एक हिरवंगार झाड होतं. त्याच्या एका फांदीवर एक नाजूक छानशी गोडुली कळी नेहमी आनंदात डोलत असे. सूर्याची कोवळी किरणं तिच्या सोबत खेळायला येत. तिच्या डोक्यावर चंदेरी- सोनेरी चमचमता मुकूट घालत. तिच्या अर्धवट मिटल्या, उमललेल्या पाकळ्यांवर दवबिंदूंचे थेंब हिऱ्यासारखे चमकत. हळूहळू त्या कळीचे मनमोहक, रंगीबेरंगी सुवासिक फुलात रूपांतर झालं. कळी फुलली आणि मखमली पाकळ्यांचं फूल झाडावर दिमाखात डोलू लागलं.
त्या सुंदर फुलावर एक फुलपाखरूयेऊन बसे.फुलाभोवती बागडे. फुलाशी हितगुज करी, गप्पा मारी. त्या फुलाची फुलपाखराशी मैत्री झाली. फुलपाखराला ते फूल आपल्याकडील गोड गोड मध प्यायला देई. एक दिवस छोटासा, इवल्याशा चोचीचा रंगीत पक्षी फुलावर येऊन बसला. तेवढय़ात वाऱ्याची झुळूक आली, तिने त्या फुलाला हळूच झोका दिला. फूल आणि पक्षी दोघेही झुलू लागले. पक्षालाही तो झुलण्याचा खेळ आवडला. दिवसभर ते फूल फुलपाखरू, पक्षी, वाऱ्याच्या झुळकेसोबत खेळत आनंदी राहत.
असेच एकदा झुलण्याचा खेळ खेळत असता फुलाला थोडं विचित्र वाटू लागलं. त्याच्या पाकळ्या मिटू लागल्या. फुलाला अगदीच गळून गेल्यासारखं वाटू लागलं. सकाळचं हसरं फूल कोमेजून गेलं. तेवढय़ात तिथे एक मधमाशी आली. ती फुलाला म्हणाली, ‘‘तुला कसंतरीच होतंय का रे?’’
फूल म्हणालं, ‘‘ हो गं. मला अगदी गळून गेल्यासारखंच वाटतंय.’’
मधमाशी फुलाला म्हणाली, ‘‘आता तुझं जीवन संपणार. तू या झाडावरून खाली जमिनीवर, मातीत पडणार. सुकून जाणार. ’’
मधमाशीचं हे म्हणणं ऐकून फूल फारच दु:खी झालं. फुलाला दु:खी पाहून वनात फिरत असलेल्या वनदेवतेलाही अचंबा वाटला. वनातून फिरताना नेहमीच ती सदा आनंदी असणारं फूल, झाड, पक्षी यांचा खेळ पाहात असे. त्यांचा तो खेळ पाहून तीसुद्धा आनंदून जाई.
वनदेवता फुलाच्या जवळ गेली आणि म्हणाली, ‘‘फुला, तू इतका दु:खी का रे?’’
फूल म्हणालं, ‘‘वनदेवते, खरंच का गं माझं जीवन आता संपणार?’’
त्या फुलाचा दु:खी चेहरा पाहून वनदेवता म्हणाली, ‘‘अरे, सगळ्यांचंच आयुष्य एक ना एक दिवस संपणार असतं. तुझं आयुष्य संपणार असलं तरी काही दिवसांतच तू अशाच हिरव्यागार झाडावर याच सुंदर रूपात पुन्हा जन्माला येशील, असा माझा तुला आशीर्वाद आहे.’’
वनदेवतेच्या बोलण्यानं फुलाचं काही समाधान झालं नाही. तेवढय़ात जोराचा वारा आला आणि ते कोमेजलेलं फूल झाडावरून खाली गळून पडलं.
फुलपाखरू नेहमीप्रमाणे त्या फुलासोबत खेळण्यासाठी आलं, पण झाडावरून गळून पडलेलं फूल पाहून तेही दु:खी झालं. त्याला फुलासोबत आनंदात घालवलेले दिवस आठवले. पण आपण या फुलाला परागीवहनाच्या माध्यमातून पुन्हा जन्म देऊ शकतो, हे त्याच्या लक्षात आलं. फुलाच्या पाकळ्या जरी कोमेजून गळून गेल्या तरी त्या फुलझाडाचं, फुलाचं बी झाडावर तयार होतं. झाडावरचं बी हळूहळू झाडावरच सुकून गेलं. ते काळसर, करडय़ा रंगाचं बी झाडावरच आपल्या जागेवर झाडाला धरून बसलं होतं. वनदेवतेचं त्या बीकडे लक्ष होतं. वनदेवता त्या बीला म्हणाली, ‘‘ज्या फुलामुळे तुझा या झाडावर जन्म झाला आहे, तशाच सुंदर फुलाला निर्माण करण्यासाठी तुला अशाच नवीन हिरव्यागार झाडाला जन्म द्यायचा आहे. नवीन झाड तयार करायचं आहे.’’
