचानक दोन तुकडे; ‘हा’ Video पाहून भरेल धडकी; पण…
Shekhar Suman Emotional Post
“रात्रभर मी त्याच्या मृतदेहाजवळ…”, ११ वर्षांच्या मुलाच्या निधनाचा तो प्रसंग सांगताना शेखर सुमन भावूक
book review cctvnchya gard chayet by geetesh gajanan shinde
आत्मशोधाच्या पदपथावरील कविता
pune leopard marathi news, shirur leopard marathi news
कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याची मादी कैद

अबोलीचं फूल दिसायला अतिशय साधं, पण सुंदर असतं. साधारण ३ ते ५ असमान पाकळ्या आणि फुलाचा आकार पंख्यासारखा असतो आणि फिकट सफेद रंगाचा लांब दांडा असलेली ही फुले साधारण वर्षभर फुलतात. उन्हाळ्यात याला विशेष बहर येतो. फुले गुच्छात येतात. फुले नाजूक असली तरी पाकळ्या पातळ पापुद्य्रासारख्या असतात त्यामुळे फुलांवर हलकंसं पाणी मारलं की ती पुन्हा ताजीतवानी होतात. त्यामुळेच हार, वेण्या, गजरे यात अबोलीचा विशेष वापर केला जातो. अबोलीची फुले औषधी असून त्याची पेस्ट करून ती त्वचारोगात वापरली जाते तसेच जखम भरून काढण्यासाठी याचा लेप गुणकारी मानला जातो.

अबोलीची पाने हिरव्या रंगाची आकाराने पसरट साधारण ५-१० सेंमी लांबीची असतात. या पानांचा वापर त्वचारोगात केला जातो. फांद्या काळसर तपकिरी रंगाच्या असून या फुले शेंडय़ाला गुच्छात येतात. गुच्छात वरच्या बाजूला कळ्या तर खाली फुले अशी रचना असते. फूल गळून पडले की फळे येतात. फळ छोटय़ा कॅप्सूलसारखे असते आणि त्यात लांबट चपटय़ा सातूच्या आकाराच्या बिया असतात. फळ पक्व झाले की जास्त आर्द्रतेच्या काळात ही कॅप्सूल फुटते आणि फटाक्यासारखा आवाज होतो. त्यामुळेच याला इंग्रजीत Fire Cracker Flower असं मजेशीर नाव आहे. कॅप्सूल फुटली की बी खाली पडते. नवीन रोपांची निर्मिती बी तसेच फांदीपासून देखील करता येते. अबोलीच्या बियांची पावडर पायोरिया (दातातून रक्त येणे) या विकारावर वापरली जाते. याच्या मुळ्या देखील औषधी आहेत.

अबोलीच्या सुंदर रंगामुळे बगीचामधे अबोलीची लागवड करतात. भारतात महाराष्ट्र, गोवा आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये या फुलांचा विशेष वापर केला जातो. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे आणि कोकण पट्टय़ात लगीन सराईच्या काळात अबोली भाव खाऊन जाते. अबोलीची शेती केलेली मी पाहिली नाहीये, पण घराच्या आवारात शाळा, मंदिरे यांच्या परिसरात याची लागवड केलेली दिसते. याला खूप पाणी लागत नसल्याने वर्षभर फुले येत असल्याने आणि कोणत्याही प्रकारचा रोग यावर लवकर येत नसल्याने शेतकऱ्यांनी पडीक जागेत अबोली फूल शेतीचा विचार करायला हरकत नाही. आपल्याकडे अबोली रंगाशिवाय पिवळी, निळी आणि हिरव्या रंगाची अबोलीदेखील आढळते. या सगळ्या रंगांच्या अबोलीची फुले खूप सुंदर दिसतात.

आपण कुंडीमध्ये देखील अबोलीची लागवड करू शकतो. आपलं घर, शाळा परिसर अबोलीच्या फुलांनी सुंदर व्हावा असं वाटत असेल तर बच्चे मंडळी कामाला लागा..

भरत गोडांबे bharatgodambe@gmail.com