फार पूर्वीपासून हिरवे पोपट हे माणसांचे अगदी आवडते पक्षी आहेत. ते नेहमी खरे बोलतात अशी त्यांची ख्याती आहे. अशाच एका पोपटाला जेकब आपल्या घरी घेऊन आला. तो पोपट कायम जेकबच्या बरोबर असायचा; पण त्याचे दुर्दैव म्हणजे जेकब चोर होता आणि तो नेहमी खोटे बोलायचा.

रोज रात्री जेकब हळूच शेजाऱ्याच्या बागेत जाऊन तिथल्या झाडावरची फळे तोडून घरी आणायचा आणि मग तो आणि त्याचा पोपट त्या फळांवर ताव मारायचे. काही दिवसांनी शेजाऱ्याच्या लक्षात आले की, झाडावरचे चिकू, केळी, सफरचंद आणि पेरू कमी होत आहेत. तेवढय़ात त्याला जेकब आणि त्याचा पोपट दिसला. शेजाऱ्याने त्यांना विचारले, ‘‘माझ्या बागेतली फळे चोरीला जात आहेत. तुम्हाला त्याबद्दल काही माहीत आहे का?’’

pregnant, sister, Nagpur,
पाहुणी म्हणून आली अन् गर्भवती झाली! बहिणीच्या संसारालाच सुरुंग…
parbati barua, elephant, Hasti Kanya, Gauripur, Assam, mahout
हत्तीच तिचे मित्र
Virat Kohli's video goes viral
IPL 2024: गौतम गंभीरच्या गळाभेटीवर विराटने सोडले मौन; चाहत्यांना म्हणाला, ‘तुमचा मसाला संपला म्हणून तुम्ही…’, पाहा VIDEO
Viral video: Man vomits live worm after complaining of abdominal pain
VIDEO: पोटात दुखतेय म्हणून खाल्लं किडे मारायचं औषध; दुसऱ्या दिवशी व्यक्तीच्या पोटातून बाहेर आली धक्कादायक गोष्ट

जेकब म्हणाला, ‘‘नाही बाबा. मला त्याबद्दल काहीच माहीत नाही.’’

पण त्याचा खरे बोलणारा पोपट म्हणाला, ‘‘हो मला माहीत आहे. जेकब रोज रात्री तुझ्या बागेत जातो आणि फळे तोडून आणतो आणि मग आम्ही दोघे बसून ती खातो. कालच मी तुझ्या बागेतले लाल पेरू खाल्ले. चिकू तर खूपच गोड होते.’’

 

फळे चोरून वरती खोटे बोलला म्हणून शेजारी जेकबवर खूप चिडला आणि त्याला मारायला लागला. जेकब शेजाऱ्याला म्हणाला, ‘‘अरे, तू या पोपटावर काय विश्वास ठेवतोस. मला माहीत आहे की, तो  नेहमीच खोटे बोलतो.’’

शेजाऱ्याचा जेकबवर विश्वास बसेना. तो म्हणाला, ‘‘मला वाटतंय की, तूच माझ्या बागेतली फळे चोरतोस. मी आता जातो, पण उद्या परत येतो आणि मग आपण खरे-खोटे काय ते बघू.’’

जेकबला कळून चुकते की, आता दुसऱ्या दिवशी शेजारी त्याच्या मित्रांना घेऊन येणार आणि त्याला त्यांच्या हातचा मार खावा लागणार. आपली चोरी पकडली जाऊ नये म्हणून तो एक शक्कल लढवतो. रात्र झाल्यावर त्याने आपल्या घरातले दिवे बंद केले आणि पोपटाला एका मोठय़ा पिंपात बसवले. मग झाडाची एक फांदी त्या पिंपात घातली आणि त्यावर थोडेथोडे पाणी शिंपडले. मधूनच तो ते पिंप हलवत असे. हा उद्योग  त्याने बराच वेळ केला आणि मग पोपटाला त्या पिंपातून बाहेर काढून झोपून गेला.

दुसऱ्या दिवशी त्याचा शेजारी खरंच त्याच्या मित्रांना सोबत घेऊन आला आणि जेकबला पुन्हा एकदा बागेतून चोरीला जात असलेल्या फळांबद्दल विचारले.

जेकब त्यांना म्हणाला, ‘‘अहो, तुम्ही सगळे या खोटारडय़ा पोपटाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून माझ्यावर चोरीचा आळ घेत आहात. विचारा बरं त्या पोपटाला, की काल रात्री चंद्र आणि चांदणे होते की नाही ते.’’

त्यावर पोपट म्हणाला, ‘‘कसला चंद्र आणि कसले चांदणे. काल तर सगळीकडे मिट्ट काळोख होता. जोरदार वादळ सुटले होते आणि मुसळधार पाऊस पडत होता.’’ हे ऐकल्यावर शेजाऱ्याला आणि त्याच्या मित्रांना जेकबचा पोपट खोटे बोलतो याची खात्री पटली.

दुष्ट जेकबची युक्ती सफल झाली. ते लोक गेल्यावर त्याने पोपटाला आपल्या घरातून हाकलून दिले. बिचारा पोपट खरे बोलत असूनसुद्धा सगळे त्याला खोटारडा म्हणाले. आपले काय चुकले ते त्या पोपटाला कळलेच नाही. खरेच पाऊस पडत होता, असे सांगितले तरी कोणी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. जेकबने त्याला पिंपात बसवून वरून पाणी टाकण्याचा डाव रचला होता याची बिचाऱ्याला काही कल्पनाच नव्हती. त्याला खूप वाईट वाटले व तो जंगलात उडून गेला.

पोपटाला जंगलात मना भेटल्यावर त्याने तिला सगळी कहाणी सांगितली. मना त्याला म्हणाली, ‘‘अरे सगळ्याच माणसांना वाटते की, स्वत:चे बोलणे बरोबर असते. ते काय बोलतात त्याची तू पुनरावृत्ती कर म्हणजे सगळे म्हणतील की, पोपट किती छान बोलतो.’’

ते ऐकून पोपट म्हणाला, ‘‘अगं, माणसे खूप वेळा खोटं बोलतात. मग मीपण त्यांच्यासारखे खोटे बोलायचे का?’’

त्यावर मना म्हणाली, ‘‘तू आता खरे-खोटे हा विचार करू नकोस. फक्त ते काय बोलतात तेच बोल म्हणजे तू परत सगळ्यांचा आवडता पक्षी होशील.’’ पोपटाला ते पटले व त्याने मनेचे आभार मानले.  तेव्हापासून सगळे पोपट माणूस काय बोलतो त्याचीच पुनरावृत्ती करतात आणि आपण त्याला पोपटपंची म्हणतो.