बी वनदेवतेला म्हणालं, ‘‘हे झाड किती हिरवंगार, छान आहे. या झाडाचं फूल खूपच सुंदर होतं. नाजूक रंगीबेरंगी, मखमली पाकळ्यांचं. माझा रंग काळा, करडा. माझं अंग खडबडीत. मी कसं काय तू सांगितलेलं काम पूर्ण करणार? सुंदर फुलाला निर्माण करणाऱ्या हिरव्यागार झाडाला कसा काय जन्म देणार?’’
वनदेवता त्या निरागस बीला म्हणाली, ‘‘माझा तुला आशीर्वाद आहे. तू हे काम पूर्ण करशीलच. प्रयत्नशील रहा, तुझ्या रंग रूपावर तू नाराज होऊ नकोस.’’
बीला वनदेवतेचं म्हणणं नीटसं कळत नाही. ते तसंच पडून राहिलं. तेवढय़ात जोराचा वारा आला. वाळलेल्या बीचा हात झाडापासून सुटला आणि बी खाली जमिनीवर मातीत पडलं. बीला आपल्या रूपाची लाज वाटत होती, त्यामुळे बी मातीच्या पदराखाली लपून राहिलं. पण वाऱ्यानं तिला बरोबर शोधून काढलं आणि आपल्यासोबत खेळायला बोलवल. पण बी काही त्याच्यासोबत खेळायला गेलं नाही. मातीच्या पदराआड रुसून बसून राहिलं. तिथे एक छोटासा पक्षी आला. तो बीला म्हणाला, ‘‘चल, आपण दोघे खेळू या. तुला एका जागी बसून कंटाळा आला असेल ना, मी तुला माझ्या चोचीतून फिरवून आणतो. दुसऱ्या जागी घेऊन जातो.’’ पण बीनं त्याचं काही ऐकलं नाही. ते तसंच जमिनीवर एका जागी मातीचा पदर पांघरून पडून राहिलं. असेच काही दिवस गेले. पाच-सहा महिने बी तसंच पडून राहिलं. एकटेपणाला ते पुरतं कंटाळलं. त्यानं मातीतल्या पिवळ्या पानावर माफीपत्र लिहून वाऱ्याकडे पाठवून दिलं- ‘मला या मातीतून बाहेर काढ.’
वाऱ्यानं बीचं म्हणणं ऐकलं. जोराचा वारा आला. त्यानं मातीचा पदर बाजूला करायला आणि पाऊस यायला एक गाठ पडली. मातीतून बाहेर डोकावून बघणारं बी पावसाच्या पाण्यानं मनसोक्त भिजलं. पोटभर पाणी पिऊन सुखावून गेलं. टरारून फुगलं. बीला त्याच्या कामाची आठवण करून देण्यासाठी वनदेवता आली. ती म्हणाली, ‘‘तुझ्या लक्षात आहे ना, तुला एका सुंदर फुलाला निर्माण करण्यासाठी आधी एका हिरव्यागार रोपाला- झाडाला जन्म द्यायचा आहे.’’
पाणी पिऊन सुखावलेल्या, सुस्तावलेल्या बीनं आळस झटकला आणि वनदेवतेला ‘हो’ म्हणण्यासाठी आपलं तोंड उघडलं आणि नवलंच घडलं. बीच्या तोंडातून एक कोंब बाहेर आला. त्या बीच्या रोपानं जणू वनदेवतेला हात जोडून नमस्कारच केला असावा. वनदेवतेनेही रोपाला आशीर्वाद दिले, ‘‘तुझे छान हिरवेगार झाड होईल. हवा, पाणी, वारा, सूर्यप्रकाश, माती यांच्या मदतीनं रोपटय़ाची छान वाढ होईल व त्यातून हिरवेगार झाड तयार होईल.’’
ते झाड मोठं झालं आणि एके दिवशी एक सुंदर गोडुली कळी त्या झाडाच्या फांदीवर दिमाखाने डोलू लागली. ती कळी हळूहळू फुलली आणि तिचं रंगीत, सुगंधी फुलात रूपांतर झालं. वनदेवतेचा आशीर्वाद खरा ठरला. फुलाला पुन्हा पुनर्जन्म मिळाला होता.
रश्मी गुजराथी – lokrang@expressindia.com