नेहाला जाग आली तेव्हा रोजच्यापेक्षा थोडा उशीरच झाला होता. ‘आज आईने कशी हाक मारली नाही?’ ती मनाशीच पुटपुटली. पण तिच्या लक्षात आलं, की काल रात्रीच आई आणि बाबा जमिनीच्या कामासाठी मामाच्या गावाला गेले आहेत. तेव्हा मात्र पटकन् ती उठली. पांघरूणाची घडी घातली आणि यशदादाला हलवून म्हणाली-
‘अरे ऊठ. उशीर होईल शाळेला.’
‘हो, उठतो गं,’ असं म्हणत अर्धवट झोपेतच असलेल्या यशने परत डोळे मिटले आणि तो कुशीवर वळला.
नेहा घाईघाईने स्वैंपाकघरात गेली. आजी पोळ्या करत होती.
‘हे काय गं आजी! उठवलंस का नाही मला?’
‘अगं, उठवणारच होते आता. भाजी झालीच आहे. तुमच्या दोघांच्या डब्याच्या पोळ्या आत्ता होतीलच बघ. तुमचंच आटपा लवकर.’
‘हो हो. पण तुलाच लवकर उठून करावी लागली भाजी-पोळी.’
‘मग त्यात काय झालं? रात्री आईने भाजी चिरून ठेवलीच होती. अन् कणिकही भिजवलेली होती. तुमचंच आवरा भरभर, नाही तर होईल उशीर.’
‘अरे दादा, ऊठ ना!’ नेहाने परत यशला हलवलं आणि ती बाथरूममधे शिरली. अंघोळ करून ती बाहेर आली तरी तो उठलाच नव्हता. शेवटी चिडून त्याचे पांघरूण खसकन् ओढून काढले तेव्हा तो डोळे चोळत उठून बसला आणि म्हणाला, ‘काय कटकट लावली आहेस गं?’
‘घडय़ाळाकडे बघ एकदा. शाळेला सुट्टी नाही म्हटलं आज.’ नेहा जरा रागावलीच.
तिने केस विंचरले. युनिफॉर्म घातला आणि टेबलाजवळ आली. टेबलावर बोर्नव्हिटाचा मग आणि बशीत बिस्किटे तयारच होती.
‘आजी, तुला किती त्रास?’ नेहा आजीला म्हणाली.
‘अगं, त्रास कसला? निम्मी तयारी आईने करूनच ठेवली होती.’
‘आजी, तुला सकाळी लवकर उठावं लागलं. तुझे पाय दुखत असतानाही तू सारं केलंस,’ नेहा कळवळून आजीला म्हणाली. तेवढय़ात यश म्हणाला, ‘नेहा, माझी गणिताची वही पाहिलीस का तू? आज सरांना द्यायची होती.’
‘म्हणजे रात्री दप्तर आवरून ठेवलं नाहीस तू?’
‘मॅच बघत होतो ना. खूप उशीर झाला. म्हटलं आवरू सकाळी.’
‘अन् हे काय? पांघरूणाची घडीसुद्धा केली नाहीस तू? कमाल आहे.’
‘ए! गप्प बसायला काय घेशील? जादा शहाणपणा नको. आधीच उशीर झालाय. पण पुढच्या वेळेस नक्की!’
 शेवटी वही सापडलीच नाही. अन् वेळेवर शाळेत पोचायला हवं म्हणून अंघोळीला दांडी मारून त्याने बस गाठली.
यशचं असं नेहमीचं ‘पुढच्या वेळेस नक्की!’ म्हणत अव्यवस्थित वागणं सुरू होतं. काही काम सांगितलं तर नेहावर ढकलायचं. कधी गोडीगुलाबी, तर कधी ‘मी तुझा दादा आहे ना’ म्हणून दटावणी. खरं तर त्याचं हे वागणं आई-बाबा-आजी यांना मुळीच पटत नव्हतं. मुलगा असला म्हणून काय झालं? त्यानेही घरातलं काम करायलाच हवं. सर्वानी अनेक वेळा समजावलं होतं. पण कधी ‘सॉरी, सॉरी’, तर कधी ‘क्षमस्व’, तर कधी ‘पुढच्या वेळेस नक्की!’ म्हणत वेळ मारून न्यायची त्याला सवयच जडली होती.
गावाला जाताना आईबाबांनी यशला बजावलं होतं  की, ‘आजीला त्रास देऊ नकोस. घरात थोडी मदत कर. नेहा लहान आहे.’
‘हो हो, तू काही काळजी करू नकोस,’ यशने आईला भरघोस आश्वासन दिलं.
दुपारी घरी आल्यानंतर, ‘आजी, तू घे विश्रांती. मी करते आमच्या जेवणाची तयारी,’ असं सांगून नेहाने यशला हाक मारली. चार हाकांनंतर यश जेवायला आला. जेवण झाल्यावर हात धुऊन सरळ संगणकावर बसला. नेहानेच सर्व आवराआवर केली. आजीला चहा करून दिला. रंजनाने घासलेली भांडी कोरडी करून जागेवर लावली. संध्याकाळी आजीच्या देखरेखीखाली खिचडी केली. पापड तळले. मस्त बेत जमला. ‘लवकर येतो’ असं सांगून यश नऊ वाजता उगवला. ‘ए, काय केलं आहेस आता? मी वडापाव खाऊन आलो आहे,’ असं सांगून चाखतमाखत जेवला. रात्री नेहाने यश आणि आजीचं अंथरूण व्यवस्थित घातलं. यशच्या कपडय़ांच्या घडय़ा करून ते कपाटात ठेवले. आजीचे पाय चेपून दिले.
दुसऱ्या दिवशीसुद्धा नेहाने जमेल तशी आजीला मदत केली. यशच्या वागण्यात मात्र काहीच बदल झाला नव्हता. संध्याकाळी आई-बाबा आले. आजीकडून त्यांना सर्व हकिकत कळली.
‘नेहा, तुला मामीने मस्त ड्रेस दिला आहे.’ आई म्हणाली.
‘आणि मला..?’ – यश.
‘पुढच्या वेळेस नक्की!’
आईने अर्धवट सोडलेल्या वाक्याचा नेमका अर्थ आता यशला कळला होता.